उत्तुंग तुंग किल्ला

खूप दिवसाआधीच विवेक सरांनी या मोठ्या ट्रेक आणि शिबिराची कल्पना दिली होती व यायचंच आहे म्हणून सांगितलं होतं आणि मीही येणारच असं सांगितलं होतं. त्यानुसार सरांचं व नानांचं नियोजन चालू होतं. माझ्या या आधीच्या न येण्याच्या अनुभवावरून स्नेहाताई वारंवार खात्री करून घेत होत्या. ७ फेब्रुवारी २०१९च्या एका गुंग दुपारी सौमित्र ‘सर’देसाई यांचा कॉल आला. जगभरच्या नि इतर बाता झाल्या नि शेवटी ‘‘खूप दिवस झाले कुठे गेलो नाही, कंटाळा आला आहे’’ असे दोन्हीकडचे सूर लागले नि त्याची परिणती “चल कुठेतरी ट्रेकला जाऊ’’ यात झाली. लोणावळा म्हणजे आपलं हक्काचं ठिकाण… सर्वच बाबतीत… इथे सगळं काही आहे. इथलं वातावरण

उत्तुंग तुंग किल्ला
तुंग किल्ला

तर यावेळी पण google वरच्या नि विचारांच्या अनेक उड्या शेवटी लोणावळयावर येऊन थांबल्या व खूप दिवसाधी मोरगीरी व तुंग वर जाण्यासाठी निघालेली गाडी दोन दिवसाआधी नि खरंतर घुसळखांबला पोहोचल्यावर फक्त तुंगवरच गेली. तर त्या प्रवासाची ही खर्डेघाशी.. नेहमीप्रमाणे आपली पहाटेची ‘इंद्रायणी’ पकडली नि बोर घाटातल्या थंडगार वाऱ्याच्या साथीने लोणावळा गाठलं. सर्व सुनियोजित असल्याने घाई वगैरे नव्हती. त्यामुळे श्रेयसला आणण्यासाठी व खरेदीसाठी लोणावळा शहर फिरलो. पुन्हा दीपकच्या घरी येऊन चहा-नाश्ता केला नि भांबुर्डे ST पकडून तिघेही घुसळखांबसाठी रवाना झालो. 

यावेळी राऊंचा कॅमेरा सोबत असल्याने टप्प्याटप्प्यावर STतून सह्याद्रीचे चित्रण चालू होते. अर्ध्या-पाऊण तासात ST ने घुसळखांब गाठले व ST ला टाटा करत डावीकडील तुंग व मोरगीरीच्या वाटेला लागलो.  समोरच मोरगीरीची रांग दिसत होती. 

त्याबद्दल चौकशी केली. पण निश्चित अशी माहिती हाती न लागल्याने तुंगची ८-१०किमीची वाट तुडवण्याचे निश्चित झाले. साधारण १-२किमी चाललोही पण आज नशीबजोरावर होते. मागून येणाऱ्या एका omniला हात दाखवला. ते काकासुद्धा तुंगवाडीतच जाणारे होते. त्यामुळे ते आम्हाला न्यायला तयार झाले. मागे सीट नसल्याने बसून खरंतर झोपूनच काकांशी गप्पा मारत.मोरगीरीच्या रांगेला व देवघर डोंगराला वळसा मारत. तुंगच्या पायथ्याला उतरलो. काकांचे आभार मानले व उत्तुंग तुंगवारीला सुरुवात केली.

कॉंक्रिट बांधकाम असलेला गाडी रस्ता आपल्याला पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत पोहोचवतो. या मंदिराबाहेर गजलक्ष्मीचे शिल्प आहे. मारुतीरायाचे दर्शन घेतले, पायथ्यापासून मानमोडेपर्यंत तुंगची भव्यता डोळ्यात साठवली नि पाऊले उत्तुंग दिशेला चालू लागली. गडाची पायवाट विविध फुलांनी नटलेली होती. 

थोडयाच वेळात एका कोरडया टाक्याजवळ मारुतीरायाच्या व गणपती बाप्पाच्या शिल्पाचे दर्शन घेऊन पुढे निघालो. जसजसं वर जात होतो तसतसं सभोवतालच्या प्रदेशाचे विस्तीर्ण रूप दिसू लागत होते. थोड्या दगडधोडयांच्या मार्ग संपूर्ण कातळकोरीव पायऱ्यांच्या मार्गावरुन थोड्या सपाट जागी आलो. इथून गडाचा पहिला दरवाजा दिसू लागला होता.

या प्रवेशद्वाराची कमान आजही सुस्थितित आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. थोड्या विश्रांती सोबत प्रवेशद्वाराची बांधणी त्याला लागूनच असलेली तटबंदी व तुंगच्या इतर विषयांवर चर्चा झाली. काही नवीन गोष्टी समजल्या. आता नसले तरी स्वातंत्र्यपर्यंतच्याकाळात या कमानीला लाकडी दरवाजे अस्तित्वात होते. याच दरवाजाच्या उजव्या बाजूच्या उंचीवर गडाचा दूसरा दरवाजा आहे. पण तिथे न जाता आम्ही समोर असलेल्या वाटेने कडेकडेने गडाच्या पश्चिम टोकावरील बुरुजावर गेलो. या वाटेत काही टाकी, वास्तु अवशेष व एक दगडी पाटा पाहायला मिळाला. हे सर्व पाहून सोंडेच्या शेवटी असलेल्या बुरुजावर येऊन पोहोचलो. येथून देवघर डोंगर व मोरगीरी सुस्पष्ट दिसत होते. तर उत्तरेला लोहगड-विसापूरची जोडगोळी दिसत होती.

