संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मुहुर्तमेढ
१९४७ साली भारत ब्रिटिशांच्या हातून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक प्रमुख घडामोडींचे केंद्रस्थान म्हणून रायगड जिल्ह्याकडे पाहिले जात असे.
भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर भाषावार प्रांतरचना व्हावी अशी मागणी अनेक स्तरांवरून होत होती.
भारत वैविध्यतेने नटलेला देश असून येथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. भाषावार प्रांतरचना केल्यास त्या त्या भागातल्या नागरिकांना सर्वच दृष्टीने सोयीचे पडेल असा विचार यामागे होता. याचवेळी भाषावार राज्य रचना करताना मुंबईसह महाराष्ट्र व्हावा अशी अपेक्षा मराठी जनतेची तसेच सर्व पक्षीय नेते मंडळींची होती.
मात्र पंतप्रधान नेहरु यांनी मराठी लोकांची ही मागणी धुडकावली त्यामुळे मराठी भाषिक सर्वपक्षीय नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. केंद्र सरकारकडून संयुक्त महाराष्ट्र राज्यांची मागणी मान्य करुन घेण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तसेच मुंबई सरकारमधील मराठी मंत्र्यांवर जबाबदारी टाकण्यात आली. यासाठी नॉर्थ बॉम्बे स्टुडंट युनियन व त्याचे नेते प्रभाकर कुंटे यांनी शिवाजी पार्क येथे भव्य मेळावा आयोजित केला होता.
या प्रसंगी अनेक काँग्रेस नेते या मेळाव्यात सहभागी झाले होते. मात्र नेहरुंसमोर गेल्यावर अनेक नेते आपले धैर्य गमावून बसले होते. एका ठिकाणी महाराष्ट्रातल्या नेते मंडळींनी दिल्लीत हार मानल्याचे चित्र असताना बाकीचे पक्षही उदासिन होते.
त्यामुळे सर्व संबंधितांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे अशी भावना कुलाबा जिल्ह्यातील नानासाहेब पुरोहित, सुरबानाना टिपणीस यांच्या मनात आली व यासाठी त्यांनी नागोठणे येथे येऊन बापु देशपांडे यांच्या घरी प्रभाकर कुंटे यांची भेट घेतली.
आपण स्वत:च पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी सर्वपक्षीय परिषद नागोठण्यात घ्यावी असे या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. या परिषदेसाठी आदल्या दिवशी प्रबोधनकार ठाकरे नागोठण्यात आले. ही परिषद नागोठण्यातले हिंदू महासभेचे नेते दिनाभाऊ नेने यांच्या घरी आयोजित करण्यात आली.
या परिषदेच्या निमित्ताने चैतन्यमयी वातावरण परिसरात तयार होऊन सर्व जाती- जमातीचे लोक संयुक्त महाराष्ट्राकरिता एकत्र आल्याचे दिसत होते. जिल्ह्यातूनच परिषदेसाठी पाचशे लोक आले होते. यामध्ये नाना पाटील, महम्मद पारकर, जयंतराव टिळक, युसुफ हाफिज, प्रभाकर पटवर्धन, दासगावचे कम्युनिस्ट नेते मोरे इत्यादिंचा समावेश होता. काँग्रेसचे महाडचे नेते सावंतही पक्षाचा आदेश धुडकवून लावत परिषदेत सहभागी झाले होते.
नागोठण्यातल्या सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मेहनत घेऊन ही परिषद यशस्वी केली. याच परिषदेत संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला.
अशा रितीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची मुहुर्तमेढ नागोठण्याच्या निर्धार परिषदेत पहिल्यांदा रोवली गेली. याच वेळी महाराष्ट्रातले राजकीय पक्ष या संदर्भात माघार घेण्याच्या तयारित असतानाच एस्. एम्. जोशी यांनी आता तुम्हाला काहीच करता येणार नसून माघार घेणे शक्यच नाही कारण नागोठणे येथे प्रभाकर कुंटे, नाना पुरोहित , सुरबानाना यांनी सर्वांना एकत्र आणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु केला आहे तेव्हा आपल्यालाही त्यांच्याबरोबर जावे लागेल असे सांगितले.
पुढे संपूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांची अशी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमास नागोठण्यातल्या निर्धार परिषदेतच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या खऱ्या अर्थी पाया रचला गेला. पुढे याच पायाचे एका मोठ्या चळवळीत रुपांतर होऊन १ मे १९६० रोजी मुंबईसहित महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास लिहीला जात असताना महाराष्ट्रातल्याच काही मंडळींनी मुहूर्तमेढीचे श्रेय स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न केले होते परंतु प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उगम नागोठण्यातच झाला असे स्पष्ट केले होते.