त्रिशुंड गणपती - स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना

पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये त्रिशुंड गणपती नावाचे एक अतिशय विलक्षण श्रद्धास्थान आहे जे स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे.

त्रिशुंड गणपती - स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

पुणे शहरास अलिबाबाची गुहा म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही कारण शहराच्या अंतर्भागात अनेक चकित करणारी पर्यटनस्थळे पहावयास मिळतात. या स्थळांमधील अनेक ठिकाणे अतिशय प्रसिद्ध आहेत मात्र काही स्थळे ही अजूनही हवी तेवढी प्रसिद्ध पावलेली नाहीत मात्र पुण्याच्या नागरिकांना या स्थळाचा महिमा नक्कीच ठाऊक आहे.

सोमवार पेठ ही पुण्याच्या मध्यवर्ती भागातील एक अतिशय जुनी पेठ. पूर्वी या पेठेस शाहुपुरा असेही म्हणत. या पेठेत पूर्वी अनेक श्रीमंत सावकार, गोसावी रहात असत व आजही त्यांच्या पिढ्या येथे नांदत आहेत. याच पेठेमध्ये त्रिशुंड गणपती नावाचे एक अतिशय विलक्षण श्रद्धास्थान आहे जे स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. सोमवार पेठेत नागेश्वर, नरपत गिरी व त्रिशुंड अशी तीन व इतर अनेक मंदिरे आहेत मात्र यापैकी त्रिशुंड गणपतीचे मंदिर गूढ अशा स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. सोमवार पेठेतील गोसावीपुरा या भागात असलेले हे मंदिर संपूर्ण पाषाणात उभारले गेले असून मंदिरावर अतिशय उत्कृष्ट शिल्पे कोरली गेली आहेत. 

मंदिराची उभारणी अदमासे १८व्या शतकात झाली होती. त्यासंबंधी १७६६ सालच्या एका पत्रात पुढील उल्लेख आहे. 
 

"बैरागी हिंदुस्थानातून विष्णू व गणपतीची मूर्ती घेऊन आले. मूर्ती फार चांगल्या याजकरिता घेतल्या. गणपतीस तुमचे नावाची अक्षत लावली. विष्णू मूर्ती फार चांगली त्यास लहानसे देऊळ बांधून पुष्पवाटिका करावी असें मानस.."

मंदिराच्या प्रवेश भागावर अतिशय विविधांगी शिल्पे कोरलेली दिसून येतात. मुख्य दरवाज्याच्या दोन बाजूस द्वारपालांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. याशिवाय दोन्ही बाजूना साखळदंडात बांधलेल्या गेंड्याची शिल्पे असून त्यांना घेऊन जाणारे काही शिपाई दिसून येतात. दरवाज्यावर गणेश शिल्प आहे. याशिवाय इतर शेकडो शिल्पे या ठिकाणी कोरण्यात आली आहेत ज्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे.

मंदिरात प्रवेश केल्यावर मंदीराचा मुख्य गाभारा लागतो मात्र या गाभाऱ्याखाली तळघरातही एक गाभारा आहे. मुख्य गाभाऱ्यात फारशी, संस्कृत व मराठी अशा तीन भाषेतले शिलालेख कोरले गेले आहेत. मुख्य गाभाऱ्यात त्रिशुंड विनायकाची अतिशय रेखीव मूर्ती आहे. त्रिशुंड म्हणजेच तीन सोंडा असलेल्या गणपती त्यामुळे या पद्धतीची मूर्ती महाराष्ट्रात फार दुर्मिळ आहेत. गणपतीच्या डाव्या मांडीवर देवी स्थापित आहे त्यामुळे या मूर्तीचा व मंदिराचा गाणपत्य संप्रदायाशी संबंध असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. 

तसेच चौरंगावर बसलेल्या या गणेशाच्या खाली मोर असल्याने या गणेशास त्रिशुंड मयुरेश असेही म्हटले जाते. मुख्य गाभाऱ्यातून तळघराकडे जाण्यास पायऱ्या आहेत. तळघरात पाण्याचा एक हौद दिसून येतो याशिवाय या तळघरात गोसावी महाराजांची समाधी असल्याचे म्हटले जाते. मुख्य गर्भगृहात असलेल्या गणेशमूर्तीस जेव्हा अभिषेक केला जातो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी तळघरातील समाधीवर झिरपते. तळघरतील पाणी हे १२ महिने असून या पाण्याचा स्रोत नक्की कुठला याविषयी अधिक माहिती जाणून घेता असे समजते की कात्रजच्या तलावातून जे पाणी पुण्यात आणले गेले त्याच नळाची एक शाखा या मंदिरात आणली जाऊन समस्त परिसराची पाण्याची गरज पूर्वी या हौदातून भागविण्यात येत असे. या मंदिरात त्रिशुंड गणेशासहित विष्णू व लक्ष्मीच्या मूर्ती सुद्धा असल्याचे उल्लेख आढळतात. 

मुळातच स्थापत्य व शिल्पकलेचे उत्तम उदाहरण असलेल्या या मंदिराच्या मूळ इतिहासावर सखोल संशोधन होणे गरजेचे आहे व भविष्यात या मंदिराविषयीचा नूतन इतिहास समोर येईल अशी आशा आहे. तूर्तास या सर्वांगसुंदर मंदिरास भेट देऊन पुण्यातील या स्थापत्यवैभवाचा आस्वाद घ्यावा हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो.