पाटलीपुत्र अर्थात पटना - मौर्य वंशाची राजधानी

नंद व मौर्य या दोन सत्तांच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झालेले पाटलीपुत्र अथवा पटना प्राचीन काळी एक वैभवसंपन्न नगर होते.

पाटलीपुत्र अर्थात पटना - मौर्य वंशाची राजधानी
पाटलीपुत्र अर्थात पटना

प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध राजवंश म्हणजे मौर्य राजवंश. मौर्य राजवंश हा फक्त एक प्राचीन राजवंशच नव्हे तर एक प्रचंड विस्तार असलेले राज्य सुद्धा होते. या वंशाची स्थापना इसवी सन पूर्व ३२१ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने केली.

मौर्य राजवंशाची राजधानी म्हणून पाटलीपुत्र प्रख्यात आहे. पाटलीपुत्र म्हणजे सध्याच्या बिहार राज्याच्या राजधानीचे शहर पाटणा होय. हिंदी भाषिक या शहरास पटना म्हणून ओळखतात. मौर्य राजवंशाची स्थापना होण्यापूर्वी पटना अर्थात पाटलीपुत्र ही नंद राजवंशाची राजधानी होती मात्र नंद कुळातील राजा महापद्मनंद याची चंद्रगुप्तावर इतराजी होऊन चंद्रगुप्तास राज्य सोडून पंजाब प्रांताकडे जावे लागले मात्र लवकरच चंद्रगुप्ताने सैन्य तयार करून पंजाब प्रांत काबीज केला आणि तेथून त्याने थेट नंदराज्यावर चाल करून नंदांचा पराभव केला आणि मौर्य राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्त मौर्याने सुद्धा पाटलीपुत्रास आपल्या राजधानीचा दर्जा दिला.

नंद व मौर्य या दोन सत्तांच्या राजधानीचा दर्जा प्राप्त झालेले पाटलीपुत्र अथवा पटना प्राचीन काळी एक वैभवसंपन्न नगर होते. चंद्रगुप्ताचा समकालीन ग्रीक राजा याचा एक वकील चंद्रगुप्ताच्या दरबारात होता व त्याचे नाव मॅगॅस्थिनीज असे होते. मॅगॅस्थिनीज याने मौर्य काळातील पाटलीपुत्राचे जे वर्णन केले आहे ते वाचून आपल्याला प्राचीन संस्कृतीची ओळख होते.

मॅगॅस्थिनीज ने सांगितले आहे की पाटलीपुत्राची लांबी त्याकाळी नऊ मैल होती आणि संपूर्ण शहरास लाकडी तटबंदी करण्यात आली होती. तटास एकूण चौसष्ट वेशी असून पाचशे सत्तर बुरुज शहराच्या संरक्षणासाठी उभारण्यात आले होते. तटबंदीच्या चोहोबाजूस मोठा व खोल खंदक असून त्या खंदकात पाटण्याच्या सोन नदीचे पाणी येण्याची व्यव्यस्था करण्यात आली होती. 

राजधानीच्या मध्यभागी चंद्रगुप्ताचा भव्य राजवाडा होता आणि वाड्याच्या सभोवताली विस्तीर्ण उद्याने असून त्यात अनेक कारंजी आणि हौद निर्माण करण्यात आले होते. 

राजा ज्यावेळी नगरात फेरफटका मारण्यास निघत असे त्यावेळी तो सोन्याच्या पालखीतून जात असे. पाटलीपुत्रात त्यावेळी जनतेच्या मनोरंजनासाठी अनेक गोष्टी होत असत. हत्ती, गेंडा यांचे खेळ, घोड्यांच्या व बैलांच्या शर्यती, मल्लयुद्ध आदी गोष्टींची रेलचेल होती.

दिवसातून एकदा राजाचा दरबार भरीत असे व राजा स्वतः लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करीत असे. मॅगॅस्थिनीज याने पाटलीपुत्र अर्थात पटना शहराचे जे प्राचीन काळातील वर्णन केले आहे ते पाहून भारत हा प्राचीन काळात कितीतरी वैभवशाली व संपन्न असा देश होता याची जाणीव होते.