श्री भैरवनाथ महाराज यात्रा गोरेगाव - महाराष्ट्रातील सर्वात उंच बगाडांपैकी एक

श्री भैरी, श्री भवानी व श्री जोगेश्वरी या तीन देवतांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. अनेक शतकांचा धार्मिक वारसा असलेल्या भैरवनाथाची यात्रा ही चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खूप उत्साहाने साजरी केली जाते.

श्री भैरवनाथ महाराज यात्रा गोरेगाव - महाराष्ट्रातील सर्वात उंच बगाडांपैकी एक
श्री भैरवनाथ महाराज यात्रा गोरेगाव

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील श्री भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणजे एक ऐतिहासिक व जागृत देवस्थान. शिवकालीन असे हे ऐतिहासिक मंदिर आजही आपले जुने स्वरूप कायम ठेवून आहे. 

श्री भैरी, श्री भवानी व श्री जोगेश्वरी या तीन देवतांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. अनेक शतकांचा धार्मिक वारसा असलेल्या भैरवनाथाची यात्रा ही चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस खूप उत्साहाने साजरी केली जाते. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील एक आगळा वेगळा सण म्हणून ओळखली जाते.

यात्रेचा याची देही याची डोळा अनुभव घेण्यासाठी गोरेगाव व परिसरातील सर्व भाविक एकत्रित येऊन हा आनंद सोहळा साजरा करतात. रामनवमीपासून यात्रेच्या प्रथेस खऱ्या अर्थाने सुरुवात होते. रामनवमीस वतनदार व मानकरी ग्रामस्थ यांची बैठक होऊन भैरवनाथाची परडी निघते त्यावेळी भैरवनाथास गाऱ्हाणे गायल्यावर भैरवनाथ यांचे बंधू गोंदीरबुवा व वीर यांना आवाहन केले जाते.

यानंतर पहिली वस्ती गवळआळी, दुसरी वस्ती लोणेरे येथील हनुमान मंदिरात होते व तिसऱ्या दिवशी एकादशीस लाट ज्या मालकाची असते त्याच्या घरी भजन कीर्तन सोहळा होतो. 

चौथ्या दिवशी प्रदोषकाली सकाळी ७ वाजता वतनदार मंडळी एकत्र येऊन लाटीच्या ठिकाणी जातात, पूजा अर्चा करून सर्व वतनदार व मानकरी मंडळी लाकुडू वर पाच घाव घालतात. यानंतर हे लाकुडू पाण्यावर आणले जाते तेथे वतनदार मेस्त्री लाकुडू पूर्णपणे तासून लाटीच्या एका बाजूस नारळ काढतो. यानंतर अष्टभुजा तयार करण्याचे काम सुरु होते. लाटेत देवत्व आणल्यानंतर लाटेसमोर अनेक नवस बोलण्यात व फेडण्यात येतात. लाटीला केलेला नवस हमखास पावन होतो अशी वर्षानुवर्षे श्रद्धा आहे त्यामुळे शाकाहार व मांसाहार असे दोन्ही नवस केले जातात आणि या नवसाचे भोजन भक्तिभावाने केले जाते. 

यानंतर ज्या गावास त्या वर्षी लाटेचा मान मिळाला असतो तेथून रात्री सर्व वतनदारआणि ग्रामस्थ ही लाट घेऊन चालत चालत गोरेगाव येथे दाखल होतात.

पाचव्या दिवशी म्हणजेच चतुर्दशीच्या दिवशी सकाळी देवास सोन्याचा मुखवटा घातला जातो आणि ओटी भरण्यास सुरुवात होते. सायंकाळी देवाची पालखी निघते व या पालखीत भैरीदेवाचा मुखवटा व गोंदीरबुवा असतात. यानंतर लाटेची भक्तीभावाने पूजा केली जाते.  श्री भैरवनाथ मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यापूर्वी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजाना चल भैरी चल हर हर महादेव अशी हाक मारली जाते व गोरेगाव येथील सर्वात उंच गिरी स्थान मल्लिकार्जुन व श्री भैरवनाथ महाराजांचे भाऊ श्री गोंदीरबुवा यांना हाक मारली जाते.

मंदिराशेजारील एका टेकडीवरती असणाऱ्या पिरबाबा दर्ग्यातील पिरास पालखी घेऊन हाक मारली जाते.  या सोहोळ्याला हजर रहावे असे धीरगंभीर आवाजात आवाहन करुन भक्तिपूर्ण पाचारण केले जाते. तदनंतर पालखी भैरवनाथाच्या मंदिरात आल्यावर लाट वर चढवायला सुरुवात होते.

भैरवनाथ यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भैरी देवाची लाट. साधारण लाटेच्या लाकडाचा शोध हा गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत सुरु असतो आणि गोरेगावच्या पूर्व दिशेहुन लाटेची निवड केली जाते. ही लाट ऐन या वृक्षाची असून  अदमासे ४० फूट अथवा २५ हात इतक्या लांबीची असते. एवढ्या मोठ्या लाटेचे तेवढेच उंच बगाड आहे जे महाराष्ट्रातल्या उंच बगाडांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे

विधीवत पूजा अर्चा करुन अत्यंत पवित्र वातावरणात लाट फिरवण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली जाते. चल भैरी .. चल रे चल...  हर हर महादेव... च्या प्रचंड घोषणा गजरात, ढोलताशे व घंटांच्या निनादात बेहोश होत वतनदार चित्तथरारकपणे लाट फिरवतात, यात्रेला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक चल भैरी चल रे चल असा प्रचंड जयघोष करीत प्रोत्साहन देत असतात. रोमांचकारी भक्तिमय वातावरणात ३ किंवा ५ वेळा लाट फिरवली जाते व मग यात्रेला सुरुवात होते.

गोरेगावचे भैरवनाथ हे देवस्थान आसमंतातील ८४ गावांचे दैवत असल्याने जत्रेस सुरुवात झाल्यावर चिंचवली, भिनाड, कुरवडे इत्यादी गावांच्या मानाच्या उत्तरकाठ्या वाजत गाजत भैरवनाथ मंदिराकडे येतात.. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी गोरेगावच्या पंचक्रोशीतील सर्वच नागरिक मोठी गर्दी करतात व या यात्रेचा आनंद घेतात.  ग्रामदैवत भैरवनाथाचा हा जागर कोकणच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा खऱ्या अर्थी एक उज्वल वारसाच आहे.