साल्हेर किल्ला - महाराष्ट्रातील सर्वात उंच गड

साल्हेर किल्ला - महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीदुर्ग! नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातील बागलाण नावाच्या प्रदेशात हा किल्ल्यांचा सम्राट वसलेला आहे.याच परिसरातील साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मांगी-तुंगी ही तर ट्रेकर्सची हक्काची ठिकाणे.

साल्हेर किल्ला - महाराष्ट्रातील सर्वात उंच गड

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाईनंतर साल्हेर किल्ल्याचे नावं अभिमानाने घेतले जाते. भारताचा सुवर्णदिन येथेच साजरा करायचा आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर विहरणार्‍या वार्‍याच्या संगतीने फडकणार्‍या तिरंग्यास याच सर्वोच्च ठिकाणाहून मानवंदना द्यायची. 

360 अ‍ॅडव्हेंचर सोल्युशन्स या पुण्यातील गिर्यारोहन संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. उत्साहात तयारीला सुरुवात झाली. पण याच काळात पुण्यात स्वाईन फ्लुचे थैमान चालू होते. लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. त्यामुळे प्रश्न हा होता की आमच्या खटपटीला प्रतिसाद कितपत मिळणार. पण आमची ही शंका खोटी ठरवत २० जणांची टीम या सोहळ्यास उपस्थित राहण्यास तयार झाली.

अत्यंत उत्साहात आम्ही नाशिककडे रवाना झालो. कार्यक्रमाचा पायाच भक्कमपणे रोवला गेला होता. रात्रीचा प्रवास दुसर्‍या दिवशीची स्वप्ने रंगवण्यात पायथ्याच्या साल्हेर गावात येऊन संपला. गावातील नित्याचे व्यवहार सुरु झाले होते. हिरवाईची मखमली चादर पांघरलेला साल्हेर किल्ला मात्र ढगात होता.

गावातील प्रत्येकाच्या नजरेत हा सवाल दिसत होता की आयत्या मिळालेल्या सुट्टीची मजा लुटण्याऐवजी ही मंडळी येथे काय करत आहेत? पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मात्र आमच्याकडेच होतं. लांबलचक भातशेती परिसराच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत होती. गावाबाहेर पडून जेव्हा साल्हेरच्या दिशेने वाटचाल सुरु केली तेव्हा पावसाने बरसायला सुरुवात केली होती. \

साल्हेरचे नजरेआड दिसणारे शिखर अनाहूतपणे साद घालत होते. पायथ्याला एक छोटेखानी मंदीरही नुकतेच उभारले गेले होते. पायवाट संपून आता पायर्‍या सुरु झाल्या होत्या. पहिली विश्रांती तेव्हाच घेतली जेव्हा पहिल्या प्रवेशद्वाराने मनापासून स्वागत केले. पुढे गडाचे दुसरे व तिसरे प्रवेशद्वार सुद्धा पार केले. तिसर्‍या प्रवेशद्वारावरील शिलालेख सहज लक्ष वेधून गेला. ही तिनही प्रवेशद्वारे आजही भक्कमपणे उभी आहेत. गडाच्या पहिल्या टप्प्यावर आमचा प्रवेश झाला होता.

हिरवळीने मुक्तपणे पसरलेल्या दुलईवरुन पुढचे मार्गक्रमण चालु झाले. साल्हेरचा कडा आता अधिकच भव्य वाटू लागला होता. पुन्हा एकदा पायर्‍या सुरु झाल्या मात्र या पायर्‍या परीक्षा पाहणार्‍या होत्या. निसरड्या मार्गावरुन जाताना बुटांनी आपली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पाडली.

पुन्हा एकदा तीन दरवाज्यांची भव्य मालिका पार केली आणि गडावर पोहोचलो. एकूण सहा दरवाजे क्वचित एखाद्या किल्ल्यास असातील. आता गडावरील अवशेषांची मालिका सुरु झाली. साल्हेरच्या समृद्धतेचा अनुभव पावलोपावली येत होता. पाण्याची टाकी, पुरातन यज्ञवेदी, बांधकामांचे अवशेष इत्यादींचे निरिक्षण करुन गडाच्या मुख्य गुहेसमोर जेव्हा आलो तेव्हा आनंदाचा सुखद धक्का बसला. अत्यंत प्रशस्त अशी ही गुहा म्हणजे आपल्यासारख्यांसाठी Deluxe Accomodation आहे. गुहेसमोर पाण्याने तुडूंब भरलेल्या गंगासागराने तर श्रमपरिहाराबरोबरच अमृतप्राशनाचाही अनुभव दिला.

