देगांव - वीरगळींचे नैसर्गिक संग्रहालय

महाराष्ट्राच्या पुरातत्वीय वैभवात वीरगळींना अनन्यसाधारण महत्व आहे. वीरगळ म्हणजे केवळ एक शिल्पकृती नसून प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील वीरांची स्मारके असत.

देगांव - वीरगळींचे नैसर्गिक संग्रहालय

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

त्याकाळी लेखांतून न लिहिलेल्या घटना वीरगळीतील दृश्यांच्या माध्यमातून कोरण्यात येत असत. पूर्वी एखाद्या ठिकाणी युद्ध झाले की त्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांची स्मारके म्हणजेच वीरगळ.

वीरगळ हा शब्द वीरकलल या कन्नड शब्दापासून तयार झाला आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात व दक्षिण भारतात वीरगळी खूप प्रमाणात आढळतात. वीरगळी तयार करण्याची परंपरा केव्हापासून सुरु झाली यावर मत मतांतरे असली तरी अगदी शिवकाळापर्यंत वीरगळी तयार करण्याची प्रथा होती असे दिसून येते. 

महाराष्ट्रात अनेक गावांत कमीत कमी एक वीरगळ सापडतेच यावरून त्या गावाचा इतिहास जाणून घेण्यास मदत होते. वीरगळ म्हणजे एका आयत्याकृती उभ्या पाषाणावर कोरलेले वीराच्या मृत्यूपूर्वीचे व मृत्यूनंतरचे प्रसंग असतात यामध्ये प्रसंगांची खालून वर अशा दिशेने मांडणी केली असते.

उदाहरणार्थ पहिल्या प्रसंगात युद्ध सुरु असल्याचा प्रसंग असतो, त्याहून वर युद्धात वीर मृत्यू पावल्याचा प्रसंग असतो आणि सर्वात शेवटी मृत्यूनंतर त्यास स्वर्गात स्थान मिळाल्याचे दृश्य कोरलेले असते यावरून आपणास अंदाज येऊ शकेल की वीरगळीची रचना सहसा कशी असते. अर्थात वेगवेगळ्या ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भानुसार दृश्यांत बदल होतो मात्र साधारण रचना अशाच पद्धतीची असते. 

महाराष्ट्रात असेही एक गावं आहे जेथे एक दोन नव्हे तर अनेक वीरगळी आहेत आणि आजही खूप चांगल्या अवस्थेत आहेत.

हे गाव म्हणजे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातले देगाव. येथे येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या माणगांव वरून मोरबे या गावास जाणाऱ्या रस्त्यावरून मोरबे गाव गाठावे व तेथून डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्यावरून देगांव हे गाव गाठता येते. या रस्त्यावरून देगांव येथे असताना डाव्या बाजूस एक कालवा आपली सोबत करत असतो. या कालव्याच्या पाण्याने परिसरातील शेतीस पाणी मिळते.

देगावहून थोड्या अंतरावर शिवमंदिर लागते. अर्थात हे मंदिर देगांव मधीलच असले तरी गावाच्या बाहेर आहे. अनेकांना माहीत नसेल की पूर्वी शिवमंदिरे ही गावाच्या हद्दीजवळच असत आणि स्मशानभूमीसुद्धा शिवमंदिराच्या बाजूला असे मात्र आता अनेक गावांच्या हद्दी वाढल्यामुळे शिवमंदिरे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली दिसून येतात मात्र महाराष्ट्रातील अनेक छोट्या गावांमध्ये आजही शिवमंदिर हे गावाच्या हद्दीजवळ शांत ठिकाणी पाहावयास मिळते.

तेव्हा या शिवमंदिराजवळच या वीरगळी पाहावयास मिळतात. यातील काही वीरगळी अतिशय उत्तम पद्धतीने जतन करण्यात आल्या असून अनेक वीरगळी कालौघात भग्न झाल्या आहेत.

वीरगळींमध्ये अनेक धार्मिक प्रसंग कोरले आहेत यामध्ये रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक कथांमधील अनेक प्रसंगाचा समावेश आहे. ज्या ठिकाणी या वीरगळी आहेत त्याच ठिकाणी शिवमंदिर असून स्मशानभूमी सुद्धा आहे.

सध्याचे शिवमंदिर नवे बांधले असले तरी मूळ शिवमंदिर अतिशय भव्य असावे मात्र मध्ययुगात त्याचे नुकसान करण्यात आले असावे. या वीरगळी या शिवमंदिराच्या परिसरात का असा प्रश्न पडेल तर दोन शक्यता आहेत की याच मंदिर परिसराच्या आसमंतात झालेल्या संग्रामाची स्मारके म्हणजे या वीरगळी अथवा देगांव च्या परिसरात झालेल्या संग्रामात धारातीर्थी पडलेल्या वीरांचे अंत्यसंस्कार या परिसरात झाले असावेत व त्याच ठिकाणी ही स्मारके बांधली गेली असावीत. 

वीरगळींवर अभ्यास करणाऱ्यांच्या हे लक्षात येईल की सहसा वीरगळींवर शैव संप्रदायाचा प्रभाव दिसून येतो आणि आधुनिक युगातही आपण मृत माणसाच्या पुढे कैलासवासी लावतोच नाही का?

या वीरगळी ग्रामस्थांनी खूप चांगल्या रीतीने जपल्या आहेत मात्र या वीरगळींवर अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे व जर या बाबतीत जनजागृती झाली तर वीरगळींचे हे नैसर्गिक संग्रहालय पाहावयास अनेक अभ्यासक व पर्यटक येऊ शकतात व परिसरातील नागरिकांचा पर्यटनाच्या माध्यमातून विकासही होऊ शकतो. दृढ निर्धार असेल तर काहीच अशक्य नाही बरोबर ना?