सातवाहन - महाराष्ट्राचे आद्य राजघराणे

मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रावर सातवाहन साम्राज्याची सत्ता आली. हे राज्य महाराष्ट्राच्या उत्कर्षाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे होते.

सातवाहन - महाराष्ट्राचे आद्य राजघराणे

सातवाहन काळात भारताचा आफ्रिका, युरोप, रोम, ग्रीस, इजिप्त, अरब इत्यादी पश्चिमी राष्ट्रांशी व्यापार भरभराटीत होता. 

सातवाहन काळात पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रीक नावाचे अधिकारी सातवाहनांच्या अखत्यारीत अधिकार गाजवत होते तसेच कोकणावर महाभोज हे प्रांताधिकारी अधिकार गाजवत होते. कुडे-मांदाड येथील लेण्यांमध्ये महाभोजांची नावे कोकणाचे सामंत म्हणून आढळून येतात. याच काळात सोपाऱ्या (शुर्पारक) प्रमाणे चौल (चेमुल्य) अथवा चंपावती), साष्टी, वसई, कल्याण, ठाणे (स्थानक) यांना बंदर व व्यापारी केंद्र म्हणून महत्व आले.  

सातवाहन काळातला प्रसिद्ध राजा बलाढ्य सातवाहन नृपती प्रथम सातकर्णी याची राणी नागनिका हिचे वडील म्हणजे नागाधिपती महारठी काळकाय. नागनिका ही मराठी (महारठी) नागवंशीय होती असा उल्लेख नाणेघाटातल्या शिलालेखांमध्ये आढळून येतो. प्राचीन काळी निका हा शब्द स्त्री या अर्थी योजित असत. उदा., शकनिका म्हणजे शक स्त्री. तेव्हा नागनिका ही प्राचीन नागवंशात जन्मली होती, हे सिद्ध होते. नागनिका ही वेदश्रीची माता असून अतिशय पराक्रमी होती. सातकर्णीच्या मृत्यूनंतर वेदश्री लहान असताना तिने स्वत: राज्यकारभार सांभाळून अनेक दिग्विजय प्राप्त केले होते. यावरून कळून येते की, आपली महाराष्ट्रीय संस्कृती किती उच्च होती व स्त्रियांना येथे किती महत्वाचे स्थान होते. 

सातवाहन काळात नावापुढे आईचे नाव लावण्याची पद्धत होती. नागनिकेने दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ तसेच अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगालदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतातिरात्र यज्ञ केल्याचा निर्देश केला आहे. तसेच पती निधनानंतर तिने स्वयं (स्वत:) करविलेल्या अंगिरसामयन, त्रयोदशरात्र, दशरात्र इ. व्रतांचा उल्लेख आहे. या सर्व यज्ञांच्या नामनिर्देशांबरोबर दान दिलेल्या हजारो गाई, हत्ती, घोडे, रथ, कार्षापण नाणी, सोन्याचांदीचे अलंकार इत्यादींचा सविस्तर उल्लेख आहे. 

प्राचीन भारतातील अत्यंत प्रसिद्ध स्त्रियांमध्ये नागनिकेची गणना केली जाते. याचा अर्थ की, सातवाहन काळामध्येसुद्धा नागवंशीय लोकांचा कोकणातील सत्तेमध्ये महत्वाचा वाटा होता व अर्थात नागवंशीयांची वस्ती असलेले नागोठणेसुद्धा त्याकाळी भरभराटीच्या शिखरावर होते. सातवाहन वंश प्रथम महाराष्ट्रातून नंतर आंध्रप्रदेशापर्यंत पसरला त्यामुळे त्यांना पुराणामध्ये आंध्रभृत्य असेही म्हणण्यात येते. 

सातवाहनांची प्रथम राजधानी प्रतिष्ठान (पैठण) ही होती. सातवाहन हा या वंशाचा उत्पादक असला, तरी त्याचा नामनिर्देश पुराणांत आढळत नाही; कारण आरंभी त्याचे राज्य बरेच मर्यादित असावे; तथापि त्याने महाराष्ट्रातील महारठी व महाभोजी अधिपतींशी सख्य आणि वैवाहिक संबंध जोडून ते लवकरच वाढविले. त्याच्यानंतर बहुधा तिसऱ्या पिढीतील सिमुक (श्रीमुख) याचे नाव या वंशाचा उत्पादक म्हणून पुराणात येते. तो इ. स. पू. 200 च्या सुमारास राज्य करू लागला असावा. 

जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात त्याचा पुतळा कोरून त्याखाली त्याचे नाव "सिमुक सातवाहन' असे कोरले होते. तसेच त्याचा पुत्र सातकर्णी, सून नागनिका व काही राजपुत्र यांचेही पुतळे तेथेच कोरून त्यांच्या पीठांवर त्यांची नावे कोरली होती. सर्व पुतळे आता नष्ट झाले आहेत. याच सातवाहन कुळात जन्मलेला महापराक्रमी राजा गौतमीपुत्र सातकर्णी बऱ्यापैकी सर्वांना ज्ञात आहे. याच्या आधीच्या काळात सातवाहन कुळ संकटात सापडून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे प्रदेश शकवंशी क्षत्रपांनी बळकावले होते. 

हे राज्य परत मिळवण्यासाठी त्याने प्रथम विदर्भावर हल्ला करून तेथील क्षत्रप राजांचा नि:पात केला व पुढे त्याने पश्चिम महाराष्ट्रावर स्वारी करून नहपान या महाक्षत्रपाचा पूर्ण पराभव करून त्याच्या वंशाचा समूळ उच्छेद केला. नंतर त्याने महाराष्ट्रात राज्य उत्तरेस सौराष्ट्र (काठेवाड), अनूप (महाबळेश्वरजवळचा प्रदेश) व माळवा; पश्चिमेस कोकण; पूर्वेस आंध्र आणि दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत (कर्नाटक) पसरविले. 

गौतमीपुत्र सातकर्णीने स्वत:च्या नावाचा शक सुरु केला. जो आजही नववर्षदिन म्हणून साजरा केला जातो. ज्याला शालिवाहन शक असे म्हटले जाते. सातवाहन काळातला कोकणातून देशावर जाणाऱ्या प्रमुख मार्गांमधला एक मार्ग म्हणजे चौल-अष्टमी-नागोठणे, बोरघाटमार्गे जुन्नर ते पैठण असा होता. कारण सातवाहनांची प्रमुख राजधानी पैठण (प्रतिष्ठान) होती तर जुन्नर (जिर्णेनगर) ही उपराजधानी होती. सातवाहन काळात महाराष्ट्राची भरभराट झाली.

कोकण मार्गे मावळात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सातवाहन काळात कार्ले, भाजे, कुडे, ठाणाळे, खडसांबळे सारख्या लेण्या बांधण्यात आल्या व व्यापारास उत्तेजन देण्यात आले. नागोठण्यापासून तीस कि.मी. अंतरावर असलेल्या तळा येथील कुडा लेणीसमुहामध्ये नागनिका भिक्षुणी, नागशिल्पे, नागप्रतिमा, नागकन्या तसेच सर्प, नाग इत्यादी व्यक्तिमाने या परिसरातले नागलोकांचे अस्तित्व दर्शवितात. सध्या अस्तित्वात असलेली ग्रामव्यवस्था सातवाहन काळात उदयास आली.