निसर्गरम्य व ऐतिहासिक तळे व तळागड

रायगड जिल्ह्यात पुरातन ऐतिहासिक वारसा सांगणारी अनेक गावे आहेत. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तळे हे गावं त्यापैकीच एक. हजारो वर्षांचा प्राचिन वारसा असणारे हे गाव आजही आपली ऐतिहासिक ओळख व निसर्गरम्यता शाबुत ठेवून आहे.

निसर्गरम्य व ऐतिहासिक तळे व तळागड
तळे गावाचे विहंगम दृश्य

प्राचिन काळी अरबी समुद्रामार्गे होणार्‍या दळण वळण तथा प्रवासाचा एक मार्ग तळ्यावरुन जात असे हे आपल्याला याच तालुक्यात असलेल्या कुडे-मांदाड येथील सातवाहन कालीन लेण्यांवरुन लक्षात येते. सातवाहन काळास महाराष्ट्राचे सुवर्णयुग असेही म्हटले जाते कारण सर्वत्र स्थैर्य नांदत असतानाच महान कलाकृती निर्माण करण्यास अवसर मिळतो व सातवाहन काळातच कोकण मार्गे देशावर जाणार्‍या महत्त्वांच्या मार्गांवर अनेक लेण्यांची निर्मिती झाली. सातवाहन काळी उत्तर कोकण महाभोज नामक सामंतांच्या अखत्यारित येत होते असे शिलालेख कुडा लेणी येथे आढळून येतात याचाच अर्थ तळे हे गाव सातवाहन कालीन महत्त्वाचे असे ठिकाण असले पाहिजे.

तळा गावाचे नाव कसे निर्माण झाले असावे याचा विचार करताना अनेक शक्यता समोर येतात. पहिली शक्यता म्हणजे स्थळ या संस्कृत शब्दाचे प्राकृत रुपांतर तळ असा होतो, प्राचिन काळापासून तळे हे एक महत्त्वाचे स्थळ असल्यामुळे तळा हे नाव पडले असण्याची शक्यता आहे, दुसरी शक्यता म्हणजे तळे हे गाव त्याच नावाने विख्यात असलेल्या तळागडाच्या पायथ्याशी असल्याने किल्ल्याच्या तळाशी असलेले गाव किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला सैनिकी किंवा राजकिय तळ या अर्थाने या गावास तळे हे नाव मिळाल्याची दुसरी शक्यता आहे. तिसरी शक्यता म्हणजे गावातील पाण्याचे साठे अर्थात तळी, पुर्वी गावात असे पाण्याचे साठे अर्थात तळी मुबलक असण्याची शक्यता आहे त्यामुळेही कदाचित गावास हे नाव मिळाले असले पाहिजे.

तळे हे गाव तसे छोटेखानी, टुमदार गाव ऐन तळगडाच्या पायथ्याशीच वसले आहे. तळागड सुद्धा अतिशय ऐतिहासिक असा दुर्ग, कुंडलिका-मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी अतिशय उत्तम अशा या दुर्गाची निर्मिती केव्हा झाली याची निश्चीत माहिती उपलब्ध नसली तरी अगदी सातवाहन काळापासून महत्त्वाच्या अशा व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी ज्या किल्ल्यांची निर्मिती झाली त्याच किल्ल्यांपैकी हा एक असावा कारण याच पुरातन व्यापारी मार्गांवर बांधण्यात आलेली कुडा लेणी, घोसाळगड तसेच अवचितगड हि शृंखला या परिसराच्या प्राचिनत्वाची साक्ष देतात.

सन १६४३ च्या सुमारास तळे परिसर हा आदिलशहाचा मांडलिक असलेल्या जंजिर्‍याच्या सिद्दीकडे होता. १६४८ साली शिवाजी महाराजांनी तळागडही स्वराज्यात सामिल केल्याचे उल्लेख मिळतात. मराठ्यांचे कट्टर शत्रू असलेल्या जंजिर्‍याच्या सिद्दीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तळागडचा शिवाजी महाराजांना फार मोठा उपयोग झाला. तळागडावरुन चौफेर नजर टाकल्यास घोसाळगड, अवचितगड व रायगड इत्यादी किल्ल्यांचे दर्शन होते, पुर्वी हेच किल्ले संदेशवहनासाठी सध्याच्या मोबाईल टॉवरसारखे कार्य करत असत. १६५१ साली आदिलशाही सरदार अफजलखानाने जावळी येथे स्वारी केली होती तेव्हा आदिलशाही सरदार सिद्दीने तळा गडास वेढा घातला होता मात्र अफजलखानाच्या पराभवाची बातमी कळताच सिद्दीने हा वेढा उठवला. सन १६६६ मध्ये मुघल सरदार मिर्झा जयसिंगाबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जे बारा किल्ले स्वतःच्या ताब्यात ठेवले त्यामध्ये तळागडाचा समावेश होता यावरुन शिवाजी महाराजांच्या दृष्टीने तळागडाचे महत्त्व किती होते हे लक्षात येते.  शाहू महाराजांच्या काळात तळे परिसर सिद्दीच्या ताब्यात होता, सन १७३३ साली पहिल्या बाजिरावाने कोकणावर मोहिम काढून तळागड, घोसाळगड व बिरवाडी हे तिन महत्त्वाचे किल्ले ताब्यात घेऊन सिद्दीचा कणाच मोडून टाकला. सन १८१८ मध्ये कर्नल प्रोथरने तळागड ब्रिटीशांच्या ताब्यात घेतला.

