तेरवण ते तिलारी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरण या दोन्ही पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

तेरवण ते तिलारी

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील विशेषत: गोवा राज्यात येणारे देशी-विदेशी पर्यटकही या दोन्ही पर्यटन स्थळांना आवर्जून भेटी देत आहेत. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याने त्यांच्यात सध्या समाधानाचे वातावरण आहे.

तिलारी प्रकल्पांतर्गत साकारलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा आणि गोवा व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी येथील साकारलेले कोकणातील सर्वात मोठे मातीचे धरण ही दोन्ही पर्यटन स्थळे पर्यटकांना विशेष आकर्षित करीत आहेत. पर्यटकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, वनभोजनेही या पर्यटनस्थळावर मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहेत. तसेच दोडामार्ग तालुक्यालगतच्या गोवा राज्यात येणारे देशी-विदेशी पर्यटकही तिलारी येथील या पर्यटनस्थळावर येऊ लागल्याने दोडामार्ग तालुक्यातील पर्यटन वाढीची नांदीच आहे.

तिलारी धरणाचे पाणी उजव्या कालव्यातून सासोलीमार्गे गोव्यात वितरित केले जाते. त्याचबरोबर गोव्याच्या सीमेवरील गाळेल-डिंगणे येथून बांदामार्गे कालव्यातून हे पाणी पुन्हा महाराष्ट्रात म्हणजे ओटवणे परिसरात आणण्यात आले आहे. डिंगणे येथून या कालव्याची लांबी सुमारे २९ कि.मी. आहे. बांद्यातून वाफोली, विलवडे, सरमळेतून हा कालवा ओटवणे येथे आला आहे. या कालव्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. धरणाचे पाणी ओटवणे कालव्यात आल्यानंतर नाल्याद्वारे हे पाणी या भागातून वाहणार्‍या तेरेखोल नदीत सोडण्यात आले आहे.

बागायती शेतीसाठी पाण्याच्या बाबतीत हा परिसर पूर्वीपासूनच सुजलाम-सुफलाम आहे. कालव्यामुळे हा परिसर समृध्द झाला आहे. या कालव्यामुळे कृषीप्रधान ओटवणे परिसरातील शेती अधिक बहरली आहे. अफाट निसर्गसौंदर्य लाभलेल्या ओटवणे परिसरातून हा कालवा जात असून, कालव्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी असलेल्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे हा परिसर पर्यटनस्थळ म्हणूनही पुढे येत आहे. या कालव्यादरम्यान दोन ठिकाणी तेरेखोल व दाभिल नदीवर सुमारे २५ कोटी रुपये खर्चून दोन आकर्षक जलसेतू उभारण्यात आले आहेत. ते या भागाच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण व तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात भुरळ घालत आहेत. तिलारी धरणातील मुबलक पाणीसाठा, सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा व धरणाच्या बुडीत क्षेत्रात असणारे रानटी हत्तींचे वास्तव्य यामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांना अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. हत्तींच्या वास्तव्यामुळे (तिलारी धरण पर्यटन स्थळाचे नाव) महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पोहोचले आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या तेरवण-मेढे उन्नेयी बंधार्‍यासाठी असलेला मुबलक पाणीसाठा, सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍या, सुंदर बगीच्या, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य व महाराष्ट्रातील सर्वात छोट्या अवघ्या दोन मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प यामुळे या ठिकाणी एकदा येणारा पर्यटक तेथील सौंदर्याच्या मोहात पडतोच! साहजिकच तो पुन्हा या पर्यटन स्थळावर आल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस या दोन्ही पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या लक्षणियरित्या वाढत आहे. मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत येथील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या १० हजारापेक्षा अधिक असल्याची नोंद आहे.

दोडामार्ग तालुक्यातील नावारुपास आलेल्या या दोन्ही पर्यटनस्थळांबरोबरच दोडामार्गचे श्रध्दास्थान असलेला कसईनाथ डोंगर, तेरवण-मेढे येथील नागनाथ तिर्थक्षेत्र, शिरवल धरण, तळकटची वनबाग, सासोली येथील निसर्गनिर्मित धबधबा, अलीकडेच सासोली सड्यावर आढळलेली भूरुपे-विवरे, उसप येथील पॅराग्लायडिंगसाठी उपयोग होणारा बोकारावाडी डोंगर, मांगेली याबरोबरच फुकेरी हनुमंतगड, सिंधुदुर्ग-कोल्हापूर सीमेवर वसलेला पारगड किल्ला आदी ठिकाणांकडेही पर्यटक फेरफटका मारु लागले आहेत.

- महान्युज