एक म्हातारं झाडं

मग पावसाळा आला. पावसानं आपल्या धारांनी जेव्हा मातीला चिंब ओलं केलं तेव्हा ते रुजलेलं बी फोफावलं. हळूहळू त्या बिजाचं रोपात रुपांतर झालं.

एक म्हातारं झाडं
एक म्हातारं झाडं

एक म्हातारं झाड एके दिवशी मुळासकट उन्मळून पडलं. मेलं बिचारं!

पण मरता मरता त्या झाडाचं एक बी वार्‍यावर वाहात वाहात दूरवर गेलं.

एके ठिकाणी वारा दमला आणि म्हणाला, “ उतर इथंच तू ”

बी एकलं तिथेच उतरलं. तिथल्या मातीच्या कुशीत बिचकत बिचकत का होईना पण विसावलं.

तिथली माती मायाळू होती. लाल आणि भुसभुशीत. फणसाच्या गर्‍यासारखी ओलसर मऊ माती. मातीनं बिजाला आपल्या कुशीत घेतलं. मायेनं त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. थोपटलं.

ते पोरकं, अनाथ बीज मग तिथेच राहू लागलं.

मातीच्या मायाळू ओलाव्यानं ते बी रुजलं.

मग पावसाळा आला. पावसानं आपल्या धारांनी जेव्हा मातीला चिंब ओलं केलं तेव्हा ते रुजलेलं बी फोफावलं. हळूहळू त्या बिजाचं रोपात रुपांतर झालं.

मातीनं आपल्या पोटातल्या सर्व पौष्टीक खाद्याचा पुरवठा त्या रोपाला केला.

काही दिवसातच रोप चांगलं गुडघाभर मोठं झालं.

मातीसोबतच आजूबाजूच्या किडेकिटकांनीही रोपावर खूप प्रेम केलं. रोपाला माया लावली.

कधी सुरवंट येऊन रोपावर लोंबकळले.

कधी मुंग्यांनी रोपाभोवती गिरक्या घेतल्या.

रोपाला पहिलं फूल आलं तेव्हा तर एक रंगीबेरंगी फुलपाखरुही येऊन आधी रोपावर आणि मग त्या फुलावर बसलं. ते फुलपाखरु तसं गर्विष्ठं होतं. ते सहसा कुठल्या रोपावर जाऊन बसत नसे; पण या रोपाच्या मोहक रुपानं त्या फुलपाखराला भूरळ घातली.

काही दिवसांनी भुंगेही रोपाभोवती रुणझुणू लागले.

त्या मातीनं, त्या परिसरानं रोपाला आपलसं करून टाकलं.

रात्र झाली की दिवसाभराच्या दंगामस्तीनं थकलेलं रोप मातीच्या कुशीत शिरायचं तेव्हा माती त्याला अंगाई गीत म्हणून हलकेच निजवायची. मातीनं रोपावर सख्ख्या आईसारखं प्रेम केलं.

दिवसंदिवस रोप अधिकाधिक मोठं होत गेलं. काही वर्षातच रोपाचं मोठ्ठं झाड झालं. आणि आणखी काही वर्षांनंतर त्या झाडाचा मोठा वृक्ष झाला. एवढा मोठा वृक्ष की, आता त्याच्याकडे वर मान करून पाहताना मातीला भोवळच यायची. पण जेव्हा जेव्हा माती वर मान करून पाहायची तेव्हा तेव्हा आपल्या कुशीत वाढलेल्या त्या वृक्षाची प्रगती पाहून आनंदी व्हायची.

ऋतू बदलल्यावर दूरदेशाहून स्थलांतराला निघालेले वेगवेगळ्या प्रांतांतील नवनवे पक्षी आता वृक्षावर येऊन बसू लागले. कधी बगळे, कधी सिगळे. आता वृक्षाच्या अंगाखांद्यावर खारुताई भिरभिरू लागल्या. एका सुतारपक्ष्याने वृक्षाच्या अंगावर ठाकठूक करत आपली ढोलीही तयार केली. एका सुगरण पक्ष्याने लक्षावधी काड्या जमवून वृक्षाच्या फांदीवर खोपा तयार केला. एकदा एक साप आला. सरसर करत वृक्षावर चढला आणि तिथल्याच एका खोपीत त्यानं मुक्काम ठोकला. कावळे, चिमण्या, बगळ्यांनी वृक्षावर घरटी बांधली. थकलीभागली माणसंही वृक्षाच्या छायेत येऊन विसावू लागली. थोड्याच दिवसात वृक्ष नवनवीन पाखरांच्या, पक्ष्यांच्या सहवासाने गजबजून गेला.

आता मातीकडे लक्ष द्यायला वृक्षाला वेळच नव्हता. सकाळ संध्याकाळ वृक्ष आपल्या या नवीन मित्रांसोबत दंगामस्ती करण्यात मग्न होऊन गेला. पण मातीला याचं काही वाटलं नाही. शेवटी वृक्ष तिच्या उदरात जन्माला आला होता.

