ब्रह्मकरमळी - गोव्यातील ब्रह्मदेवाचे देवस्थान

पणजीपासून अंदाजे ४५ कि.मी. अंतरावर वाळपई हे सत्तरी तालुक्याचे मुख्यालय आहे. तिथून फक्त ८ कि.मी. अंतरावर ब्रह्मकरमळी गावाजवळ वसले आहे ब्रह्मदेवाचे सुंदर मंदिर.

ब्रह्मकरमळी - गोव्यातील ब्रह्मदेवाचे देवस्थान
ब्रह्मकरमळी

विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधली उत्पत्ती म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे श्रेय ब्रह्मदेवाकडे जाते. त्यामुळेच या देवाला प्रजापती असेही म्हटले गेलेले आहे. भारतात ब्रह्मदेवाचे फक्त एकच मंदिर असून ते राजस्थानमधील पुष्कर इथे आहे अशी सर्वसामान्य मंडळींची समजूत आहे. परंतु ते काही खरे नाही. संख्येने अगदी कमी असली तरीही ब्रह्मदेवाची मंदिरे भारतात आढळून येतात. ब्रह्मदेवाच्या नुसत्या मूर्ती तर मंदिरांपेक्षा जास्त संख्येने दिसून येतात. ब्रह्मदेवाचे असेच एक सुंदर मंदिर निसर्गरम्य गोव्यात वसलेले आहे. गोव्यातल्या वाळपईजवळ नागरगाव इथे हे मंदिर वसलेले आहे. पणजीपासून अंदाजे ४५ कि.मी. अंतरावर वाळपई हे सत्तरी तालुक्याचे मुख्यालय आहे. तिथून फक्त ८ कि.मी. अंतरावर ब्रह्मकरमळी गावाजवळ वसले आहे ब्रह्मदेवाचे सुंदर मंदिर. झाडांच्या कमानीतून जाणारा वळणावळणाचा रस्ता आपल्याला या मंदिरापाशी आणून सोडतो. पूर्वी इथे लहानसे मंदिर होते मात्र आता त्याचा जीर्णोद्धार करून खास गोव्याच्या पद्धतीने प्रशस्त मंदिर बांधलेले आहे. मंदिराचा परिसर अतिशय शांत-निवांत असा आहे.

देवळाला एखादी सुंदर दंतकथा जोडलेली असली की त्याचे सौंदर्य अजून बहरते. इथेसुद्धा अशीच एक कथा सांगतात. सत्तरी वरून ही मूर्ती एका पोत्यात घालून एक ब्राह्मण घाटमार्गे बेळगाव आणि पुढे देशावर जाणार होता. तो वाटेत याठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला थांबला. त्याला स्वप्नात देवाचा दृष्टांत झाला की हे ठिकाण मला खूप आवडले असून आता मी इथेच राहणार. सकाळी उठल्यावर ब्राह्मण मूर्ती हलवू लागला तर मूर्ती जड होऊन अजिबात हालेना. ब्राह्मणाने गावात जाऊन गावकरी आणि सरदेसायांना ही गोष्ट सांगितली. गावाने मूर्ती इथेच ठेऊन घेतली आणि तिथे एक लहानसे मंदिर उभारले.

गाभाऱ्यात अंदाजे ५ फूट उंचीची ब्रह्मदेवाची देखणी मूर्ती एका पादपीठावर उभी आहे. काळ्या पाषाणातील ब्रह्मदेवाची ही मूर्ती म्हणजे कदंब मूर्तीकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. ह्या मूर्तीचा काळ अंदाजे इ.स.च्या १२व्या शतकातील सांगता येईल. चतुर्मुखी असलेल्या देवाच्या फक्त समोरच्या तोंडाला दाढी कोरलेली आहे. देवाच्या चार हातांपैकी उजव्या खालच्या हातात जपमाळ असून उजव्या वरच्या हातात स्रुक हे यज्ञात वापरले जाणारे आयुध आहे. डाव्या वरच्या हातात पुस्तक तर डाव्या खालच्या हातात कमंडलू धारण केलेला आहे. मूर्ती समभंग स्थितीत उभी असून अनेक अलंकारांनी मढवलेली आहे. देवाच्या मस्तकी जटामुकुट शोभून दिसतो. गळ्यात विविध माळा, छातीवर उरोबंध, खांद्यावर स्कंदपत्रे, दोन्ही दंडामध्ये वाकी, गळ्यात यज्ञोपवीत, कमरेला कटीवस्त्र, त्यावर मेखला, मनगटात कंकणे, पायात तोडे अशा विविध दागिन्यांनी मढलेली ही देवाची मूर्ती फारच प्रसन्न दिसते. मूर्तीच्या पायाशी गायत्री आणि सावित्री या देवता दिसतात. तर अगदी पायापाशी दोन भक्त नमस्कार मुद्रेत बसलेले आहेत. मूर्तीच्या बाजूने असलेल्या प्रभावळीत काही ऋषी-मुनी कोरलेले आहेत. अतिशय सुंदर, सुडौल आणि देखणी अशी ही मूर्ती आहे.

मुळात ही मूर्ती इथली नाही. ब्रह्मदेवाची ही मूर्ती आणि त्याचे मंदिर होते जुन्या गोव्यातल्या करमळी या गावात. पण त्या प्रांतावर पोर्तुगीजांचे आक्रमण झाले. सक्तीने आणि जुलूमजबरदस्तीने लोकांना बाटवले जाऊ लागले. त्यामुळे इ.स. १५४१ साली ब्रह्मदेवाच्या भक्तांनी ही मूर्ती इथून हलवली आणि इथे सत्तरी प्रांतात आणून वसवली. पुढे सन १७८१ च्या उत्तरार्धात सत्तरी तालुका पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आला. मग भाविकांनी मूर्ती आधी वाळपई गावात आणि तिथून नागरगावच्या घनदाट जंगलात नेली, आणि एका ओढ्याच्या काठावर असलेल्या एका छोट्या मंदिरात मूर्तीची स्थापना केली. ही छोटी वस्ती नंतर हा देव ब्रह्मदेव आणि त्याचे मूळ गाव करमाळी (तिसवाडी तालुक्यातील) यांच्या नावावरून ‘ब्रह्मकरमळी’ या नावाने ओळखली जाऊ लागली. मार्गशीर्ष वद्य तृतीया हा दिवस. या दिवशी ब्रह्मदेवाच्या या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ब्रह्मकरमळी या गावात करण्यात आली. हा दिवस ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून आता साजरा केला जातो. या दिवशी अनेक भक्त विशेषकरून ‘करमळकर’ या देवाच्या दर्शनाला येतात. उत्सवानिमित्त रात्री देवळातच गावातल्या कलाकारांकडून नाटक सादर केले जाते. पणजीपासून जेमतेम ५५ कि.मी. अंतरावर असलेले हे ब्रह्मदेवाचे ठिकाण गोव्याच्या भेटीत न चुकता बघितले पाहिजे.

- आशुतोष बापट