काळडोह वाळणकोंड

अज्ञाताचे आकर्षण सर्वांनाच असते. सृष्टीत आजही अशी अनेक रहस्ये लपली आहेत ज्यांचा शोध घेणे मानवाला शक्य झालेले नाही. आता रायगड जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, एका बाजूस दुर्गम सह्यपर्वतरांगा व दुर्सया बाजूस अरबी समुद्र यांच्या मधोमध असलेल्या या निसर्गसंपन्न अशा भुप्रदेशात अनेक रहस्यमय स्थळे आहेत ज्याची माहिती फारच कमी लोकांना आहे. याच रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असलेला वळणकोंड हा डोह सुद्धा अशाच एका अज्ञात गुढाची सफर आपल्यास घडवतो.

काळडोह वाळणकोंड
वाळणकोंड

रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असणारी सर्वात मोठी नदी म्हणजे सावित्री. ती महाबळेश्वरजवळ उगम पाऊन महाडमार्गे पुढे बाणकोटजवळ समुद्रास मिळते. घोड, गांधारी व काळ व नागेश्वरी या तिच्या उपनद्या आहेत. या पैकी गांधरी हि उपनदी सह्याद्री रांगेत पुनाड येथे उगम पावते तर काळ नदी कोकणदिव्याजवळील कावळ्या घाटाजवळ उगम पावते. सावित्री नदीला बिलगर्णाया या चार नद्यांच्या काठावरील प्रदेश मोकळा व पिके देणारा आहे. या नद्या लहाव व वाकड्यातिकड्या असून समुद्रास मिळण्याआधीच त्यांची पात्रे कोरडी पडतात. पावसाळ्यात मात्र या नद्यांना पूर येतो पण उन्हाळ्यात या कोरड्या पडतात. याच दक्षीण कोकणातील जमीन सामन्यतरू खडकाळ व नापिक आहे परंतु तित नद्या व खाड्या पुष्कळ असल्याने त्यांच्या काठचा प्रदेश मात्र सुपीक आहे. मुख्य पिक तांदूळ असून नागली, वरी वाल वैगेरे फळे व सर्वसाधारण शाक भाज्या उत्पन्न होतात. मासेमारी व त्यांच्या व्यापार चांगला चालतो.

अशा या विविधांगी रुपाने नटलेला रायगड जिल्ह्याचा महाड तालुका आहे आणि अर्थात या तालुक्याचे ठिकाण असलेले महाड शहरही तितकेच ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शहर आहे. सातवाहनांच्या काळापासून बाणकोट खाडीवरील एक प्रसिद्ध बंदर म्हणून ख्याती असलेल्या महाडास पूर्वी पाश्चिमात्य देशातील जहाजे हजारोंच्या संख्येने बहुमुल्य असा माल घेऊन थांबायची व येथून तो माल बैलांवर लादून मढ्याघाट, कावल्या-बावल्या घाट तसेच बोराट्याची व सिंगापुरची नाळ इत्यादी मार्गांनी घाटावर नेला जात असे, सह्याद्रीतील या प्राचिन घाटमार्गांवर मालवाहतूक करण्यासाठी काही लेण्यासुद्धा बांधण्यात आल्या यातील गांधारपाले नामक एक प्रसिद्ध लेणी खुद्द महाड शहरातच आहे. या महाडास पूर्वी महाहाट असे नाव होते. येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह तर प्रसिद्धच आहे, याशिवाय महाडने अनेक राष्ट्रपुरुषांसही जन्म दिला क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा कमलाकर दांडेकर, सुरबनाना टिपणीस अशी नावे घेता येतील.

