इंद्र - देवांचा राजा

ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या दिवसाचा अर्थात कल्पाचा आरंभ झाला तेव्हापासून एकूण सहा इंद्र स्वर्गलोकी राज्य करिते झाले.

इंद्र - देवांचा राजा
इंद्र

हिंदुधर्मात देवांना मानले जाते आणि देवांचा निवास स्वर्गात असतो असे म्हटले जाते. मनुष्य जसा पृथ्वीलोकात राहतो तसेच देव हे स्वर्गलोकात राहतात आणि त्यांचा राजा इंद्र असतो असे आपण कायमच ऐकून आहोत मात्र इंद्र ही देवता म्हणजे नक्की कोण आणि इंद्र या नावाचा अर्थ काय हे मात्र अनेकांना फारसे ठाऊक नसते आणि हिंदुधर्मातील जे धार्मिक ग्रंथ आहेत त्यामध्ये इंद्राचा उल्लेख कायमच येत असतो तेव्हा इंद्र या देवतेचे अस्तित्व नक्की कधीपासून आहे हा प्रमुख प्रश्न आपल्यासमोर उभा असतो.

इंद्र या देवतेचे नाव वेदांतही आढळते. इंद्राचे वाहन ऐरावत नामक हत्ती असून स्वर्गलोकात अमरावती हे स्थळ त्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. इंद्राकडे वज्र नामक एक शक्तिशाली शस्त्र असून इंद्रास्त्र आणि ऐन्द्रेयास्त्र नामक अस्त्र आणि वासवी शक्ती नामक विद्या आहे.

मुळात इंद्र हे नाव नसून ते पद आहे. इंद्र म्हणजे राजा त्यामुळे देवांचा जो राजा तो इंद्र. देवतांचे आयुष्यमान हे मनुष्याच्या आयुष्यमानाहून कितीतरी पटीने अधिक मानले गेले आहे आणि देवांचा एक दिवस म्हणजे मनुष्याचे एक वर्ष अर्थात ३६० दिवस आणि देवांचे एक वर्ष म्हणजे मानवाची ३६० वर्षे.

त्यानतंर येते ते एक प्रचंड युग मापक परिमाण व त्यास कल्प असे नाव आहे कल्पास ब्रह्मदेवाचा दिवस असेही म्हटले जाते. युगपद्धतीत जी चार युगे सांगितली गेली आहेत ती म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही आहेत आणि ही चारही युगे मिळून एक महायुग होते आणि अशी १००० महायुगे मिळून एक कल्प होते त्यामुळे या कल्पाचा विस्तार किती आहे हे लक्षात येऊ शकेल.

ब्रह्मदेवाचा एक दिवस जसा कल्प असतो तसेच त्याची रात्रही कल्पाएवढीच मोठी असते आणि ब्रह्मदेवाचे दिवस आणि रात्री मिळून अहोरात्र अर्थात दोन कल्प होतात. 

आपण कल्पाची माहिती यासाठी जाणून घेतली कारण कल्पाचा संबंध इंद्राशी असून ब्रह्मदेवाच्या एका दिवसात म्हणजे एका कल्पात स्वर्गात एकूण चौदा इंद्र होऊन जातात आणि इंद्र हे मुळात पद असल्याने या चौदा इंद्राची नावे सुद्धा वेगवेगळी आहेत. 

या चौदा इंद्राची नावे खाली क्रमाने जाणून घेऊ

  1. यज्ञ
  2. रोचन
  3. सत्यजित
  4. त्रिशिख
  5. विभू
  6. मंत्रदुम
  7. पुरंदर
  8. बली
  9. अद्भुत
  10. शंभू
  11. वैधृती
  12. ऋतधामा
  13. दिवस्पती 
  14. शुचि

ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या दिवसाचा अर्थात कल्पाचा आरंभ झाला तेव्हापासून एकूण सहा इंद्र स्वर्गलोकी राज्य करिते झाले आणि सध्या स्वर्गात पुरंदर नामक इंद्र विराजमान असून त्यानंतर अनुक्रमे बली, अद्भुत, शंभू, वैधृती, ऋतधामा, दिवस्पती, शुचि हे इंद्रपदी विराजमान होतील मात्र यासाठी प्रचंड मोठा काळ लोटणार आहे कारण तब्बल १००० महायुगे मिळून एक कल्प होतो.

राजाच्या पत्नीस जसे राणी म्हटले जाते तसे इंद्राच्या पत्नीस इंद्राणी अथवा इंद्रायणी म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे इंद्र हे नाव की पद या प्रश्नाची उकल झाली असेल असे समजण्यास हरकत नाही.