मुरुड-जंजिरा - एक अव्वल दर्ज्याचे पर्यटनस्थळ

रायगड जिल्ह्यात पर्यटनक्षेत्रे जागोजागी विखुरलेली आहेत, मात्र असे असले तरी या पर्यटनस्थळात अव्वल अशी काही ठरावीक पर्यटनस्थळे आहेत आणि त्यापैकीच एक आहे मुरुड्-जंजिरा.

मुरुड-जंजिरा - एक अव्वल दर्ज्याचे पर्यटनस्थळ
मुरुड-जंजिरा

पर्यटक जेव्हा केव्हा कोकणात पर्यटनास येतो तेव्हा त्याच्या ज्या प्रमुख अपेक्षा असतात त्या म्हणजे राहण्याची उत्तम सोय, किल्ले, अभयारण्ये, समुद्र (बीच), ऐतिहासिक वास्तू, धबधबे इत्यादी व ही सर्वच आकर्षणे मुरुड जंजिरा परिसरात विस्तृत प्रमाणात असल्याने पर्यटकांच्या सर्व गरजा पुर्ण करणारे हे स्वर्गातित पर्यटनस्थळ रायगड जिल्ह्यातले नंदनवन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

मुरुड जंजिरा परिसरात जी प्रमुख पर्यटनस्थळे आहेत त्यामध्ये जंजिर्‍याचा समावेश होतो. जंजिर्‍यास अतिशय मजबूत पक्या बांधणीचा तट आहे व १०० फुटाचे अंतर सोडून बांधलेल्या १९ अभेद्य बुरुजांमुळे हा किल्ला आणखी मजबूत झाला आहे. कमानदार अशा या बुरुजांच्या मधून बाहेरच्या दिशेला प्रचंड आकाराच्या तीन तोफा मांडल्या  आहेत यापैकी कलाल बांगडी व लांडा कासाम या तोफा मुख्य आहेत. याशिवाय किल्ल्यात दारुगोळ्याचे कोठार, खजिन्याचे कोठार, पाण्याची दोन तळी, दुमजली ईमला, किल्लेदाराचा वाडा, कोळीवाडा, काही हिंदू शिल्पे व बलुतेदारांच्या वस्त्या पहावयास मिळतात. मुरुड जंजिरा परिसराचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीवर वचक ठेवण्याकरीता मुरुड येथे बांधलेला कांसा उर्फ पद्मदुर्ग हा किल्ला. दांडा राजपुरी खाडी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते तिच्या मुखावरील एका प्रचंड खडकावर हा किल्ला शिवाजी महाराजांनी सन १६६३ साली बांधला. जंजिरा किल्ल्यापासून हा किल्ला  २ मैल अंतरावर असून किल्ल्यास प्रवेशस्वार व काही बुरुज आहेत. किल्ल्यात अनेक तोफा पहावयास मिळतात व आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव आहे.

याच पद्मदुर्ग किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या काळात समस्त मुरुडकरांचे श्रद्धास्थान ग्रामदेवता कोटेश्वरी देवीची स्थापना झाली होती, कोटेश्वरी अर्थात कोट (किल्ल्यातली) देवता मात्र कालांतराने पद्मदुर्ग सिद्दीच्या ताब्यात गेल्याने कोटेश्वरी देवीचे स्थान मुरुड गावाच्या वेशीपाशी आले. कोटेश्वरी ही देवी फक्त मुरुडच्याच नव्हे तर राज्यातल्या विवीध ठिकाणच्या ग्रामस्थांची कुलदेवता आहे, सिद्दी नवाबांच्या व त्यांच्या धर्मगुरुंच्या काही कबरी खोकरी या ठिकाणी आहेत. खोकरीचे घुमट म्हणुन या अरबी शैलीच्या वास्तू प्रसिद्ध आहेत. सिद्दी सिरुलखान, सिद्दी खैरियत व सिद्दी याकुतखान यांच्या कबरीसुद्धा याच ठिकाणी आहेत.

या शिवाय जंजिरा संस्थानाचे भुतपुर्व नवाब सिद्दी अहमदखान यांनी विक्टोरिया राणीच्या भारत भेटीची आठवण म्हणून गारंबीच्या घनदाट जंगलात धरण बांधून त्यास "विक्टोरिया ज्युबीली वॉटर वर्क्स" हे नाव दिले. नैसर्गिकरित्या पाणी अडवून बांधलेले हे धरण गारंबीचे धरण म्हणुन प्रसिद्ध आहे. शहरास पिण्याचे पाणी याच ठिकाणावरुन पुर्णपणे नैसर्गिक प्रवाहाच्या वेगाचा वापर करुन केले जाते व पर्यटकांचे हे आवडीचे ठिकाण आहे.

