पुण्याच्या अप्पा बळवंत चौकाचा इतिहास
अप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक सरदार म्हणजे बळवंतराव मेहेंदळे. त्यांचेच पुत्र म्हणजे कृष्णराव बळवंत उर्फ अप्पा बळवंत मेहेंदळे.
पुण्यातीलच नव्हे तर समस्त महाराष्ट्रातील पुस्तकप्रेमींचे हक्काचे ठिकाण म्हणजे अप्पा बळवंत चौक. आधुनिक युगात या चौकाचे लाडाने ए.बी.सी. असे नामकरणही झाले आहे. एखादे पुस्तक कुठेही सापडत नसले तर ते अप्पा बळवंत चौकात हमखास सापडतेच असा या स्थानाचा महिमा.
पण या चौकास अप्पा बळवंत चौक असे का म्हणतात हे अनेकांना फारसे ठाऊक नाही. सहसा बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, सदाशिव पेठ, नारायण पेठ इत्यादी अनेक नावे ही थोर पुरुषांवरून दिलेली आहेत. सर्वांचा इतिहास प्रसिद्ध आहे. पण अप्पा बळवंत हे नाव तेवढे रोजच्या ऐकण्यात येत नाही त्यामुळे अप्पा बळवंत उच्चरले की समोर येतो तो फक्त अप्पा बळवंत चौक.
या लेखाच्या निमित्ताने आपण अप्पा बळवंत हे नक्की कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पेशवे दरबारातील एक सरदार म्हणजे बळवंतराव मेहेंदळे. बळवंत मेहेंदळे हे पानिपतमध्ये धारातीर्थी पडलेल्या वीरांपैकी एक.
पानिपत येथे ७ डिसेंबर १७६० साली नजीबखान रोहिल्याचा भाऊ सुल्तानखान याने १ हजार घोडदळ आणि ५ हजार पायदळ घेऊन सायंकाळी मराठ्यांवर हल्ला केला या लढाईत बळवंतराव मेहेंदळे यांच्या प्राणांची आहुती पडली. त्यांचेच पुत्र म्हणजे कृष्णराव बळवंत उर्फ अप्पा बळवंत मेहेंदळे.
रघुनाथ राव पेशवे यांच्या पक्षातील एक समर्थक अशी त्यांची सुरुवातीस ख्याती होती. मात्र ज्यावेळी हरिपंत फडके यांनी राघोबादादांचा पाठलाग सुरु केला तेव्हा दादासाहेब परागंदा होऊन इंदूरच्या होळकरांकडे आश्रयास गेले हे पाहून अप्पा बळवंत यांच्या मनात दादांविषयी जी प्रतिमा होती ती उतरली व आपल्याच्यानं तुमच्यासोबत पळवत नाही असे म्हणून बळवंतराव हरिपंत फडके यांना सामील झाले.
रघुनाथरावांनी सुरतेजवळ इंग्रजांकडे आश्रय घेतले तेव्हा हरिपंताच्या मार्फत हे दादासाहेबांसोबत पत्रव्यवहार करीत. १७८६ साली अप्पा, बाजीपंत आणि रघुनाथराव पटवर्धन हरिपंतांच्या आदेशानुसार टिपूवर निजामाच्या मदतीसाठी चालून गेले मात्र पुढे यांच्यात तह झाला.
अप्पा बळवंत हे अनेकदा नाना फडणीस यांच्यासोबतच असत. ज्यावेळी दौलतरावांनी नाना फडणीस यांना कैद केले त्यावेळीच दुसऱ्या बाजीरावाने संधीचा फायदा घेऊन अप्पा बळवंत आणि नाना फडणीस यांचे इतर साथीदार यांना अटक केले. आणि प्रत्येकाच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचा उद्योग सुरु केला. कैद व जप्ती यामुळे उद्दिग्न झालेल्या अप्पा बळवंत यांनी १७९८ साली स्वतःच्या जीवाचा शेवट करून घेतला.
अप्पा बळवंत यांनी आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत राज्यातील खूप घडामोडी पहिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल पुढील उद्गार काढले गेले.
आपा सारखा पुरुष होणे नाही. त्याजपाशी पैका मागो लागले तेव्हा अब्रूसाठी अमृत (विष) प्राशन केले आणि देवाधीन झाले.
अप्पा बळवंत चौकात अप्पांचा वाडा होता म्हणून या चौकास कायम अप्पा बळवंत यांच्या वाड्याचा चौक असेच म्हटले जाई.