वालीपुत्र अंगद

अंगद हा बालपणापासूनच अत्यंत हुशार व संभाषणकलेत निपुण होता व त्यास गुरु अर्थात बृहस्पतीचा आशीर्वाद प्राप्त होता.

वालीपुत्र अंगद
अंगद

भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन इतिहास ग्रंथ मानल्या जाणाऱ्या रामायणातील एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणजे अंगद. अंगद हा किष्किंधेचा राजा वाली याचा पुत्र.  अंगदच्या आईचे नाव तारा असे होते.

अंगद हा बालपणापासूनच अत्यंत हुशार व संभाषणकलेत निपुण होता व त्यास गुरु अर्थात बृहस्पतीचा आशीर्वाद प्राप्त होता. वाली आणि सुग्रीव या दोन बंधूंमध्ये द्वंद्वयुद्ध झाले त्यावेळी रामाचा बाण लागून वालीचा मृत्यू झाला व यानंतर अंगद वयाने लहान असल्याने किष्किंधा राज्याच्या राजपदी रामाने जरी सुग्रीवास बसवले असले तरी त्याने वालीपुत्र अंगद यास युवराजपद बहाल केले होते.

ज्यावेळी लंकाधिपती रावणाने सीतेचे हरण करून तीस लंकेस नेले त्यावेळी प्रथमतःसीतेचे हरण नेमके कुणी केले आहे हे रामास ठाऊक नव्हते त्यामुळे त्याने सीतेच्या शोधासाठी वानरांची मदत घेतली व चारही दिशांना आपले वानर दूत पाठवले होते. दक्षिण दिशेस सीतेचा शोध घेण्यासाठी रामाने हनुमानाची व इतर वानरांची निवड केली होती व या गटाचे प्रमुखपद अंगदकडे सोपवण्यात आले होते. 

अंगद हनुमानादी वानरांसह दक्षिणेस जाऊन सीतेचा शोध घेत होता मात्र या शोधास महिन्याहून अधिक काळ लोटला तरी सीता नक्की कुठे आहे याचा पत्ता लागत नसल्याने उद्विग्न होऊन अंगदाने प्राणत्यागाचा निश्चय केला होता मात्र संपाती या पक्ष्यांच्या राजाची भेट होऊन त्याच्यामार्फत सीता लंकेस आहे हे अंगदास समजले आणि यानंतर मारुतीराय सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला.

हनुमानाने सीतेचा शोध लावल्यावर ही आनंदाची बातमी घेऊन अंगद पुन्हा एकदा किष्किंधेस गेला आणि रामास सीतेचे हालहवाल कथन केले. कालांतराने सीतेची मुक्तता करण्यास राम, लक्ष्मण, समस्त वानरसेना व इतर राजे लंकेवर गेले त्यावेळी प्रथम हा प्रश्न समेटाने सोडवण्यासाठी रामाने रावणाशी चर्चा करण्यासाठी संभाषणकलेत निपुण अशा अंगदाचीच निवड केली होती.

अंगद जेव्हा रावणास भेट घेतला त्यावेळी त्याने केलेल्या उपदेशाचा रावणाने अवमान करून अंगदाचा अपमान केल्याने अंगद तेथून पुन्हा आला आणि  रावण समेटास तयार नाही असे रामास कळविले व यानंतर रामाने युद्धाची तयारी करून लंकेवर हल्ला केला व यानंतर काही काळात रामाने रावणाचा पूर्णतः पराभव करून सीतेची कैदेतून मुक्तता केली.

या युद्धात अंगदाने सुद्धा खूप पराक्रम गाजवला आणि कंपन, विकट, प्रजंघ आणि रावणाच्या पक्षातील इतर अनेक राजांना मारले. लंकेत विजय प्राप्त करून राम आपल्या लोकांसहित पुन्हा एकदा अयोध्येस परतला त्यावेळी त्याने अनेक वर्षे राज्य केले आणि रामराज्य काय असते याची प्रचिती दिल्यावर ज्यावेळी राम निजधामास निघाला त्यावेळी त्याच्यासहित किष्किंधेचा राजा सुग्रीव सुद्धा होता व निजधामास जाता जाता सुग्रीवाने अंगदास किष्किंधा नगरीचे राजपद दिले आणि पुढे अंगदाने या नगरीत उत्तम राज्यकारभार केला.