या महाड तालुक्यात शिवाजी महाराजांची राजधानी असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगडसुद्धा आहे, हा महाकाय किल्ला पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात, काही वर्षांपूर्वी येथे रोपवे करण्यात आला आहे त्यामुळे आता अबालवृद्धांसही हा किल्ला सहजतेने पहाता येतो. मात्र याच रायगड किल्ल्याच्या आसमंतात लपलेली अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजुनही प्रसिद्धीच्या झोतात यायची आहेत. तशी ती स्थानिक भागात प्रसिद्ध आहेत मात्र त्यांना आजही म्हणावे तितके वलय लाभलेले नाही. पूर्वीचा महत्वाचा शिवकालीन मार्ग रायगड ते राजगड हा होता. राजगडावरून राजधानी रायगडास आल्यावर सर्व ताफा याच मार्गाने रायगडास आला. ही वाट कोकणात ज्या ठिकाणि उतरते त्या मार्गावर छत्र निजामपूर नामक खेडे आहे. या गावावरुन काळ नदी गेली आहे, मग दोन-तीन कि.मी. अंतरावर वारंगी नामक खेडे आहे. तिथून काही अंतरावर पाणं, हे पाणं लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. घाटावरील तोरणा व कोकणातील रायगड यांच्या बरोबर मध्ये सह्याद्रीच्या मुख्य रांगेत शिवलिंगासारखा आकार असलेला एक प्रखर सुळका असलेला लिंगाणा दुर्ग हा पूर्वी रायगडचे तुरुंग होता. शिवकालात खुद्द रायगड, तळातली वाडी व लिंगाणा किल्ला हा परिसर तर्फ रायगड या नावाने ओळखला जात असे.

पायथ्याशी असलेल्या पाणं या गावापासून गावापासून किल्ल्याचा चढाव सुमारे चार मैल आहे. तळात लिंगाणामाची नामक छोटे गाव आहे. चढावयास अवघड असलेल्या या किल्ल्यावर पूर्वी वर जाण्यासाठी पार्यया कोरलेल्या होत्या पण आता त्यांची पडझड झाली आहे. शिडीच्या सहाय्याने वर जावे लागते. कड्यावर पाण्याची टाकी व कैदी ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या काही गुहा आहेत. या गुहांच्यावरील प्रखर सुळक्यावर चढाई करण्यासाठी हौशी गिर्यारोहक येथे येत असतात. किल्ल्याच्या पायथ्याला उअजवीकडे दापोली गाव लागते. हे झाले प्राचिन मार्गाचे वर्णन. सद्यस्थितीला महाडमधून एम्.आय.डी.सी. बिरवाडी-मांघरुण मार्गे दापोलीस जाता येते, अर्ध्या पाऊण तासाचा हा मार्ग आहे.

या दापोली गावाजवळ असलेला काळ नदीचा वळणकोंड हा रुद्रभिषण डोह हा निसर्गाचा एक चमत्कारच मानायला हवा. महाडपासून सुमारे बारा कि.मी. अंतरावर असलेला वळणकोंड डोह येथील पवित्र अशा महाकाय माशांसाठी प्रसिद्ध आहे. या वळणकोंडाविषयी कधीतरी कुणाकडून ऐकिवात आलं होतं आणि इतका गुढ परिसर आपल्याच जिल्ह्यात असून आजवर तिथे जाता आले नाही ही खंत सुद्धा मनात होती आणि जेव्हा तिथे जाण्याचा योग आला तेव्हा क्षणाचाही विचार न करता अवधूत नामक भावाला घेऊन तेथे दाखल झालो. बिरवाडीपासून वारंगीपर्यंतचा परिसर हा वाळणखोरे म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडे रायगड, पोटल्याचा डोंगर, उजवीकडे मुख्य सह्याद्री रांगेतला मढ्याघाट, कावल्याबावल्या घाट, बोराट्याची व सिंगापुरची नाळ हा परिसर, थोडी पुढे नजर टाकल्यास अवकाशाला छेदून गेलेला लिंगाण्याचा सुळका आणि त्याच्याही पलिकडे असणारी पण नाव माहित नसलेली कोकणदिव्याची चार पाच शिखरे या सर्वांच्या मधोमध असलेल्या या प्रदेशातील मार्गावर असलेल्या अनेक गावांच्या नावामध्ये वळण किंवा कोंड असा उल्लेख आढळतो. उदा.केतकीचा कोंड, वाळण खुर्द, पांढेरी कोंड इत्यादी. वारंगी गावच्या वेड्यावाकड्या रस्त्यावर उजव्या बाजूस काळनदी आपली साथ देत असते, मात्र मार्च महिना असल्याने नदीचे पात्र पुर्णपणे सुकून फक्त नावापुरताच नदी वाटत रहाते.

निसर्गाची हि अद्भुत निर्मिती पाहताना अचानक गाडी थांबते आणि उजवीकडे अगदी नजरेच्या टप्प्यात असलेला एक हावडा ब्रिज टाईप लोखंडी झुला दिसतो. हा झुला काळनदीच्या वळणकोंड या डोहावरुन वरदायिनी देवीचे दर्शन घेऊन दापोलीस जाण्यासाठी बांधला आहे. वळणकोंड हा डोह पाहताक्षणीच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या डोहाबद्दल जितके ऐकले होते तितकेच ते सत्यही आहे याची प्रचिती हा डोह पाहताना आली. तसा मी काळनदी परिसरातील माणगाव व लोणेरे परिसरात र्बयापैकी वावरलेला. मुळात काळ नदी ही सावित्रीची उपनदी, पावसाळ्यात पुर आणणारी ही नदी उन्हाळ्यात पार कोरडी ठाक होऊन जाते. त्यामुळे ज्याची खोलिच कळत नाही असा डोह याच नदीस आहे याची खात्री होत नव्हती. मात्र या नदीबद्द्ल आम्ही बरेच ऐकुन होतो. जिच्या नावातच काळ आहे अशी दरवर्षी निदान एकत्री बळी घेणारी ही नदी. माझ्या मावशीचे घर काळनदीच्या अगदी अलिकड असल्याने सुट्टीत तिथे गेल्यावर आम्ही बच्चेकंपनी दर संध्याकाळी नदीवर जात असू. मध्यंतरी तिथे मगरींचा संचार असल्याची बातमी आली, या नदीची मुख्य नदी सावित्री ही तिथल्या मगरींसाठीच प्रसिद्ध आहे त्यामुळे काही मगरींनी आपला मार्ग या निर्जन नदीकडे वळवला असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र नदीच्या पुलावर बसलो असताना पुलाखालीच साधारण सात्-आठ फुटी काळया महाकाय मगरीचे दर्शन आम्हाला झाले होते. अशा या काळ नदीच्या या वळणकोंड डोहाबद्दल ऐकल्यापासून  तो पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. मार्च महिन्यात नदीचे पात्र पुर्णपणे सुकून गेले होते पण हा डोह मात्र पुर्णपणे भरलेला होता आणि याचा आकारसुद्धा प्रचंड होता.

मंदिरात लिंगाणा दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या दापोली नामक खेडेगावात राहणारे आणि वरदायिनी देवी मंदिराचे पुजारी श्री. रेणूसे भेटले. त्यांनी देवीची महती सांगितली. ही देवी परिसरातील पाणं, दापोली, पांढेरी, वाळण खुर्द, माणगाव, देवगड व वाघोली या सात गावांचे मुख्य दैवत. पुर्वीच्या काळी अडल्या नडलेल्यांनी नवस केल्यांनतर त्यांच्या कार्यासाठी मदत म्हणुन या डोहातून सोन्या चांदीची भांडी व दागिने येत असत मात्र कार्य झाल्यानंतर भक्र्तांना हे दान परत या डोहात सोडावे लागत असे. मात्र एका भक्ताने हे सर्व साहित्य मिळवल्यावर डोहात परत सोडले नाही यामुळे देवीचा या परिसरावर प्रकोप होवून ती नाहिशी झाली आणि परिसरात दुष्काळ व रोगराईचे संकट कोसळले यामुळे सर्व गावर्कयांनी एकत्र येऊन देवीची करुणा भाकली. तेव्हा देवीने उपवर दिला कि मी आता या डोहामध्ये माशांच्या रुपाने वावरिन तेव्हा या माशांची निगा राखा त्यांचा नाश करु नका, त्यांची पुजा करा तुमच्या सर्व इच्छा आकांशा पुर्ण होतील. वरदायनी देवीचे मंदिर डोहावर आहे. देवतांच्या इतिहास पाहता त्यांची विभागणी विवीध स्तरामध्ये झाल्याचे आढळून येते वैदिक देवता, पौराणीक देवता, स्वयंभू देवता, अवतारी देवता असे अनेक प्रकार आहेत. काही देवतांचा जन्म हा विशिष्ट दैत्याचा नाश करण्याकरित झाला तर पर्वतक्षेत्रांमध्ये काही देवतांची स्थाने आढणून आली म्हणुन त्यांना पर्वतीय देवता म्हणुन ओळखले जाते. काही देवतांचा जन्म मानवी रुपात झाला असून त्यांनी केलेल्या अतिमानवी चमत्कारांमुळे त्या देवतास्वरुप पावल्या. वरदायिनी देवीची नवसाला पावणारी आणि वर देणारी अशी महाड परिसरात ख्याती आहे.

डोहाविषयी अधिक माहिती जाणुन घेताना असे कळले की, अनेक वर्षांपासून या डोहातले प्रचंड आकाराचे मासे दैवी मानले जातात व पुजले जात असल्याने त्यांचा नाश करणे अशक्यप्राय गोष्ट आहे आणि तसा प्रयत्न कोणी केल्यास त्या व्यक्तीचे प्रचंड नुकसान होते. ब्रिटीशकाळात एका इंग्रज अधिर्कायाने हा प्रयत्न केल्याच संदर्भ सापडतात. मुंबईहून रायगडास काही कामानिमित्त आलेला हा अधिकारी या डोहाविषयी आणि डोहातल्या ६-७ फुटी आकाराच्या माशांविषयी ऐकुन होता. डोह पाहताना आतले प्रचंड आकाराचे मासे पाहून त्याला त्यांची शिकार कराविशी वाटली. मात्र उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करुन त्यास ते माशे मारणेच काय तर पकडणेही जमले नाही. सर्व प्रयत्न करताना अंधार पडू लागल्याने हताश अवस्थेत तो तळागडाकडे जाण्यास निघाला. तळागडावर पोहोचताच त्यास अतिशय तिव्र तापाने घेरले व एका दिवसातच त्याचा तिथे मृत्यू झाला. या घटनेमुळे ब्रिटीशांनी त्या परिसराची धास्ती घेतली होती.

सुमारे ३०० फुट लांबी व ३० फुट रुंदी असलेल्या या रौद्रभिषण डोहाची खोली आजही कुणालाही मोजता आलेली नाही, फार पुर्वी इंग्रजांनी या डोहाची खोली किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला होता यासाठी त्यांनी टेपचा आधार घेतला होता मात्र सुमारे १००० फुट लांब टेप आत बुडवून सुद्धा याच्या तळाचा ठाव इंग्रजांस लागला नाही याचा अर्थ याची खोली आणखी कितीतरी असली पाहिजे हे स्पष्ट होते. डोहामध्ये कमित कमी २-३ फुट ते जास्तित जास्त ८ फुटांपर्यंत वाढ झालेले अजस्त्र आकाराचे मासे आहेत ज्यामध्ये काडा, कोला आणि शिंगाडा या माश्यांचा समावेश होतो. यातले शिंगाडे ७ ते ८ फुट वाढले आहेत आणि फार क्वचित्र दर्शन देतात. या माशांना प्रसाद म्हणुन कुरकुरे किंवा तांदुळ टाकल्यास एकाच वेळी गर्हिया पाण्यातून हजारो माशे बाहेर येऊन प्रसादाचा आस्वाद घेतात हे दृश्य फारच रोमांचकारी असते, मात्र हा प्रसाद देताना अतिउत्साहात डोहाच्या जवळ अजिबात जाऊ नये कारण डोह खोल असल्याने तसेच आजुबाजुस वस्ती नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्यास अडथळा येण्याची शक्यता आहे. याबाबतीत एक घटना रेणुसे यांनी सांगितली, या डोहाबद्दल अशीही एक अख्यायिका आहे की, डोहामध्ये अनावधाने एखादा भक्त पडला तरिही त्यास मरण येत नाही, एकदा माशांना प्रसाद देता देता एक भक्त पाण्यात पडला मात्र बघता बघता हजारो माशांचा समुह त्यास पाण्याबाहेर घेऊन आला. अशा या रौद्रभिषण व गुढ अशा डोहास पर्यट्कांनी एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे जेणेकरुन तो याची देही याची डोळा अनुभवायास मिळेल. शेवटी सृष्टीची अनेक गुढ तत्वे आजही विज्ञानाच्या पलिकडे आहेत आणि काळडोह वाळणकोंड त्यापैकीच एक आहे.