भटकंती एक्सप्रेस

एक महिन्यापूर्वी परिस पब्लिकेशनचे गिरीष भांडवलकर यांच्याशी माझ्या आगामी तिसऱ्या पुस्तकाबाबत म्हणजेच, 'आडवाटेचा वारसा' या पुस्तकाबाबत चलभाषवर चर्चा झाली. बोलताना त्यांनी नुकत्याच प्रकाशित केलेले 'भटकंती एक्सप्रेस' बद्दल बोलणे झाले.

भटकंती एक्सप्रेस

ह्या पुस्तकाचे लेखक श्री. सतिश कोळपे हे दौंड तालुक्यातील एक शिक्षक आहेत असे समजले. मग प्रकाशकांनी त्या पुस्तकाची एक प्रत मला भेटीदाखल पाठवून देखील दिली.

'भटकंती एक्सप्रेस' हे सतिश कोळपे सरांचे पुस्तकाचे वाचन दीपावली दरम्यान सुरू झाले. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट छापाई, उत्तम रंगीत प्रकाशचित्रे, ५९ स्थळांची सहली व त्यात नेपाळ देशाची सहल वर्णन घेतले असून ३२० पानांचे पुस्तक सुबक झाले आहे. पुस्तकाचा समारोप पर्यटन स्थळांवरील निवास, भोजन, वाहतूक, मार्गदर्शक, स्थळ अंतर इत्यादींची माहितीने झाली आहे आणि त्याचा वाचकांना नक्कीच उपयोग होईल.

श्री कोळपे यांनी आपल्या मनोगतात ' सहल 'या विषयी म्हणजेच या पुस्तकाबद्दल मोजक्या व परिणामकारक शब्दात भूमिका मांडली आहे. १९९७ साली बारावी पास होऊन शिक्षणशात्र पदवी अभ्यासक्रमासाठी कोळपे हे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुणे, सातारा व रत्नागिरी येथे सहकारी मित्रासोबत सलग मिळेल त्या वाहनाने अपरिचित ठिकाणी फिरले, त्या पहिल्या अनुभवाने पुस्तकाची सुरवात होते. त्यावेळी मालवाहक वाहनाच्या वरच्या भागात बसून केलेला प्रवास अनुभव अतिशय भावतो. कागदपत्रे दाखल करताना छायांकित प्रतिची 'सत्यप्रत' करावी लागते हे वाचताना वाचकांना आपल्या आयुष्यातील अशाप्रकारचे अनुभव नकळत आठवतात आणि चेहऱ्यावर हास्य येते. कोळपेंनी अनुभव सांगितला असला तरी तो तुमच्या आयुष्यातील असल्याचे जाणवते. यानंतर सलग वीस वर्षे ते वेगवेगळ्या पर्यटनस्थळी डोळसपणे फिरले. कधी दुचाकीने पंढरपूरला गेले तर कधी रेल्वे-बसने नेपाळला गेले. कुटुंबासहित चारचाकी वाहनाने गुरजातला जाऊन आले. गेली वीस वर्षे फिरताना त्याबाबतचा अनुभव शब्दबद्ध करून ठेवणे म्हणजे महाकठीण काम, त्यांनी चिकाटीने केल्याचे पुस्तकात पदोपदी दिसून येते. नेपाळ सहलीत जेवणाचे झालेले जादा बील, वाराणसीत चुकलेला सहकारी, दुचाकीवरील सहका-याच्या पिशवी पंढपूरहून आणलेला दगड, कॕनडातील पर्यटकाशी झालेली मैत्री, तो देखील कोळपेंच्या घरी पाहुणचारास आल्याचा प्रसंग अशा अनेक अनुभवांचे बोलके चित्रण आपल्या शैलीतून वाचकांना ते करून देतात. पर्यटन हा काहीसा खर्चिक समजला जाणारा छंद, स्वस्त व मस्त कसा करता येतो, हे त्यांच्या अनेक सहका-यांना प्रत्यक्ष अनुभवता आला तर वाचकांना देखील वाचनातून मिळतो. दर दहा कोस अंतरावर वेगळी भाषाशैली, आहारशैली पाहावयास मिळते. मग अनेक राज्यात पर्यटन केल्याने सांस्कृतिक व सामाजिक विचारांच्या कक्षा रुंदावतात तर आयुष्यातील अडचणींचा मुकाबला करण्याची शक्ति प्राप्त होती. राजस्थानात पाण्याचे महत्त्व लक्षात येते तर तिरुपती बालाजीला स्वच्छता कशी असावी याचे ज्ञान होते. हरिद्वार मधील 'राजू' म्हणजे आजच्या आधुनिक जगात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण वाचून बरे वाटते.

पुस्तकात फार किचकट वाटणारी माहिती कोळपे यांनी देण्याचे टाळले आहे. वाचकांना आपण स्वतःच तेथे पोहोचलो असे वाटणारे सहज सुंदर वर्णन भावते. भटकंती एक्सप्रेस बद्दल खूप काही सांगता येईल पण एका वाक्यात सांगायचे म्हटले तर, " जे नेहमी फिरायला जातात, त्यांना पुन्हा एकदा फिरुन आल्याचे समाधान देते व जे कधीही बाहेर फिरायला जात नाहीत त्यांना बाहेर जाण्याचे धाडस व इच्छा निर्माण करणारे पुस्तक" लेखक श्री. कोळपे यांना खूप शुभेच्छा व भविष्यात आपले फिरणे व लिखाण वृद्धींगत होवो. परिस पब्लिकेशनने एक सुंदर पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल खूप शुभेच्छा. 

- सुरेश नारायण शिंदे, भोर