सह्याद्रीतील गड-दुर्गांची भटकंती

सह्याद्रीतील घाटावाटाचा सातत्याने मागोवा घेऊन, त्या वाटेने मनसोक्त भटकंती करणारे श्री.सुशिलराव दुधाणे हे अनेकांच्या परिचयाचे आहेत.

सह्याद्रीतील गड-दुर्गांची भटकंती
सह्याद्रीतील गड-दुर्गांची भटकंती

सह्याद्री, निसर्ग, झाडेझुडपे आणि सुशिलराव हे जणू समीकरणच झाले आहे. सर्वांना सामावून घेणार मन असलं की माणसं जोडली जातात हे दुधाणे यांना सह्याद्रीच्या घाटवाटांनी शिकवलं असावं. निसर्ग मानवाच्या सर्व प्रवृत्तीचा सहजपणे स्वीकार करतो. जंगलतोड करणाऱ्या व्यक्तिला किंवा शिका-याला निसर्ग समान निरपेक्षपणे सेवा देत असतो. दुधाणे हे माझे माहितीप्रमाणे २००६ पासून सह्याद्रीच्या घाटवाटा धुंडाळीत आहेत. हे एक प्रकारचे वेड त्यांच्या तनमनात भिनले आहे. जेव्हा वेगळ काही करायचं असत तेव्हा वेड व्हावे लागते हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

यातूनच जून २०१९ मधे त्यांचे ' घाट वाटा' हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले तर त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२० मधे दुसरे ' सह्याद्रीतील घाट वाटा' हे पुस्तक प्रकाशित झाले. अर्थात दोन्ही पुस्तकांचा विषय आपल्या लक्षात आलाच असेल ! दुसऱ्या पुस्तकाप्रमाणे तिसरे पुस्तक देखील आठ महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०२० मधे प्रकाशित झाले. २०२० हे वर्ष म्हणजे जागतिक महामारीच्या सावटाखाली असताना सुद्धा या वर्षात त्यांची दोन पुस्तके प्रकाशित होणे हे सामान्य नाही.

पहिल्या दोन पुस्तकातून अनेक घाट वाटांचा मागोवा घेतल्यावर त्याच घाट वाटेने जिथे पोहोचतो ते ठिकाण म्हणजे गिरिदुर्ग. ' सह्याद्रीतील गड-दुर्गांची भटकंती' हे पुस्तक आठ जिल्ह्यातील सुमारे चाळीस किल्ल्यांचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून घेतलेला आढावा. सामान्य नागरिकांना एका दिवसाच्या सहलीत निसर्ग, दुर्ग पर्यटन करण्याची मनिषा होते. चाळीस किल्ल्यांची पर्यटन पुरक माहिती दिली आहे.आधुनिक साधनांचा सुंदर वापर केला आहे. जोखीम काय घ्यावी, कोणत्याही ऋतूत काय परिस्थिती असते व तेथे काय पहावे ! इतकी सहज सोपी माहिती दिली आहे परंतु ह्याच माहितीचा सामान्यतः अभाव असतो हे आपण नकळत विसरून गेलेलो असतो.

या पुस्तकात पर्यटनाची नियमावली म्हणजे व्यवस्थित माहिती, मार्ग, अंतर, सोई सुविधा, उंची इत्यादी उपयुक्त माहितीबरोबर आकर्षक प्रकाशचित्रे, गुगल नकाशा देखील दिला आहे. जेष्ठ इतिहास संशोधक व मोडी तज्ज्ञ पांडुरंगजी बलकवडे व जेष्ठ दुर्ग अभ्यासक प्रा.प्र.के.घाणेकर सरांच्या शुभेच्छा या पुस्तकांस लाभलेल्या आहेत.

गड-किल्ले भटकंती करणाऱ्यांना एक मार्गदर्शक ठरणाऱ्या पुस्तक निर्मितीसाठी श्री.सुशिलराव यांचे व नावीन्य प्रकाशनचे अभिनंदन व धन्यवाद.