मुरुड जंजिरा संस्थानाच्या नवाबांनी आपली शिकारीची हौस पुर्ण करण्यासाठी उत्तर भागाकडूल जंगलाचा एक मोठा पट्टा फक्त खाजगी शिकारीकरीता राखिव ठेवला होता ज्याचे कालांतराने फणसाड अभयारण्यात रुपांतर करण्यात आले. मुरुड येथून जंजिर्‍याकडे जाताना एकदरा गाव डोंगर्‍याच्या पुर्वेस वसले आहे. हे एकदरा गाव म्हणजे जंजिरा किल्ला सिद्दीच्या ताब्यात गेल्यानंतर तेथील स्थानिक कोळ्यांनी केलेले वस्तीचे ठिकाण . याच ठिकाणी संभाजी महाराजांनी बांधलेल्या सामराजगडाचे अवशेष पहायला मिळतात. याच डोंगराच्या कपारीमध्ये गायमुख हे स्थान आहे.

शहराच्या उत्तरेस दोन जुळ्या टेकड्या आहेत यापैकी एका टेकडीवर मुस्लिम बांधवांचे ईदगाह हे स्थान आहे तर दुसर्‍या टेकडीवर हिंदूं बांधवांचे दत्तमंदीर आहे, या निसर्गरम्य टेकड्यांवरुन मुरुड जंजिर्‍याचा संपुर्ण आसमंत दृष्टीक्षेपात येतो. दत्तमंदिराच्या टेकडीवरुन पुढे गेल्यावर एक पुरातन शिवमंदिर लागते ज्यास क्षेत्रपाल शिवमंदीर म्हणून ओळखतात, शिलाहारांच्या ताम्रपटात उल्लेख असलेले मरुदेश्वर शिवमंदीर कदाचित हेच असावे कारण या मंदिराजवळ असणारी दगडी विहीर फार पुरातन बांधणीची आहे.

अलिबागमार्गे मुरुडमध्ये शिरताना डोंगरमाथ्यावरील एका कड्यावर एक भव्य नवाबकालिन राजवाडा आहे, जंजिरा संस्थानाचे नवाब यांच्या निवासाचे हे स्थान. स्वातंत्र्यानंतर नवाबांचे कुटूंब इतरत्र स्थालांतरीत झाले असले तरी हा राजवाडा आजही त्यांची खाजगी मालमत्ता आहे, काही काळापुर्वी पुर्वपरवानगीने वाड्याचे आतून दर्शन घेता येत असे मात्र सध्या ते बंद केले आहे. या राजवाड्यातल्या मुख्य दालनातील नवाबकालीन वस्तू पाहिल्या की जंजिरा संस्थानाच्या नवाबांच्या थाटाची कल्पना येते. याच राजवाड्यात व परिसरात पुर्वी पुराना मंदीर, पुरानी हवेली अशा काही भयपटांचे चित्रीकरण झाल्याने अनेक पर्यटकांचे हा राजवाडा खास आकर्षण आहे.

येथील खोरा बंदर हे प्राचिन मुख्य बंदर व दंडाराजपुरी हे सिद्दींच्या वंशजांची वस्ती असलेले गाव इत्यादी पर्यटकांची प्रमुख आकर्षणाची ठिकाणे आहेत. मुरुड जंजिरा परिसर फार पुर्वीपासून प्रख्यात आहे तो येथील विस्तीर्ण, अथांग अशा सिंधूसागरास खेटून असलेल्या स्वच्छ व सुंदर अशा समुद्र किनार्‍यासाठी, पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षीत असा हा किनारा कुशीत सुरुंच्या बनांच लेण परिधान करुन आहे. या किनार्‍यावरुन चौफेर नजर टाकली असतात विस्तीर्ण अरबी समुद्र, पद्मदुर्ग किल्ला, उजव्या बाजूस नवाबकालीन राजवाडा, डावीकडे दांडा राजपुरी टेकड्या आणि या सर्व  निसर्गदृश्यांची झालर पांघरुन नारळी पोफळींच्या बागांमध्ये लपून गेलेले मुरुड शहर पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते व किनार्‍यावरील चकचकीत रुपेरी वाळू, जलचरांनी वाळूवर रेखाटलेल्या रांगोळ्या, रंगीबेरंगी शंख-शिंपले व मुरुड समुद्रकिनार्‍यावरील संध्याकाळचा सुर्यास्त अनुभवण्याचे भाग्य असंख्य पर्यटक दर सुट्टीत अनुभवत असतात. अर्थात या सौंदर्याची मजा फक्त वर्णन ऐकुन मिळणारी नाही तर प्रत्यक्ष भेट देऊनच अनुभवता येणारी असल्याने प्रत्येकाने एकदातरी पर्यटकांचे नंदनवन मुरुड जंजिर्‍यास भेट द्यावी, नक्कीच आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.