माघारी फिरत पहिल्या द्वारापाशी आलो. इथूनच समोर काही पायऱ्याचढून आपण दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचतो.या दरवाजाला दोन्ही बाजूने भक्कम बुरुजांचे संरक्षण लाभले आहे. तर द्वाराच्या समोरच असलेल्या बुरुजाच्या भिंतीवर हनुमानाचे कोरीव शिल्प आहे. या द्वाराची कमान पहिल्या द्वारापेक्षा कमी उंचीची आहेव आतील दोन्ही बाजूस देवडया आहेत वसमोरच असलेल्या बांधीव पायऱ्यावरुन गडाच्या माचीत प्रवेश होतो. माचीच्या पश्चिम भागात काही दुर्गावशेष शिल्लक आहेत. तर मध्यभागात सदरेचे अवशेष दिसत. सदरेच्या समोरच श्रीगणेशाचे छोटे मंदिर आहे व मंदिराबाजूला उतरण्यास पायऱ्या असलेले मधुर पाण्याचे सुंदर टाके आहे. 

झाडांच्या सावलीत टाक्याकाठी थोडी विश्रांती घेतली. झाडाची सावली व टाक्यातील सुमधुर पाण्याने पुन्हा ताजेतवाने झालो नि लगेच गडाच्या उत्तुंग टोकाकडे निघालो.वर जाण्याआधी माचीच्या उत्तर भागात थोडा फेरफटका मारला. इथून मावळातील रंगीबेरंगी शेती, छोटी टुमदार घरे दिसत होती. या भागात तटबंदीचे काही अवशेष दिसून येतात. गडफेरी चालू ठेवत डोंगराच्या सावलीने कडेकडेने गडाच्या शेवटच्या टप्प्याच्या पायथ्याला आलो. इथेही काही वास्तूंचे अवशेष दिसून येतात. थेट माथ्याकडे जाण्याआधी त्याच डोंगराच्या उजव्या पायवाटेने आत गेलो. इथे दोन पाण्याची टाकी दिसली. त्यापैकी एक टाके पूर्णपणे कोरडं होतं तर दुसऱ्या टाक्यात नितळ पाणी होतं. हे पाहून पुन्हा मागे नि गडाच्या अंतिम टप्प्याची चढाई सुरु केली.

चढाईच्या अंतिम टप्पा मुरमाड मातीचा आहे. पण धोकादायक नाही. अखेर शेवटी दगडांच्या आधारे तुंगचाउत्तुंग माथा गाठला. समोरच स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडफडून स्वागत करत होता.  त्याच्या जवळच एक कोरडे टाकं भग्नावस्थेत आहे. माथ्यावर असलेल्या गडदेवता तुंगाई देवीचे दर्शन घेतले. या गडावरून मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. तिन्ही बाजूने वेध घातलेले पवना धरण, आग्नेयेला असलेला तिकोना उरग वितंडगड, त्यामागचा मांडवी डोंगर, उत्तरेला सुस्पष्ट दिसणारी लोहगड-विसापूरची जोडगोळी, पश्चिमेला मोरगिरी, त्याचे पठार, देवघर डोंगर, नैऋत्येला दूरवर अंधुकसा दिसणारा कोरीगड व दक्षिणेला पसरलेली अथांग सह्याद्रीची रांग… 

हे सर्व पाहून डोळ्याची, मनाची नि कॅमेऱ्याची भूक भागवली. पण आता पोटाची भूक भागवणे देखील महत्त्वाचे होते. म्हणून गड’माथे’फेरी पूर्ण करत आल्या वाटेने पुन्हा गणेश मंदिराजवळ आलो. वृक्षराजीच्या सावलीत, सुंदर टाक्याकाठी क्षुधाशांती केली नि थोडा वेळ तिथेच विश्रांती घेतली. एवढ्या सुंदर व थंड ठिकाणाहून उठावेसे वाटत नव्हते पण अजून गड पहायचा असल्याने व मुंबई गाठायची असल्याने पाऊले परतीच्या मार्गाला लागली. माचीवरील दुर्गावशेष पाहून दोन्ही दरवाजांना नमस्कार करून बाहेर आलो. पहिल्या प्रवेशद्वारापासून उतरण्याच्या वाटेवर काही अंतरावर एक एक छोटेसे टाके लागते याच टाक्याच्या समोरील वाट एका मोठ्या खांबटाक्याकडे नेते इथे जाताना जरा सांभाळून जावे लागते. ते विशाल टाके पाहून पुन्हा मुख्य वाटेवर परतलो व ‘कठीणगडा’च्या सोप्या वाटेने पायथ्याला आलो.

खाली उतरून डाव्या बाजूला असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराकडे मोर्चा वळवला. मंदिर बंद होते म्हणूनच बाहेरूनच हात जोडले. मंदिरासमोर अनेक शिल्पकृती एका रांगेत ठेवलेल्या होत्या. त्यातील काही वीरांची स्मारके, वीरगळ, होत्या.  त्या अनामिक शूरांना वंदन केले व मोहीम पूर्ण करत घुसळखांबच्या वाटेला लागलो.

- अमित म्हाडेश्वर