पुण्याचा प्रसिद्ध लाकडी अथवा लकडी पूल

लाकडी पूल हा पुण्यातील नारायण पेठ या परिसरात असून तो मुठा नदीवरील एक कमी उंचीचा पूल मानला जातो व त्यामुळे जेव्हा मुठा नदीस पूर येतो त्यावेळी प्रथम हा पूल पाण्याखाली जातो.

पुण्याचा प्रसिद्ध लाकडी अथवा लकडी पूल
लकडी पूल

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर हे मुळा व मुठा या दोन नद्यांच्या संगमावर असल्याने यास पूर्वी पुण्यभूमी म्हणूनही ओळखले जात असे. सध्याच्या पुणे शहराच्या अंतर्भागातून वाहणारी एक प्रमुख नदी म्हणजे मुठा. आज मुठा नदीच्या दोन्ही बाजू पुणे शहरात समाविष्ट असल्या तरी फार पूर्वी नदीच्या तीराच्या दक्षिणेकडील बाजू हीच पुणे शहराचा भाग होती व उत्तर बाजूस भांबुर्डा नावाचे एक दाट अरण्य होते. हे भांबुर्डा आधुनिक युगात डेक्कन जिमखाना अथवा शिवाजी नगर या नावाने प्रसिद्ध आहे.

पुण्याच्या उत्तर भागातून दक्षिण भागात जाण्यासाठी अथवा दक्षिण भागातून उत्तर भागात जाण्यासाठी मुठा नदी पार करण्याशिवाय पर्याय नसतो व त्यामुळे या नदीवर अनेक पूल उभारलेले दिसून येतात. सध्या मुठा नदीवर दिसून येणारे अनेक पूल हे एक तर ब्रिटिशकालीन आहेत अथवा स्वातंत्र्योत्तर काळात बांधले गेलेले आहेत. असे असले तरी या पुलांची नावे ही आजही जुन्या काळातीलच आहेत व अशा पुलांपैकी एक प्रसिद्ध पूल म्हणजे लकडी पूल अथवा लाकडी पूल.

लाकडी पूल हा पुण्यातील नारायण पेठ या परिसरात असून तो मुठा नदीवरील एक कमी उंचीचा पूल मानला जातो व त्यामुळे जेव्हा मुठा नदीस पूर येतो त्यावेळी प्रथम हा पूल पाण्याखाली जातो. या पुलाचे नाव लाकडी पूल असे असल्याने हा पूल लाकडाचा आहे की काय असे हे नाव प्रथमच ऐकणाऱ्यास वाटू शकते मात्र ज्यावेळी हा पूल आपण पाहतो त्यावेळी मात्र हा एक पाषाणांनी तयार करण्यात आलेला पूल असल्याचे आपल्याला दिसून येते त्यामुळे या दगडांनी बांधलेल्या या पुलास लाकडी पूल असे नाव का मिळाले याचे उत्तर जाणून घेणे गरजेचे आहे.

या पुलास लाकडी पूल असे नाव मिळण्याचे कारण म्हणजे ज्यावेळी हा पूल प्रथम बांधला गेला तेव्हा तो लाकडांनीच बांधला गेला होता. या पुलाचा निर्मितीकाळ अठराव्या शतकातील म्हणजे १७६१ सालातील आहे. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली याच्या विरोधात झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागले. अनेक माणसे मारली गेली व अनेक जण घायाळ झाली. 

युद्धांचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते ते सदाशिवराव पेशवे आणि भावी पेशवे विश्वासराव आणि इतर अनेक प्रमुख व्यक्ती या युद्धात मराठ्यांनी गमावल्या व असा दुःखद प्रसंग घडल्यावर जेव्हा सरदार व सैन्यास पुन्हा पुण्यात येणे भाग होते त्यावेळी एक पराजयाची भावना मनात घेऊन शहरात प्रवेश करणे योग्य दिसणार नाही असे सर्वांना वाटले आणि त्यापेक्षा मागील दिशेने शहरात प्रवेश करावा असे ठरले आणि त्यासाठी उपयुक्त जागा होती ती म्हणजे पुण्याच्या उत्तरेकडील भांबुर्डा. भांबुर्डा हे त्याकाळी अतिशय अरण्यमय असे होते व तेथे लोकवस्ती अतिशय तुरळक होती. 

भांबुर्ड्यावरून पुण्यात प्रवेश करायचा झाला तर सर्वात मोठा पेच होता तो म्हणजे मुठा नदी पार करायचा मग ही नदी पार करणे शक्य व्हावे म्हणून लाकडाच्या मोठं मोठ्या फळ्या तयार करून त्या या नदीवर बांधण्यात आल्या आणि त्यानंतर जो लाकडांचा पूल बनला तो लाकडी पूल या नावानेच ओळखला गेला. असे म्हणतात की या पुलाचे काम फक्त सहा दिवसांत पूर्ण करण्यात आले होते. पुण्यात रेल्वेचे आगमन होण्यापूर्वी मुठा नदी पार करून पुण्याच्या बाहेर पडायचे झाले तर लाकडी पुल पार करूनच जावे लागत असे.

अशाप्रकारे १७६१ साली बांधला गेलेला हा लाकडी पूल १८४० पर्यंत म्हणजे ७९ वर्षे मुठा नदीवर शाबूत होता मात्र १८४० साली आलेल्या एका मोठ्या पुरात हा पूल पूर्णपणे वाहून गेला. १८१८ सालीच पुण्याचा कारभार ब्रिटिशांकडे आला असल्याने १८४० साली पुण्यात त्यांचेच प्रशासन होते व लाकडी पूल वाहून गेल्याने नवा पूल उभारण्याची गरज भासली तेव्हा ब्रिटिशांनी त्याच वर्षी ब्रिटिशांनी स्वतःच्या फंडातून व काही स्थानिक लोकांच्या देणगीतून तेव्हाचे ४७००० रुपये जमवले आणि नवा दगडांचा पूल बांधला. अशाप्रकारे पूर्वीचा लाकडी पूल हा नंतर दगडी पूल झाला असला तरी लोकांच्या तोंडी याचे जे जुने नाव बसले होते ते तसेच कायम राहून तेव्हापासून ते आजतागायत २६१ वर्षे झाली तरी या पुलास लाकडी पूल या नावानेच ओळखले जाते. लाकडीपुलाच्या उत्तरेस पांचाळेश्वर महादेवाचे एक सुंदर मंदिर आहे.

पुणे महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी या पुलाचे छत्रपती संभाजी महाराज पूल असे नामकरण केले मात्र पुण्याच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा पूल पुण्यास भेट देणाऱ्यांनी एकदा तरी नक्की पाहावा.