नाणेघाट विषयी ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जिवधन या किल्ल्याजवळच्या डोंगरातून जाणारा नाणेघाट (Naneghat) हा महाराष्ट्रातिल एक अतिशय प्राचीन मार्ग आहे. पुरातन काळापासून कोकण व देश यांना जोडणारा मार्ग म्हणुन नाणेघाटाची ख्याती होती.

नाणेघाट विषयी ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल
नाणेघाटातील लेणी (स्त्रोत - विकीपेडीया)

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

नाणेघाटाची निर्मिती सातवाहन काळात झाली. सध्याच्या ठाणे जिल्ह्यातील सोपारा ते कल्याण हा मार्ग पुढे मुरबाडवरुन या घाटातून जुन्नरकडे जात असे. नाणेघाटाचा पायथा कल्याणपासून सुमारे ४० मैल असून माथा जुन्नपासून २० मैल आहे.

नाणेघाटाची लांबी सुमारे ३ मैल आहे व घाटाची नळी सुमारे २५० फुट लांब व ८ फुट रुंद आहे. नाणेघाटाच्या पायथ्याला वैशाखरे, प्रधानपाडा व पुलू सोनाळे ही गावे आहेत.

पुलू सोनाळे या गावाजवळून कणिकेर नावाची नदी वाहते आणि याच परिसरात लेण्यांचा आणखी एक समुह आहे.

घाटाच्या माथ्यावर शिंगरु नावाचे एक पठार असून त्या माथ्यावर अनेक जुनी टाकी व खोदीव रांजण आहेत ज्यांना जकातीचे रांजण म्हटले जाते. शिंगरु पठारावरील एका टाक्यावर एक लेख आहे ज्यामध्ये कामवन येथील दामघोष याने टाके कोरल्याचा उल्लेख येतो.

येथील गणेशस्थळ या ठिकाणी सुद्धा खोदीव रांजण पहावयास मिळतात.  जवळच १५० फुट उंचीचा एक तुटलेला कडा आहे ज्यास नानाचा अंगठा म्हणतात.

नाणेघाटाच्या माथ्यावर उभे राहिल्यास कळसूबाई शिखरापासून भिमाशंकरपर्यंतच्या आसमंतातील सुंदर नजारा दृष्टीक्षेपात येतो. याशिवाय उत्तरेस हरिश्चंद्रगड, दक्षिणेस ढाक किल्ला, वायव्येस माहुली किल्ला, नैऋत्येस सिद्धगड व मलंगगड, पश्चिमेस उत्तर कोकण, पुर्वेस कुकडनेरचे पठार व जिवधन तसेच हडसर हे किल्ले दृष्टिपथात येतात.

ब्रिटीशकाळात या घाटास नानाघाट किंवा नानापास (nanapaas) असेही म्हणत असत. घाटास प्राचीन काळी महत्त्व असल्याने परिसरात अनेक सातवाहन काळातील लेण्या आहेत मात्र आता या लेण्याची पडझड झाली आहे. यातील एका लेण्याच्या विस्तीर्ण दालनात सातवाहनांचे देवकुल आहे व याच दालनात नागनिका या सातवाहन साम्राज्ञीचा शिलालेख आहे.

या शिवाय इतर सातवाहन कुलातील लोकांच्या प्रतिमा व नामोल्लेख सुद्धा आहेत. या सर्व प्रतिमा आता भग्न झाल्या असून फक्त पायाचे भाग शाबूत आहेत व नावांचे उल्लेख दिसून येतात.

नागनिकेचा लेख हा इस पुर्व २ र्‍या शतकातील असून त्या लेखातून सातवाहन या वंशाची अमुल्य माहिती मिळते. तर इतिहासाची व पर्यटनाची आवड असलेल्या भटक्यांसाठी हा नाणेघाट म्हणजे नंदनवनच आहे. तेव्हा आपण अजुनही येथे गेला नसाल तर नक्की जा व प्राचीन काळातील या घाटवाटेचा आनंद घ्या.