गोरेगांव - एक प्राचीन व्यापारी केंद्र

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गोरेगांव हे शहर प्रसिद्ध आहे. गोरेगाव शहराची महती प्राचीन असून हे शहर पूर्वी घोडेगांव म्हणून प्रसिद्ध होते.

गोरेगांव - एक प्राचीन व्यापारी केंद्र

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

सह्याद्रीमधुन काळ व घोड या दोन नद्या उगम पावून पुढे दासगावजवळ सावित्री नदीस मिळतात याच दोन नद्यांचा संगम गोरेगावच्या उत्तरेस अदमासे ३ किलोमीटरवर होतो. 

घोड नदीस गोडी नदी या नावानेही ओळखले जाते. गोरेगांव शहराच्या नामोत्पत्ती बद्दल ज्या आख्यायिका आहेत त्यानुसार प्राचीन काळी हे शहर एक मोठी बाजारपेठ असून तेथे घोड्यांचा व्यापार मोठा होता त्यामुळे शहरास घोडेगांव या नावाने ओळखू लागले याशिवाय घोड नदीचे मुख हे गोरेगाव येथेच असल्याने घोड नदीच्या मुखावरील शहर म्हणूनही घोडेगांव असे नाव पडले असण्याची शक्यता आहे.

मात्र थोडे अधिक खोलात शिरून अभ्यास केल्यावर लक्षात येते की विद्यमान गोरेगाव शहराच्या पश्चिमेकडील सरासरी ३२० मीटर उंची असलेल्या डोंगरात गोरेगावपासून सरळ रेषेत फक्त ४ किलोमीटर अंतरावर घोडेघुम नावाचे एक गावं आहे. घोडे घूम मधील घूम म्हणजे गुम या शब्दाचा अपभ्रंश असून गुम या शब्दाचा मूळ अर्थ गावं असा आहे. शिलाहार चालुक्य काळात गावांचा उल्लेख ग्राम अथवा गुम असा केला जात असे.

त्यामुळे गोरेगावपासून पश्चिमेस ४ किलोमीटर अंतरावरील डोंगरावर असलेले घोडेगुम हे गावं कदाचित प्राचीन काळातील गोरेगावचाच एक भाग असावे व घोडेगावच्या वाढत्या व्यापारी महत्त्वामुळे उतारूंना अथवा व्यापाऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून डोंगरउतारावर व जलप्रवास करून दळणवळण करणे सोपे जावे म्हणून कालांतराने गोरेगावचाच एक भाग असावे तिचे रूपांतर आजच्या गोरेगाव शहरात झाले असावे.  सह्याद्रीतून कोकणात उतरणाऱ्या मार्गांमध्ये कुंभे घाट व देव घाट प्रसिद्ध होते त्यावेळी या मार्गातील प्रमुख ठिकाण गोरेगावचं होते.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारत भेटीवर आलेल्या ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी याने गोरेगावचा उल्लेख हिप्पोकुरा (घोडेकुला) असा केला आहे व गोरेगाव हे चौलच्या दक्षिणेस असून ते व्यापारी बंदर आहे अशी नोंदही केली आहे यावरून गोरेगावचे व्यापारी महत्व किती प्राचीन आहे याची सहज कल्पना येते.

१९३१ सालच्या कुलाबा भूवर्णन या ग्रंथात गोरेगाव हे भाताच्या व्यापाराचे मोठे केंद्र असल्याचा उल्लेख आहे याचा पुरावा आपल्याला १९५४ सालच्या कुलाबा वर्णन या पुस्तकातही मिळतो. १९५४ साली गोरेगाव मध्ये भाताच्या ५-६ मोठ्या गिरण्या होत्या. याशिवाय गोरेगावात हातमागावर लुगडी काढण्याचे कारखाने सुद्धा होते. गोरेगावच्या प्रसिद्ध अशा लुगड्यांना सालवटी लुगडी या नावाने ओळखले जात असे. याशिवाय गोरेगाव येथे घोंगड्या, तांब्या पितळेची भांडी तयार करण्याचे कारखाने सुद्धा फार पूर्वीपासून आहेत.

पूर्वी गोरेगाव हे शहर जंजिरा संस्थानाच्या हद्दीत येत असे व या संस्थानात एकूण १२ महाल होते त्यापैकी एक महाल अर्थात स्थानिक उपविभागाचे मुख्यालय हे गोरेगाव शहर होते. जंजिरा संस्थानातील सर्व महाल पुढीलप्रमाणे होते तळे, म्हसळा, निजामपूर, नांदगाव मुरुड, घोसाळे, पंचतन दिवे, बिरवाडी, मांडला, गोरेगाव, श्रीवर्धन आणि गोवेले. उत्तर कोकण मोहिमेत मराठ्यांनी सिद्दीचा पराभव केला त्यावेळी सिद्दीने थोरल्या बाजीरावांसोबत केलेल्या तहात तळे, निजामपूर, घोसाळे, बिरवाडी, गोरेगाव व गोवेलेचा अर्धा भाग मराठ्यांना दिला होता असा उल्लेख मिळतो. या तहानंतर ब्रिटिश काळात जेव्हा जंजिरा संस्थान उदयास आले त्यावेळी गोरेगावचा तत्कालीन कुलाबा जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात समावेश केला गेला. 

गोरेगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने गेल्या ७० वर्षांपासून येथे तार ऑफिस व पोस्ट ऑफिस होती याशिवाय १९५२ साली गोरेगाव ग्रामपंचायतीस जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल ढाल प्रदान करण्यात आली होती. १९५५ सालापासून सर्व गावास नळाने पाणी पुरविण्याची योजना ४ लाख रुपये खर्च करून सुरु करण्यात आली यासाठी काळ नदीवर बंधारा बांधून त्या बंधाऱ्याचे पाणी नळाने गोरेगावास पुरवणे सुरु झाले.

गोरेगाव हे टुमदार असे शहर असून नव्या व जुन्याचे मिश्रण जपलेले असे शहर आहे. गोरेगावात गावं तलाव, विष्णू तलाव व राम तलाव असे तीन भव्य असे बांधीव व रेखीव तलाव आहेत जे गोरेगावकरांची पाण्याची गरज फार पूर्वीपासून भागवत आले आहेत. गोरेगाव शहरातील हे तलाव केवळ गोरेगावचीच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत होते व पाण्याच्या या सोयीमुळे पूर्वी गोरेगाव तसेच शेजारच्या वाकी व हुर्डी गावांमध्ये जंजिरा मोहिमेदरम्यान मराठी फौजा मुक्काम करीत.

गोरेगावमधील एक अतिशय प्रेक्षणीय स्थळ म्हणजे उत्तरेकडील टेकडीवर असलेले मल्लिकार्जुन शिवमंदिर. या मंदिराची बांधणी ९०० वर्षांपूर्वी म्हणजे शिलाहार काळात झाली. उत्तर कोकणच्या शिलाहार राजवंशांत अपरादित्य या राजाचा मल्लिकार्जुन हा पुत्र होता. कदाचित त्याच्या कारकिर्दीत या मंदिराची बांधणी करण्यात आली असावी हे मंदिराच्या नावावरून गृहीत धरता येते. मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहातील नंदी हा नेहमीप्रमाणे बैठी नसून तो उभा आहे त्यामुळे नंदीची ही मूर्ती अतिशय दुर्मिळ मानली जाते.

याशिवाय गोरेगावमध्ये १९०४ साली गोविंदशास्त्री रानडे यांनी बांधलेले पंचमुखी गायत्री मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या बारा हातांच्या गणेशाची मूर्ती भारतातील एकमेव मूर्ती आहे असे मानले जाते. याशिवाय गावात ३०० वर्षे जुने विठ्ठल मंदिर, भैरी भवानी मंदिर अशी अनेक जुनी व जागृत देवस्थाने आहेत जी भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. चैत्र पौर्णिमेस भैरी भवानीची खूप मोठी यात्रा साजरी करण्याची परंपरा आहे. गोरेगाव शहरात मुस्लिम धर्मियांची संख्यासुद्धा विपुल असून गोरेगावच्या उत्तरेस असलेला पीर दाऊद मलिक दर्गा मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. 

याशिवाय गोरेगाव हे अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे गावही आहे. प्रसिद्ध ज्योतिषी वासुदेव मल्हार जोशी, जुनागड बहुद्दीन कॉलेजमधील संस्कृत भाषेचे प्राध्यापक महादेव मल्हार जोशी, भारत समाज सेवा सोसायटीचे सभासद व कामगार पुढारी नारायण मल्हार जोशी आणि महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून प्रसिद्ध असलेले प्रख्यात कादंबरीकार वामन मल्हार जोशी हे मूळचे गोरेगावचेच सुपुत्र. वामन मल्हार जोशी यांच्या स्मरणार्थ गोरेगाव मध्ये ज्ञान विकास वाचनालय नावाचे वाचनालय देखील सुरु करण्यात आले जे तालुक्यातील प्रमुख वाचनालय म्हणून प्रसिद्ध होते आणि अनेक मराठी व इंग्रजी ग्रंथ या वाचनालयात उपलब्ध आहेत.

महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी गोरेगाव येथील समाजसुधारक बंधू शंकरराव खुळे, अनंतराव खुळे व भास्करराव खुळे यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला होता व सत्याग्रहात सक्रिय सहभाग नोंदवला होता. अशा या थोर माणसांची भूमी व प्राचीन व्यापारी केंद्र असलेल्या गोरेगाव शहरास रायगड जिल्ह्याची ग्रामसंस्कृती पाहण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक पर्यटकाने एकदा तरी भेट द्यायलाच हवी.