प्रश्न आणि प्रश्न

वेडेच इतिहास घडवतात असं म्हटलं जातं. पण काही वेडे असे असतात जे स्वतःचं नाहीतर समाजाचं वर्तमान नि भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अनिल अवचट.

प्रश्न आणि प्रश्न
प्रश्न आणि प्रश्न

अनिल अवचट यांचे कार्य काय आहे ते सर्वांनाच माहीत आहे. त्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. पण हा माणूस वर्तमान जाणून घेण्यासाठी किती धडपडत असतो, किती लोकांना भेटतो, त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिपासून त्या क्षेत्रातील शेवटच्या माणसापर्यंत, प्रत्येकाची मतं जाणून घेतो, प्रतिप्रश्न करतो. नि हे सर्व खोलात जाऊन. व ते अनुभव साध्या सोप्या शब्दात मांडतो. त्यामुळे क्लिष्ट वाटणारे विषय देखील समजून घेता येतात.

"प्रश्न आणि प्रश्न" ह्या पुस्तकात असेच ८ प्रश्न आहेत, "पाणी व माती" ह्या लेखात भूगर्भशास्त्रज्ञ, शेतीतज्ञ, अभियंता ते ज्यांचा संबंध ह्या पाण्याशी आहे त्या सर्वांची बातचीत आहे त्यांनी योजलेले उपाय आहेत, ज्यांचा वापर आजही जल व मृदा संधारण करण्यासाठी केला जातो. "पंचगंगा" लेखात जितकं पंचगंगा नदीच्या व परिसरातील इतर प्रदूषणाबद्दल लिहिलं तितकंच तत्कालीन कोल्हापूरचं वर्णन आहे, तिथल्या समजाजीवनाचं वर्णन आहे. "पठार आणि खाणी"मध्ये वनस्पती, वन्य जीव, पठारावरील एकूण जीवसृष्टी, तसेच ह्या सर्वांचा लचका तोडणारे, त्यासाठी विविध क्लृप्त्या लढवणारे ह्या सर्वांचे वर्णन आहे.

"मच्छिमार आणि समुद्र" मध्ये कोळ्यांच्या समस्या, मासेमारीचे बदलते जग-तंत्र, त्यात समविष्ट असणारे विविध लोक ह्या सर्वांचा मालवणपासून मुंबई पर्यंतचा प्रवास वाचायला मिळतो.

"तेंदू पानांचा प्रश्न" मध्ये विदर्भातील आदिवासी भाग, तेथे राहणारे आदिवासी, त्यांचे जीवनमान, त्यांची होणारी फसवणूक, तेंदू पत्ता ते विडी बनण्याची प्रक्रिया, जंगलतोड त्या दरम्यान घडणाऱ्या गोष्टी, नक्षलवादी त्यांचा परिसर नि ह्या व्यवसायात असणारा अनेकांचा वावर असा गच्च भरलेल्या जंगलातला खडतर प्रवास वाचायला मिळतो.

"बस्तरचे अरुण्यरुदन" हा तर एका वेगळ्या विश्वातील प्रवास. जंगलतोड ही तर आपली सर्वात मोठी समस्या. पण क्षणिक लाभासाठी जंगल किती प्रमाणात नि किती विविध प्रकारे ओरबाडले जाऊ शकते, त्यासाठी काय काय उद्योग केले जातात तेही त्याचं संरक्षण ज्यांच्या हातात आहेत त्यांच्याकडून. मग त्याविरुद्ध लढा देणारा सनदी अधिकारी, ग्रामस्थ त्यांचे होणारे हाल, त्यांना होणारा विरोध नि तरीही त्यांचे चालू असलेले प्रयत्न. जंगल, मृदा, पर्वत यांची खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात झालेली कत्तल वाचताना आपण हे दुसऱ्या जगातील गोष्ट वाचत आहोत असंच वाटत राहतं.

"कचरायात्रा" ही तत्कालीन पुणे शहराची आहे. खालपासून वरपर्यंत कोणाला ही समस्या वाटत नाही, ज्यांना वाटते ते प्रयत्न करतात पण त्यांची दखल घेतली जात नाही, जे यासाठी प्रयत्न करतात त्यांकडे होणारे दुर्लक्ष, कचरा काम करणाऱ्या कामगारांचे होणारे हाल, आरोग्याच्या समस्या, ह्या सर्वावर उपाय शोधणारे निवृत्त हवाईदल अधिकारी, आयुक्त, त्यांची फारशी न घेतलेली दाखल हा सर्व रिपोर्ताज महापालिका कार्यालयापासून ते कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांमधून फिरून याची देही याचि डोळा आपल्याला वाचायला मिळतो.

"बलुतेदारी" म्हणजे इतिहासातील एक आवडता विषय. पण इतिहास, इतिहास असतो नि वर्तमान, वर्तमान. पण तरीही हे घटक एकमेकांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. जे चालत आलं आहे ते तसंच चालू राहिल्याने होणारे काही फायदे नि अनेक तोटे, बलुतेदारांची तत्कालीन परिस्थिती, आहे त्या परिस्थितीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत परिस्थितीला तोंड देणं, इतकं करूनही पदरी पडणारा अपमान, सर्वच व्यवस्थेकडून मिळणारी वागणूक, आताही पूर्वीसारखी असलेली अनेकांची अवस्था, जातीमुळे होणारी परवड, तरीही मोजक्या लोकांनी झुगारलेली व्यवस्था व स्वतःचं निर्माण केलेलं विश्व पण तिथेही आडवी येणारी जात व त्यामुळे होणारे सामाजिक, आर्थिक व विशेषतः मानसिक हाल हे सर्व वाचताना आपण ह्या सर्वात कुठेच नाही, शहरात सुखाने जगत आहोत, आपण जे हाल वाचतो, ऐकतो त्याहून हे सर्व किती भीषण आहे ह्या सर्वांची जाणीव होते.

ह्या पुस्तकातील लेख आहेत १९९१ ते २००० ह्या दशकातील. पण हे प्रश्न आजही आहेत पण आपल्याला तितकेच महत्त्वाचे असून वाटत नाहीत. ह्यातील लेख हे प्रत्येक किमान २० ते कमाल ४०-४४ पानांचे आहेत. एवढं लिहिण्यासाठी लेखकाने घेतलेली मेहनत, केलेला प्रवास, त्या दरम्यानच्या गाठीभेटी व ते सर्व सोप्या शब्दात विस्ताराने मांडणे हे सर्व थक्क करणारं आहे नि त्यांनी मांडलेले विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकतले प्रश्न हे एकविसाव्या शतकात देखील विचार करण्याजोगे.