अष्टागरे - महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव

सप्त कोकणांमध्ये महाराष्ट्रातील जो कोकण प्रदेश येतो त्यामध्येही विविध भाग होते यापैकी प्रसिद्ध भाग म्हणजे शूर्पारक आणि अष्टागर.

अष्टागरे - महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

सह्याद्रीच्या पश्चिमेस असलेला प्रदेश हा अपरांत या नावाने ओळखला जातो. अपरा म्हणजेच भूमी आणि ज्या ठिकाणी भूमी संपून समुद्र सुरु होतो तो भाग म्हणजे अर्थातच कोकण याकरिताच कोकणास अपरान्त ही संज्ञा फार प्राचीन काळापासून मिळाली होती. या अपरांतात फक्त कोकणच नव्हे तर गुजरात पासून केरळ पर्यंत असलेली संपूर्ण किनारपट्टी येते. 

या अपरांतात एकूण सात प्रदेश येतात ज्यांना सप्त कोंकण असे म्हंटले जात असे. कूपक, केरळ, मूषक, आळूक, पशु, कोंकण आणि परकोंकण अशी  ही सात कोकणांची नावे. या सप्त कोकणांमध्ये महाराष्ट्रातील जो कोकण प्रदेश येतो त्यामध्येही विविध उपविभाग होते यापैकी प्रसिद्ध भाग म्हणजे अष्टागर.

अष्ट म्हणजे आठ व आगर म्हणजे स्थळ. ज्या ठिकाणी नारळी पोफळीची दाट झाडे असतात आणि जेथे मिठाचे उत्पादन होते त्या भागास आगार म्हटले जात असे.

कोकणातील ही अष्टागरे रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात असून ती अनुक्रमे सासवणे, किहीम, थळ, अलिबाग, साखर, अक्षी, नागांव व चौल अशी आहेत. या नावांबद्दल सुद्धा मतभिन्नता आहे मात्र अनेक अभ्यासकांनी वर उल्लेखलेली ठिकाणे हीच पूर्वीची अष्टागरे असा उल्लेख केला आहे. 

अष्टागारातील भूमी ही खाड्या व समुद्र यांनी वेढलेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी समुद्राचे पाणी खाड्यांच्या माध्यमातून येथील सखल, सपाट जमिनीमध्ये शिरून त्या जमिनींना खारे बनवते त्यामुळे या जमिनी इतर कुठले उत्पादन घेण्यास अपात्र असतात मात्र याच जमिनींवर मिठाचे उत्पादन विपुल प्रमाणात घेण्यात येते.

याशिवाय अष्टागारातीलचं अनेक जमिनी या सुपीक असून तेथे नारळ व सुपारीचे उत्पादन विपुल प्रमाणात घेतले जाते. अष्टागारात तांदळाचे व माशांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असल्याने अलिबाग तालुक्यास भाताचे कोठार या नावाने ओळखण्यात येते.

अष्टागराचा प्रदेश हा सुपीक व सपाट असून पाणीही मुबलक असते त्यामुळे दक्षिण कोकणातील जमिनी व अष्टागारातील जमिनी यामध्ये थोडा फरक दिसून येतो.

अष्टागारातील मूळ निवासी म्हणजे आगरी, कोळी व भंडारी कारण अष्टागरांची मुख्य ओळख म्हणजे मीठ, मासे व नारळ सुपारी आणि ही उत्पादने घेणारे लोक म्हणजेच आगरी, कोळी व भंडारी.

कोकणच्या लोकांनी आपली संस्कृती पूर्वापार जपली आहे आणि अष्टागारातील लोकांनी तर विशेषच आजही अष्टागारातील कुठल्याही गावात गेल्यास येथील नागरिकांनी आपल्या परंपरा, निसर्ग जपलेला दिसून येतो.

ही सुजाणता त्यांना येथील निसर्गानेच दिली आहे. या निसर्गानेच त्यांना भरभरून दिले आहे त्यामुळे निसर्गास ओरबाडून केलेला विकास ही कल्पना त्यांना बिलकुल मान्य नाही यामुळेच अष्टागाराचे मूळ रूप आजही जसेच्या तसे टिकून आहे. काळानुसार प्रत्येक भूभागाचा जसा विकास झाला तास अष्टागरांचाही झाला मात्र हा विकास तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश न करता झाला.

अष्टागारातील जनतेची निसर्गाप्रती असलेली ही कृतज्ञता जर आपण स्वीकारली आणि निसर्गाचा नाश न करता विकास केला तर निसर्गही नक्कीच आपल्यास भरभरून देईल नाही का?