श्रीवर्धन व दिवेआगर - कोकणचे सांस्कृतीक ठेवे

निसर्गसंपन्नेतेने व ऐतिहासिक वारश्याने नटलेली ही दोन जुळी गावे एकाच तालुक्यात असून रायगड जिल्ह्याच्या वायव्येस आहेत.

श्रीवर्धन व दिवेआगर - कोकणचे सांस्कृतीक ठेवे
श्रीवर्धन व दिवेआगर

श्रीवर्धन

कालौघात अनेक गावांची प्राचिन नामे बदलली मात्र आजतागायत प्राचिन नाव मिरवणारे श्रीवर्धन हे एकमेव गाव असावे. श्रीवर्धन हे श्री व वर्धन या दोन शब्दांच्या संलग्नतेतून निर्माण झाले असावे. श्रीफळाच्या अर्थात नारळाच्या विपुल बागा या गावात असल्यामुळे या गावास हे समर्पक नाव मिळाले आहे. असेही म्हटले जाते की गावात उत्तरेस असलेल्या डोंगरावरुन न्याहळले असता खाली गावाचा आकार श्री आकाराचा दिसतो म्हणुन गावास हे नाव मिळाले असावे मात्र हे जुन्या काळी शक्य असेल कारण आधुनिक काळात गावांचा विस्तार झाला त्यामुळे आता हा आकार दिसत नसावा.

श्रीवर्धनास अर्जुनाने सुद्धा भेट दिली होती असे म्हटले जाते, युर्पोयन प्रवाशांनी या गावाचा जिफरदन असा उल्लेख केला आहे यावरुन प्राचिन काळापासून हे गाव व्यापाराचे प्रमुख स्थळ होते हे निसंशय सिद्ध होते. प्राचिन महत्त्व असलेल्या या गावात अनेक पुरातन मंदीरे आहेत यामध्ये लक्ष्मी-नारायण, काळभैरव, गावदेवी सोमजाई, जिवनेश्वर शिवमंदीर, श्रीराम मंदीर इत्यादींचा समावेश आहे. जिवनेश्वर मंदीर हे हेमाडपंथी धाटणीचे आहे. श्रीवर्धन हे गाव पेशव्यांचे मुळ गाव बाळाजी विश्वनाथ यांच्या पुर्वजांकडे या गावाचे कुळकर्णीपद होते मात्र सिद्दीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे गाव सोडले व देशावर गेले. जुन्या पुण्याची नगररचना व श्रीवर्धनची नगररचना यात विलक्षण साम्य आहे. ज्या ठिकाणी पेशव्यांचे जुने घर होते तिथे आता फक्त चौथरा असून तेथे बाळाजी विश्वनाथांचे स्मारक नगरपालिकेने बांधले आहे व सध्या येथे बालवाडी, व्यायामशाळा व टेबल टेनिस कोर्ट आहे. श्रीवर्धन मध्ये नारळी-पोफळीच्या अनेक पाखाड्या आहेत, आजही या गावाने आपली मुळ रचना व संस्कृती जोपासली असून या गावास तितकाच सुंदर असा समुद्र किनारा लाभला आहे. श्रीवर्धनची ग्रामदेवता म्हणजे सोमजाई देवी, नवसाला पावणारी अशी समस्त पंचक्रोशीतल्या भाविकांची श्रद्धा असून  हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यावर या देवीचे दर्शन घेण्याची जुनी प्रथा आहे. या देवीची स्थापना अगस्ती ऋषींनी केली असल्याचे म्हटले जाते, व नवरात्रात येथे मोठा उत्सव भरतो.

दिवेआगर

श्रीवर्धनपासून हाकेच्याच अंतरावर दिवेआगर हे निसर्गसंपन्न व समुद्राच्या काठी वसलेले सुरेख गाव आहे, येथील किनारा स्वच्छ व सुरक्षीत असल्याकारणाने येथे पर्यटकांची कायम मांदियाळी असते व अनेक स्थानिक घरगुती राहण्याची व जेवणाची सुवीधा पुरवतात. किर्नाया शिवाय हे गाव सुवर्ण गणेशाचे गाव म्हणुन प्रसिद्ध होते.

प्राचिन काळी शिलाहार यांच्या राजवटीत आरसपानी अशा सुवर्णगणेशाची निर्मिती येथे करण्यात आली होती, मुळात ही मुळ मुर्ती नसून उत्सवमुर्ती किंवा उत्सवाच्या वेळी मुळ मुर्तीस लावण्याचा मुखवटा असावा मात्र कालांतराने समुद्री चाचे व परकिय सत्ताम्चे परिसरात समुद्रमार्गाने हल्ले होत असत त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून सुवर्ण गणेशाची मूर्ती जमिनीखाली पुरून ठेवली गेली मात्र दरम्यान १९९७ साली बरोबर संकष्टी चतुर्थीच्या शुभदिनी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळसुपारीच्या बागेत खोदकाम करताना ही मूर्ती आढळली त्यांनि ही मुर्ती व तिच्या सोबत मिळालेली पेटी व रत्ने शासनाच्या हवालि केली व याच गावात एक मंदिर बांधण्यात आले. या मंदीरामुळे दिवेआगरचा जणू कायापालट झाला व पर्यटकांची व भाविकांची गर्दी वाढू लागली मात्र दुर्दैवाने काही वर्षांपुर्वी ही मुर्ती चोरीस गेल्यामुळे भाविकांच्या व नागरिकांच्या दुरूखास पारावार राहिला नाही.

प्राचिन काळी उत्तर कोकणाची सांस्कृतीक राजधानी असलेल्या या गावात एकूण आठ मंदीरे व एक मशिद आहे याशिवाय येथे एकुण पाच ताम्रपट व शिलालेख मिळाल्याने गावाच्या प्राचिन वैभवाची कल्पना येते हे ताम्रपट व शिलालेख प्रामुख्याने चालुक्य व शिलाहार कालीन आहेत. खर्‍या अर्थी श्रीवर्धन व दिवेआगर ही दोनही गावे रायगडचा सांस्कृतीक ठेवा आहेत.