आता प्रत्येकालाच शिखरवेध लाभले होते. अजुनही धुक्यातच असलेल्या शिखराची नेमकि दिशा धरुन निघालो. वाटेवर नुकत्याच उमलू लागलेल्या कळ्यांनी माना डोलावून शुभेच्छा दिल्या. शेवटची चढण संपवली आणि सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. प्रत्येकाचीच उत्सुकता आता आस्मानाला भिडली होती.

सलील व सागरने ध्वजवंदनाची पुर्वतयारी सुरु केली. एवढ्या दिवसांचे स्वप्न साकार होणार होते. ज्या क्षणासाठी इथपर्यंत आलो तो क्षण आता जवळ आला होता. कोणालाच धीर धरवत नव्हता. ध्वजवंदनाची तयारी पुर्ण झाली अन २० जणांचे मंत्रमुग्ध आवाज राष्ट्रगीत गाऊ लागले. त्या मंतरलेल्या वातावरणात भारताच्या गुणगानाचे स्वर गगनास भिडले होते.

प्रत्येक भारतीयाचा अभिमान असलेल्या या शब्दांची पवित्रता शिवस्पर्शाने पावन झालेल्या त्या पुण्यभूमीत मनापासून जाणवत होती. हा क्षण संपुच नये असे वाटत होते. प्रत्येकाला बाह्यजगाचा विसर पडला होता. पावसानेही राष्ट्रगीताचा मान राखत बरसण बंद केल होतं. राष्ट्रगीत पुर्ण झाले आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीदुर्गावर विराजमान झालेल्या भगवान परशुरामाच्या साक्षीने तिरंग्यास मानाचे सलाम ठोकले गेले. आनंदाने तर उच्चांक गाठला. प्रत्येकाचाच उर अभिमानाने भरुन गेला होता. ३६० अ‍ॅडव्हेंचर सोल्युशन्सने खर्‍या अर्थाने स्वातंत्रदिन साजरा केला.

या सुवर्णक्षणाने प्रत्येकाच्या हृदयात ध्रुवपद मिळवलं. स्वाईन फ्लु ची तमा न बाळगता आमच्या या अनोख्या साहसाला या २० दुर्गप्रेमींनी भरगोस पाठींबा देत मोलाची मदत केली होती. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एका विजयी हास्याची लकेर उमटली होती. निसर्गानेही आता आमच्या उत्साह आणि आनंदापुढे शरणागती पत्करली.

धुक्याचा दाट पडदा बाजूला झाला आणि साल्हेरच्या रांगड्या जोडदुर्गाने सालोट्याने तिरंग्याला उत्तुंग मानवंदना दिली. संपूर्ण वातावरण स्वच्छ झालं होतं. नाशिक जिल्ह्याचे वैभव असणार्‍या सातमाळा रांगेतील गिरीदुर्गांनी आपापले माथे उंचावत राष्ट्रध्वजाला कडक सॅल्युट ठोकला. सह्याद्रीने आपला दिलखुलास नजारा पेश करुन नेहमीसारखीच आनंदात भर टाकली.

मांगी-तुंगी, न्हावी, रतनगड, मुल्हेर, हरगड, पिंपळा, भिलाई इ. किल्ले सहज दिसत होते. डोळ्याचे पारणे फेडणार्‍या त्या दृश्याने सर्वांनाच मोहून टाकले होते. एका वेगळ्याच विश्वात सर्वजण वावरत होते. त्या मंत्रमुग्ध वातावरणात साल्हेरच्या समरभूमीचे गुणगान ऐकताना प्रत्येकजण भारावून गेला.

राष्ट्रध्वजाला निरोपाची मानवंदना देऊन आम्ही गडमाथा सोडला. साल्हेरचा पूर्व बाजूचा मार्गही रम्य आहे. पुन्हा तीन दरवाज्यांची मालिका पार करुन  व अभेद्य  कातळकड्यावर खोदलेल्या पायर्‍या उतरुन साल्हेर-सालोटा खिंडीत आलो. पायथ्याचे वाघांबे गाव स्पष्ट दिसत होते.

सर्वांना वेध लागले होते ते सर्वगुणसंपन्न अशा मुल्हेर किल्ल्याचे. गड उतरुन वाघांब्यात पोहोचलो. एक अभुतपूर्व अनूभूतीचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होते. २००९ चा स्वातंत्र्यदिन खर्‍या अर्थाने 'ऑफबीट' झाला होता. मुल्हेरचा रस्ता धरला तो गावकर्‍यांच्या अभिनंदनाचा वर्षाव व कौतुकाची थाप घेऊनच.

ओंकार ओक