वर्षं गेली. ऋतू उलटले. नवनवीन उन्हाळे, पावसाळे वृक्षाने पाहिले. पानगळीच्या उत्सवात वृक्षाने जुनी सुकलेली पाने टाकून दिली आणि वसंताच्या चाहुलीने वृक्ष नखशिखान्त मोहरूनही गेला.

वृक्षाला फळे आली. ती त्याने आनंदाने त्याच्या सावलीत विश्रांती घेणार्‍या माणसांना दिली. वृक्ष आपल्या नव्या मित्रांच्या सहवासात अगदी गढून गेला. वृक्ष त्याच्या जुन्या आठवणी विसरला.

एकदा वृक्षाचा बालपणीचा मित्र सुरवंट त्याला भेटायला म्हणून वर चढू लागला. तर वृक्षाने त्याच्या गिळगिळीत अंगाची किळस येऊन सुरवंटाला दूर फेकून दिले. हेच मुंग्यांच्या बाबतीतही झाले. त्याच्या बालमैत्रीणी मुंग्या आता त्याला आवडेनाशा झाल्या. कधी एखादी मुंगी त्याच्या अंगाखांद्यावर, पानांवर चढली तर तो पाने हलवून तिला खाली भिरकावून देऊ लागला. ज्या कृमीकिटकांनी त्याला मातीतल्या पौष्टिक घटकांचे विघटन करून खाद्य पुरवले होते त्यांची वृक्षाला घृणा वाटू लागली.

एवढेच नव्हे तर वृक्ष त्याच्या आईला, चक्क मातीलाही विसरला. आता ती पूर्वीची मायाळू ओलसर माती त्याला आवडेनाशी झाली. तिच्या त्या चिखलरुपी अंगाची त्याला शिसारी येऊ लागली. हळूहळू त्याने मातीशी बोलणे बंद केले. पुढे पुढे त्याने मातीकडे खाली झुकून पाहणेही बंद केले.

वृक्ष बदलला. नव्या मित्रांच्या सान्निध्यात येऊन तो जुन्या जिवलगांना विसरला. तो अधिकाधिक फोफावू लागला तसा त्याचा ताठाही वाढला.

असेच मोठे होऊन कालातरांने गगनाला भिडण्याचे स्वप्न तो पाहू लागला.

पक्ष्यांचे गुंजन, वार्‍यासोबत पानाफुलांचे झुलणे आणि डोक्यावर पसरलेले निळेभोर आभाळ त्याला मोहवू लागले.

मातीला वृक्षातले हे बदल कळत होते. वृक्ष आता तिच्यासोबत पूर्वीसारखे हितगूज करत नाही याचे तिला वाईट वाटले नाही; पण वृक्षाने सुरवंट, मुंग्या, मातीतले कृमीकिटक यांच्यासोबतही संबंध कमी केल्याचे अतीव दु:ख मात्र मातीला झाले.

मातीने एकदोनदा वृक्षाला समजवायचा प्रयत्नही केला. पण वृक्ष आढ्यतखोरपणे म्हणाला, “ शी! हे असले किळसवाणे जीव माझे मित्र? छे! काहीही काय!! मुळात मी इथला नाहीच. मी आहे दूरदेशीचा. मी अशा प्रदेशातून आलोय जिथे हे असले किड्यामुंग्यासारखे घाण जीव नाहीतच आणि तुझ्यासारखी चिखलाने भरलेली किळसवाणी मातीही नाही. मी अशा प्रदेशातून आलोय जिथली माती हिरवं वस्त्र नेसते. तुझ्यासारखी घाण काळूंद्री नाही ती.”

मातीला वाईट वाटलं. तिने विचारलं, “ ही माहीती तुला कुणी सांगितली?”

वृक्ष म्हणाला, “ लाल चोचीचा, निळ्या पंखांचा आणि डोक्यावर पिवळ्या रंगाचा भरजरी तुरा असलेला एक सुंदर पक्षी परवा मला भेटायला आला होता. त्याने मला सांगितली ही गोष्ट. मी श्रेष्ठ आहे. कारण मी एका श्रेष्ठ प्रदेशातून आलेलो आहे. यापुढे तुमच्या सारख्या घाणेरड्या लोकांशी मी कधीही बोलणार नाही. मी वृक्ष आहे. मी वनस्पती आहे. मी इतर प्राण्यांसारखा, माणसांसारखा परावलंबी नाही. माझे अन्न मी स्वत: तयार करतो. मला तुमची गरजच काय? ”

माती त्या दिवशी एकटीच रडली. ज्या बिजाला प्रेमानं न्हाऊमाखू घातलं, ज्या बिजाला आपल्या हातांनी घास भरवले, ज्या बिजावर मायेचा वर्षाव करत वाढीस लावलं- ते बीज मोठा वृक्ष झाल्यावर अशाप्रकारे बोलतंय हे पाहून माती दु:खी झाली. पण तिने वृक्षावर राग धरला नाही. वृक्षाच्या मुळांतून त्याला पाणी पुरवण्याचं, पौष्टीक अन्नघटक भरवण्याचं काम तिने अव्याहतपणे चालूच ठेवलं.

