मसाल्याचे विविध पदार्थ

मसाल्यात अनेक प्रकार असतात काही मसाले हे चवीसाठी वापरले जातात, काही मसाले त्यांच्या सुंगंधी गुणधर्मामुळे, काही मसाले त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे तर काही त्यांच्या रंगामुळे वापरले जातात. 

मसाल्याचे विविध पदार्थ
मसाल्याचे पदार्थ

मानवी अन्नास चव व रंग येण्यासाठी मसाला प्रामुख्याने वापरला जातो. प्राचीन काळापासून मसाल्याच्या निमित्ताने देशोदेशींचे दळणवळण चालत आले आहे. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी त्यामध्ये मसाला नसल्यास अन्नास चव येणे कठीणच असते.

मसाल्यात अनेक प्रकार असतात काही मसाले हे चवीसाठी वापरले जातात, काही मसाले त्यांच्या सुंगंधी गुणधर्मामुळे, काही मसाले त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे तर काही त्यांच्या रंगामुळे वापरले जातात. 

भारतात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यात जी प्रमुख द्रव्ये वापरली जातात ती म्हणजे हिंग, मिरी, कोथिंबीर, जिरे, धणे, लवंग, आले, सुंठ, खोबरे, मोहरी, दालचिनी, तमालपत्र, केशर, वेलदोडे, जायफळ, जायपत्री, कंकोळ इत्यादी होत. मसाल्यातील हे प्रमुख घटक नक्की कसे तयार होतात हे या लेखातून जाणून घेऊ.

हिंग - हिंग हा प्रामुख्याने इराण, सध्याच्या पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि पंजाब प्रांतातील चिनाब नदीच्या काठी उत्पन्न होतो. खरं तर हिंग म्हणजे त्या भागात आढळणाऱ्या एका झाडाचा चीक असून ते झाड खच्ची केल्यास त्यातून दुधासारखा पंधरा चीक निघतो व घट्ट होतो व हा घट्ट झालेला चीक म्हणजेच हिंग. हिंग तिखट गुणधर्माचा असून त्यास उग्र वास असतो व त्याचा वापर फोडणीत घालण्यासाठी केला जातो.

मिरी - मिरी ही भारतातील त्रावणकोर, केरळ इत्यादी ठिकाणी विपुल प्रमाणात तयार होते. मिरी ही तिखट असून तिच्या विशिष्ट स्वादासाठी प्रसिद्ध आहे. मिरीची पूड ही खिचडी किंवा आमरसात चव येण्यासाठी घालतात. 

कोथिंबीर - भारतात सर्वत्र आढळणारी कोथिंबीर भाजीपाल्यास स्वाद येण्यासाठी वापरली जाते. कोथिंबिरीची पाने, फुले व देठ या तिन्हींचा वापर अन्नात केला जातो. 

धणे - कोथिंबिरीस येणारी फळे म्हणजेच धणे. धणे स्वादिष्ट, थोडे तिखट आणि कडवट असून पित्तहारक आणि पाचक असते. 

लवंग - ही पूर्वी मसाल्याची बेटे म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंडोनेशियातून आयात होत असे. लवंगाच्या झाडाची उंची चाळीस ते पन्नास फूट असून झाडाच्या फुललेल्या कळ्या म्हणजे लवंगा असतात. लवंग तिखट, शक्तिवर्धक आणि वातहारक आहेत. लवंग हा पदार्थ पाश्चिमात्य लोकांमध्ये एवढा लोकप्रिय झाला की खास त्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पाश्चिमात्य लोक पूर्वेकडील देशांमध्ये व्यापारासाठी येऊ लागले.

आले- आले हे भारतात सर्वत्र आढळते. आल्याच्या झाडाची उंची चार फुटांपर्यंत असते. आल्याच्या झाडाचे मूळ म्हणजे खरे आले असते जे आपण अन्नात वापरतो. आले उद्दीपक, वातहारक आणि स्वादिष्ट असते. आल्याचा रस अत्यंत औषधीही असतो. आलं वाळवले की त्याचे सुंठ होते. आल्याचा व सुंठाचा पाक तयार होतो. आल्याचे लोणचेही तयार केले जाते.

खोबरे - नारळाच्या आतील मगज म्हणजे खोबरे. खोबरे हे रुचकर असून मवाळी देणारे आहे.

मोहरी - मोहिरी ही काळी आणि पांढरी अशी दोन प्रकारची असते. ही अत्यंत तिखट असून मोहरीचे तेल सुद्धा तयार केले जाते.

वेलदोडे - हे प्रामुख्याने दक्षिण भारतात तयार होतात. वेलदोड्याच्या झाडाची उंची सहा फुटांपासून बारा फुटांपर्यंत असते. झाडाच्या मुळाशी वेलदोडे तयार होतात.  आतील दाणे हे रुचकर आणि सुंगधी असतात. वेलदोडा हा थंड मात्र उत्तेजक आहे त्यामुळे पूर्वी विड्यात हे दाणे घातले जात असत.

जायफळ - जायफळ सुद्धा पूर्वी इंडोनेशियातील बांडा या बेटात प्रामुख्याने आढळत असे. हे झाड लावल्यावर आठ वर्षांनी यास फळ येते आणि यांनतर पुढील साठ वर्षे या झाडास बहर येतो. फळे पिकून त्यांच्या सालीची दोन शकले झाली की आतील बीजाभोवती एक तांबूस पत्री असते ती काढून वळवली की त्याची जायपत्री तयार होते. जायफळाच्या बियांची साल पातळ असून त्यामध्ये जी आंठळी असते त्यास जायफळ असे म्हणतात. जायफळाचे बी मंद अशा अग्नीवर वाळवले जाते आणि मग फोडले जाते. जायफळ सेवन केल्यास लगेच निद्रा येते त्यामुळे निद्रानाशावर जायफळ दिले जाते.

दालचिनी - दालचिनी प्रामुख्याने श्रीलंकेत आढळते. झाड लावल्यापासून दोन वर्षांचे झाले की त्यास कापतात आणि खांदीच्या वरील दोन साली काढून टाकल्या जातात. वरील साली काढल्या की आतील जी साल राहते तीच दालचिनी. दालचिनी ही अत्यंत पातळ असून उष्ण, रुचकर, स्वादिष्ट असते. डोकेदुखीत दालचिनीचे तेल लावल्यास परिणाम चांगला होतो.

कंकोळ - पूर्वी हे झाड जमैका या बेटात विपुल प्रमाणात आढळत असे. याची झाडे कच्ची असतानाच तोडली जातात व नंतर वाळवली जातात व कंकोळ मिळवले जाते. कंकोळ सुगंधी असून खाल्ल्यास मुखास थंडावा मिळतो.

केशर - केशराचे झाड हे काश्मीर, इराण आणि चीनमध्ये आढळते. केशराच्या झाडास फुल आल्यावर त्यातील केसर जपून काढून अगदी कोवळे असतानाच त्यांचे थर कागदावर घालून त्यावर एक कापड घालून दाबून ठेवतात. मग या केसरास उब आल्यावर त्यास आंच देऊन मंद अग्नीवर त्यास वाळवले जाते आणि मूळ केशर तयार केले जाते. केसर अत्यंत औषधी असून त्यास अतिशय सुंदर सुगंध असतो. यास रंगही चांगला असल्याने पक्वान्नात केशर घातले जाते व केशराचा गंधही केला जातो.