भास्कराचार्य - एक थोर ज्योतिषी व गणितज्ञ
भास्कराचार्यांचा सर्वात प्रथम ग्रंथ म्हणजे सिद्धांत शिरोमणी होय. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहिला. सिद्धांतशिरोमणी ग्रंथाचे लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि महत्वमापन असे एकूण चार अध्याय असून हा ग्रंथ गणितशास्त्रातील एक उत्तम ग्रंथ आहे.
प्राचीन भारतातील एक थोर ज्योतिषी व गणितज्ञ म्हणून भास्कराचार्य यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. भास्कराचार्य यांचा जन्म इसवी सन १११४ साली महाराष्ट्रातील विज्जलवीड नामक गावी झाला. भास्कराचार्य यांचे वडील महेश्वर हे त्या काळातील एक प्रख्यात ज्योतिषी व विद्वान होते. भास्कराचार्यांनी त्यांच्या ग्रंथांत आपल्या विद्येचे श्रेय आपल्या वडिलांनाच दिले आहे.
भास्कराचार्यांचा सर्वात प्रथम ग्रंथ म्हणजे सिद्धांत शिरोमणी होय. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहिला. सिद्धांतशिरोमणी ग्रंथाचे लीलावती, बीजगणित, गणिताध्याय आणि महत्वमापन असे एकूण चार अध्याय असून हा ग्रंथ गणितशास्त्रातील एक उत्तम ग्रंथ आहे.
इसवी सनाच्या १२ व्या शतकात या ग्रंथाचे लिखाण झाले असूनही ग्रंथाची लेखनशैली आजच्या काळालाही शोभेल अशी आहे. लीलावती या अध्यायात अंकगणित आणि महत्वमापन हे विषय असून हा अध्याय त्यांनी आपल्या मुलीस उद्देशून लिहिला असावा असे अभ्यासकांचे मत आहे कारण या अध्यायात उदाहरणे देत असताना 'हे बाले' व 'हे लीलावती' असे संबोधन करणारे शब्द दृष्टीस पडतात त्यामुळे लीलावती हे भास्कराचार्य यांच्या मुलीचे नाव असावे असा निष्कर्ष काढता येतो.
सिद्धांत शिरोमणी ग्रंथातील बीजगणित या अध्यायानंतर भास्कराचार्यांनी मुलीस उद्देशून "तुझ्या कर्ण भूषणांसाठी मी इतकी माणके, इतके नील, इतके मोती खरेदी केले असाही उल्लेख आढळतो" हा उल्लेख पाहता प्राचीन काळातही स्त्रियांना उत्तम शिक्षण दिले जात असे याचा खात्रीलायक पुरावा हा ग्रंथ आहे.
सिद्धांत शिरोमणी ग्रंथातील लीलावती या अध्यायाचे मोगल बादशाह अकबर याने फारशी भाषांतर करून घेतले होते. या ग्रंथातील गणिताध्याय आणि गोलाध्याय या अध्यायांत ग्रहगणित व त्यांची उत्पत्ती यांची मीमांसा आहे. यातील गणिताचे सर्व प्रकार हे अर्वाचीन काळातील पाश्चात्य ज्योतिष ग्रंथाशी पूर्णपणे मिळतात. गणितामधील भूमितीचे सिद्धांत बिजरीतीने सोडवण्याचा मान हा खऱ्या अर्थी भास्कराचार्यांकडे जातो.
सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत व या ग्रंथाने भारताचे गणितशास्त्रातील प्राचीन योगदान खऱ्या अर्थाने जगभरात अधोरेखित केले आहे.
भास्कराचार्यांनी करणकुतूहल नावाचा आणखी एक ज्योतिषविषयक ग्रंथ इसवी सन ११८३ साली लिहिला होता. या ग्रंथाच्या वेळी त्यांचे वय ६९ वर्षे होते. पृथ्वी ही गोल असून अंतरिक्षात स्थिर आहे आणि तिच्या भोवती सूर्य व इतर ग्रह फिरतात असे त्यांचे मत होते. त्याकाळी पृथ्वी सपाट आहे असे अगदी पाश्चात्य लोकांचे मत होते त्यावेळी भास्कराचार्यांनी पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांत मांडला होता.
याशिवाय पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्रग्रहण होते आणि पृथ्वीच्या व सूर्याच्या आड चंद्र आल्याने सूर्यग्रहण होते हे मत सुद्धा भास्कराचार्य यांचेच होते. भास्कराचार्यांचा जन्म ज्या काळात झाला त्या काळी भारतीयच नव्हे तर सर्व जगातील समाज अत्यंत रूढीवादी होता व धार्मिक ग्रंथातील मतांव्यतिरिक्त वेगळे मत कोणी मांडले तर त्यास रोषास सामोरे जावे लागत असे. पाश्चात्य शास्त्रज्ञ ग्यालिलियो याचा त्याच्या रूढींना छेद देणाऱ्या मतांमुळे जसा छळ करण्यात आला तसा भास्कराचार्यांचा करण्यात आला नाही मात्र तत्कालीन धार्मिक मतांचा व नव्या शोधांचा मेळ घालून लिखाण करण्याचा प्रयत्न भास्कराचार्यांनी केला.
भास्कराचार्य गणितज्ञ व ज्योतिषी होतेच मात्र ते एक उत्तम कवी सुद्धा होते कारण सिद्धांत शिरोमणी या ग्रंथातील काही भागांत त्यांनी काव्यस्वरूपात ऋतूंचे वर्णन केले आहे. भास्कराचार्य यांचे पुत्र लक्ष्मीधर आणि नातू चंगदेव हे दोघे सुद्धा प्रख्यात ज्योतिषी असून चंगदेव हे देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण या राजाच्या दरबारी होते. भास्कराचार्यांनी गणिताच्या सिद्धांतांची उपपत्ती केली आहे ती अर्वाचीन गणितज्ञांनी सुद्धा स्वीकारली हेच भास्कराचार्य यांच्या कार्याचे यश आहे.