मल्लिकार्जुन मंदिर - घोटण

यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पैठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले मंदिर आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे. आशुतोष बापट

मल्लिकार्जुन मंदिर - घोटण

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

प्राचीन ऐतिहासिक अवशेष आणि धार्मिक स्थळांनी नटलेला नगर जिल्हा हा इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो. औरंगाबाद आणि बीड या मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या हातात हात मिसळून असलेल्या नगर जिल्ह्यावर बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याचा प्रभावसुद्धा जाणवतो.

नगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा तर प्राचीन पैठणला खेटूनच वसलेला आहे. सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष सापडतात. पुढे इ.स.च्या १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणाखुणा आजही या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. काही तग धरून आहेत तर काही मात्र पार ढासळलेल्या दिसतात.

अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पैठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले मंदिर आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.

घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारत जाते. कौरव आणि जरासंधानी विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना याठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला ‘मल्लिकार्जुन’. यादव कालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय इथे आहे. चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर मुख्य रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्राकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मुख्य मंदिर हे ६० फुट लांबी-रुंदीचे आहे. मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेले कळते. मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्ल-युद्ध तसेच काही मिथुन शिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे आधारासाठी ब्रॅकेटस असतात. त्यावर कधी दोन तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी यक्षाची मूर्ती कोरलेली असते. मल्लिकार्जुन मंदिरात १६ पैकी जे ४ खांब मधोमध आहेत त्यावर एका बाजूला तीन आणि इतर दोन बाजूंवर एकेक असे चक्क ५ यक्ष कोरलेले आहेत.

असेच अजून एक वेगळेपण इथे आहे. ते म्हणजे इथे असलेला गाभारा. साधारणतः शिवमंदिराचा गाभारा हा ३-४ फूट खोल असून त्यात शिवपिंडी असते. इथे चक्क १५ फूट खोल गाभारा असून तो दोन टप्प्यात विभागाला आहे. ५ पायऱ्या उतरून गेले की आपण एका टप्प्यावर येतो. इथे परत दोन बाजूला सपाट जागा असून एका बाजूला दरवाजा तर दुसरीकडे झरोका आहे. इथे पुन्हा ४ खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. इथून अजून १० पायऱ्या उतरून खाली गेले की मग शिवपिंड दिसते. शिवपिंडीच्या जवळच एक पाण्याचा झरा असून तिथे कायम पाणी असते. अशा शिवलिंगांना ‘पाताळलिंग’ असे म्हटले जाते. अंबरनाथ, त्रंबकेश्वर याठिकाणी असे सखलात असलेले शिवलिंग बघता येते. पहिल्या टप्प्यावर उजव्या बाजूला जे दार आहे ते बाहेरील बाजूनी द्वारशाखांनी नटवलेले आहे. कदाचित इथे गाभारा आणि त्यात मूर्ती असेल का?

मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूंना पाठीवर मुंगुसाची पिशवी घेतलेल्या कुबेराच्या सुरेख मूर्ती असून दरवाजा हा देखण्या अशा द्वारशाखांनी सजवलेला आहे. इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाज्याच्या डोक्यावर मधोमध असलेले ललाटबिंब. इथे शक्यतो गणपती, अथवा शंकराची प्रतिमा बघायला मिळते. पण घोटणच्या या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची आलीढासनातील मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूंनी विद्याधर आपल्या हातात पुष्पमाला घेऊन शिवाला वंदन करताना शिल्पित केलेले आहेत. कीरातार्जुन प्रसंग आणि त्रिपुरासुराचा वध अशा दोन प्रसंगीच शिवाच्या हातात धनुष्य दिसते. इतके आगळे वेगळे ललाटबिंब अन्यत्र कुठे दिसत नाही. धनुष्यधारी शिव, आणि खांबांवर असलेली युद्धाचे प्रसंग असलेली शिल्पे यावरून हे कुठले शक्तीस्थळ असावे का या शंकेला वाव आहे. सभागृहात एक गद्धेगाळ आणि त्यावर देवनागरी लिपीत लिहिलेला काहीसा झिजलेला शिलालेख दिसतो.

याच गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू-सुनेची बारव आणि प्राचीन जटाशंकर मंदिर बघता येतात. पैठणपासून जेमतेम १५ कि.मी. वर असणारे हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून जावे, आणि आगळेवेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे असे आहे.

- आशुतोष बापट