वृक्ष अधिकाधिक उन्मत्त बनू लागला. वृक्ष अहंकाराच्या नव्या पायर्‍या चढू लागला.

पण सगळेच दिवस काही सारखे नसतात. सगळेच ऋतूही काही सारखे नसतात.

एका पानगळीनंतर, ग्रीष्माचा ताप सहन करून वृक्ष मोठ्या आतुरतेने वसंतातील पाऊसधारांची वाट पाहात होता. पण त्यावर्षी पाऊस काही पडला नाही. दिवस कोरडा उगवायचा आणि कोरडाच मावळायचा.

दिवसभर माथ्यावर सूर्य तळपत राहायचा. पण पाऊस काही पडायचा नाही. त्यावर्षी सर्वत्र कोरडा दुष्काळ पडला. दुष्काळाने संकटात पडलेले सर्व जीव तो प्रदेश सोडून दूरदेशी नव्या प्रदेशाच्या शोधात निघाले. आता वृक्षाच्या नवीन मित्रांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली. पक्षी, पाखरे आता वृक्षाकडे फिरकानेसे झाले.

मातीतली पाण्याची पातळी खालावली, तसं वृक्षाला पाणीही मिळेना. मातीने आटोकाट प्रयत्न करून वृक्षाला तगवण्याचे काम केले, पण पाऊसच नाही, त्यामुळे पाणीच नाही. त्याला ती बिचारी काय करणार?

हळूहळू वृक्ष सूकत गेला. हळूहळू वृक्ष वठत गेला.

एके दिवशी सोसाट्याचा वारा आला आणि वृक्ष उन्मळून पडला.

खाली पडल्याने त्याच्या फाद्यांना, उरलेल्या पानांना आणि फुलांना जबर इजा झाली.

त्याची मूळंही मातीपासनं दुरावली.

मरणशय्येवर पडलेला वृक्ष वेदनेने कण्हू लागला.

त्याही परिस्थितीत मातीने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला धीर दिला. मुंग्या, किडे, सुरवंट, जमिनीतले कृमीकिटक हे सारे त्याचे मित्र त्याच्या जवळ आले.

वृक्ष रडू लागला. म्हणाला, “ मी चुकलो. माझ्या पडत्या काळात तुम्ही मला साथ दिलीत. पण मी मात्र माझ्या उमेदीच्या काळात तुमच्याशी खूप वाईट वागलो. मी आता मरणार. माझी पानं, फुलं, फांद्या आणि माझा हा सुंदर देह आता सडून जाणार.”

पण मातीने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि ती म्हणाली, “ तुझी पाने-फुले सुकून जाणार हे खरं. तुझा देहही नष्ट होईल. पण हे तर निसर्गाचे चक्रच आहे. तू सुकून जाशील. तुझ्या सुंदर देहाची माती होईल. म्हणजे तू पुन्हा माझ्यातच मिसळून जाशील. पण माझ्यात मिसळून तू माझ्यासारखाच बनण्याआधी तुझे एखादे बी माझ्या कुशीत पुन्हा एकदा रुजेल आणि त्या बिजातून तू पुन्हा एकदा जन्म घेशील. हा निसर्गाचा नियमच आहे. जो जीव बदलत्या निसर्गाशी जुळवून घेतो तोच टिकतो. बाकीचे नष्ट होतात. पण जीव म्हणजे काय? तू एकटा नव्हे तर तुझी संपूर्ण प्रजाती म्हणजेच तुझ्या जातीचे सर्व वृक्ष होय. आज तू मरशील पण तुझ्या बिजातून तुझ्या प्रजातीचा एक नवा वृक्ष जन्म घेईल. तो जन्म घेताना कदाचीत बदलत्या ऋतुमानाशी लढण्याची नवी शस्त्रे घेऊन येईल. पुन्हा कधी दुष्काळ पडला तर तो जास्त काळ तग धरेल. हेच ऋतुचक्र आहे. हेच निसर्गचक्र आहे.”

वृक्षाने मातीचे बोल ऐकून शांतपणे प्राण सोडले.

हळूहळू वृक्ष सुकला.

वृक्षाची माती झाली आणि ती जमिनीशी एकजीव होऊन गेली.

पुढे काही दिवसांनी त्या वृक्षाच्या बिजातून अजून एक नवे रोप जन्मले. मातीने त्या बिजालाही प्रेमाने आणि मायेने मोठे केले. वृक्ष नष्ट झाला नाही. त्याच्या बिजातून एक नवा वृक्ष जन्माला आला आणि त्याने त्याची प्रजाती जिवंत ठेवली.

- ऋषिकेश गुप्ते