तळागड हा किल्ला अतिशय प्रेक्षणिय आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजुनही सुस्थितीत आहे. किल्ल्यात प्रथम हनुमान दरवाजा लागतो याच हनुमान दरवाजाच्या उजव्या कोपर्‍यात हनुमानाची एक मुर्ती कोरलेली आहे तसेच जवळच एक पिण्याच्या पाण्याचे टाके दिसून येते या टाक्या जवळच एक शरभशिल्प ठेवलेले दिसून येते. टाक्याजवळच्या प्रवेशद्वारातून हे शिल्प निखळुन पडले असावे. किल्याच्या माथ्यावर उजव्या बाजुला दोन बुरुज दिसतात. परिसरात एका भग्न मंदीराचे अवशेष दिसतात, कदाचित हे गडावरील पुर्वीचे चंडिका मंदीराचे अवशेष असावेत. येथून उत्तरेकडे चालू लागल्यावर पाण्याच्या तीन टाक्या दिसुन येतात येथुन पुढे गेल्यावर परत कातळात खोदलेली सात भलीमोठी पाण्याची टाकी व लक्ष्मी कोठार नामक वास्तू पाहायला मिळते, तसेच एका छोट्या शिवमंदीराचे अवशेष येथे पहावयास मिळतात. येथून उत्तरेकडे गड थोडा निमुळता होत गेला आहे, गडाचे उत्तर टोक म्हणजे एक ताशिव कडाच आहे, या गडावर एक बुरुज बांधून गड मजबुत केला आहे. गडावर असणारे वाड्यांचे, कोठारांचे अवशेष व पाण्याची मोठ्या संख्येने असलेली टाकी हि त्याकाळातली गडावरील शिबंदीची गरज दर्शवितात कारण हा गड अतिशय संवेदनशिल परिसरात असल्याने वारंवार पडणार्‍या वेढ्यांमध्ये अथवा मोहिमांमध्ये शिबंदीची कमी भासू नये म्हणुन केलेली ही योजना असावी.

अर्थात तळागडाप्रमाणेच त्याच्या पायथ्याशी वसलेले तळे हे गाव सुद्धा अतिशय वैभवसंपन्न असा वारशांनी समृद्ध आहे. गावात पुरातन वास्तू तथा मंदीरे यांच्या एवढ्या शृंखला आहेत की पर्यटकांना काही वेगळ पहायला मिळाल्याचा आनंद मिळून जातो. गावाच्या मध्यभागी एक शिल्प आहे ज्यावर पुर्वी कोरिवकाम व शिलालेख लिहीलेला असावा मात्र कालौघात आता हे कोरिवकाम पुर्णपणे नाहिसे झाले आहे याशिवाय गावातील ग्रामदैवता चंडिकामाता, कानिफनाथ, विरेश्वर, भुवनेश्वर इत्यादी मंदीरे येथे असून येथील शिलाहारकालिन गणेश मंदीर स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. गावात फिरत असताना अनेक जुन्या वास्तूंचे जोते पाहताना तळे हे गाव एकेकाळच्या वैभवसंपन्न अशा सरदारांचे व तालेवारांचे वसतीस्थान असावे अशी प्रचिती वारंवार येते. या गावात पाण्याच्या सोयींसाठी ज्या विहीरी बांधल्या आहे त्या विहीरींवरील शिलालेखही या परिसराचे वेगळेपण दाखवतात कारण बरेचसे शिलालेख अर्वाचिन असले तरी यातून तळेकरांचा प्राचिन वारसा जपण्याचा प्रयत्न अधोरेखित होतो.

येथील भुवनेश्वर या प्राचिन शिवमंदीरातील एक शिलालेख तर अनेक इतिहास अभ्यासकांसाठी औस्त्युक्याचा विषय ठरेल. कारण कोकणात सापडणारा तेलुगु (हाले कन्नड) भाषेतला हा एकमेव शिलालेख असल्याने इतिहासाच्या अभ्यासाच वेगळीच कलाटणी देणारा आहे. हा शिलालेख सध्याच्या आंध्रप्रदेशातल्या राजामहेंद्रवरम या जिल्ह्यातल्या अमलापुरम या ठिकाणी राहणार्‍या वेंकण्णाचा पुत्र रामय्या याचे नावे असला तरी यावर हा शिलालेखाचा काळ अस्तित्वात नाही. परंतू अमलापुरम हे गाव बंगालच्या उपसागराजवळ व तळे हे गाव अरबीसमुद्राजवळ मग देशाच्या वेगवेगळ्या टोकांवरील संस्कृती एकत्र येण्याचे प्रयोजन काय असावे असा प्रश्न पडतो. वेगळ्या अंगाने विचार केला असता पुर्वी उत्तर कोकण हे निजामशाहच्या अखत्यारित येत होते व सन १५४३ साली बुर्‍हान निजामशाहने विजयनगर सम्राट अलिया रामराय याच्याबरोबर युती केली होती कदाचित याच युतीतून निजामशाही कोकणात जी बांधकामे झाली त्यापैकी हे मंदीर असण्याची शक्यता आहे, अर्थात हा सखोल संशोधनाचा विषय आहे.

२७ जुन १९९९ साली माणगाव तालुक्याचे विभाजन होवून तळे तालुका अस्तित्वात ज्याचे तहसिलाचे ठिकाण तळे येथेच आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापुर येथून तळ्यास जाण्यासाठी फाटा आहे तसेच रोह्यावरुनही तळ्यास जाता येते. पुर्ण एक दिवस हातामध्ये असल्यास तळे गाव, तळागड व कुड्याची लेणी व घोसाळगड हा परिसर एका दिवसात पाहून होण्यासारखा आहे. निसर्ग व इतिहास एकाच वेळी अनुभवायचा असेल तर एकदातरी तळे परिसराच भेट द्यायलाच हवी.