कंबोडियातला गणपती - प्रेह विहार (शिखरेश्वर)

शिखरेश्वर किंवा प्रेह विहार हे कंबोडियामधले सर्वार्थाने वेगळे मंदिर आहे. म्हणजे याचे स्थापत्य खास ख्मेर स्थापत्यच आहे, परंतु हे वसलेले आहे एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आणि आणि त्या मंदिरातला देवही कंबोडियामध्ये न दिसणारा.. गणपती बाप्पा !! सीएम रीप पासून जवळजवळ १४० कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण.

कंबोडियातला गणपती - प्रेह विहार (शिखरेश्वर)
प्रेह विहार (शिखरेश्वर)

जमिनीच्या मालकीवरून, हद्दीवरून होणारी भांडणे जगात सर्वत्र पाहायला मिळतात. अगदी शेताच्या तुकड्याच्या हद्दीपासून ते दोन देशांच्या सीमेवरील प्रदेशापर्यंत असलेली ही जमिनीच्या मालकीवरून होणारी भांडणे. कंबोडिया आणि थायलंड या एकमेकांना लागून असलेल्या देशांच्या बाबतीत असेच झाले. ही जमीन, हा डोंगर आणि त्या डोंगरावर असलेले मंदिर हे कंबोडीयाचे का थायलंडचे याचा वाद अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला. जवळजवळ ३० वर्षे हे भांडण सुरु होते आणि शेवट न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला आणि ती वास्तू, ती जागा ही कंबोडियाच्या ताब्यात आली. ती वास्तू म्हणजेच हे शिखरेश्वर किंवा प्रेह विहार इथले मंदिर. एका उंच डोंगरावर हे मंदिर बांधलेले आहे. इथपर्यंत जाणे हा सुद्धा एक रोमहर्षक अनुभव असतो. सीएम रीपच्या ईशान्येला १४० कि.मी. अंतरावर, थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या डांगरेक डोंगररांगांमध्ये वसले आहे हे प्राचीन देवालय. जुलै २००८ मध्ये या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला. जवळजवळ ३०० वर्षे या मंदिराचे बांधकाम सुरु असल्यामुळे इथे ख्मेर स्थापत्यशैलीच्या विविध अंगांचे दर्शन होते.

इ.स.च्या ९व्या शतकात कंबोडियाचा सम्राट यशोवर्मन याने हे शिवमंदिर बांधायला सुरुवात केली. शिखरावर वसती करणारा देव तो शिखरेश्वर असे सरळ सोपे नाव. राखाडी आणि पिवळ्या रंगाच्या वाळूकाश्मात (सँडस्टोन) या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. त्याचसोबत लाकडी फळ्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला गेला. या मंदिराचे बरेचसे बांधकाम सूर्यवर्मा पहिला (१००६-१०५०) आणि सूर्यवर्मा दुसरा (१११३-११५०) याच्या काळात झालेले आहे. या मंदिरात मिळालेल्या शिलालेखावरून अजून काही महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश पडतो. हे शिलालेख संस्कृत भाषा आणि ख्मेर लिपीमध्ये कोरलेले आहेत. या शिलालेखानुसार राजा सूर्यवर्मा दुसरा याने या मंदिरात धार्मिक विधी पार पडले, मोठा उत्सव केला आणि त्याप्रित्यर्थ विविध दाने दिल्याचे उल्लेख दिलेले आहेत. राजाने आपला ब्राह्मण गुरु दिवाकरपंडिताला या निमीतने छत्र, सुवर्णपात्र तसेच हत्ती दान म्हणून दिल्याचे उल्लेख या शिलालेखात करण्यात आले आहेत. दिवाकर पंडिताने या मंदिर उभारणीत विशेष लक्ष घातले होते आणि मंदिर पूर्ण झाल्यावर एक सोन्याची नटराजाची मूर्ती या मंदिराला दान केली होती. हा दिवाकर पंडित, उदयादित्यवर्मन-२, हर्षवर्मन-३, जयवर्मा-४, धरणींद्रवर्मा-१ आणि सूर्यवर्मा-२ अशा ५ ख्मेर सम्राटांचा राजगुरू होता. सूर्यवर्माच्या सांगण्यावरून या राजगुरूने विविध मंदिरांना भेटी दिल्या, काहींचा जीर्णोद्धार केला. त्याचप्रमाणे त्याने शिखरेश्वर मंदिराला मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिलेल्या आहेत. तसेच प्रत्येक गोपूर दरवर्षी सजवले गेले पाहिजे असा आदेशच काढला. मौल्यवान धातूच्या पत्र्याने त्याने मुख्य मंदिर मढवून घेतले.

सीएम रिपपासून या डोंगराच्या पायथ्याशी आल्यावर एक पर्यटक केंद्र आहे. इथे आपली वाहने ठेवावी लागतात. या पर्यटक केंद्रापासून ४ बाय ४ ड्राईव्हने युक्त, ६ आसनी जीपसारखे वाहन घेऊनच डोंगरावर जावे लागते. त्याचे कारण एकतर हे मंदिर थायलंड सीमेवर आहे आणि या डोंगरावर जाण्याचा रस्ता इतका तीव्र चढाचा आहे की त्यावर साधी वाहने चढूच शकत नाहीत. या केंद्रापासून अर्धा तासास तीव्र डोंगर चढून गेल्यावर आपण एका छोट्याश्या वस्तीपाशी येतो. इथे रस्ता संपतो आणि आलेल्या जीप पार्क करून ठेवतात. इथे आपण थायलंड सीमेच्या शेजारीच आल्यामुळे इथे आसपास कंबोडियाचे सैनिक तैनात आहेत. समोरच आपल्याला डोंगरवर थायलंड सैन्याची चौकी आणि थायलंडचा झेंडा लावलेला दिसतो. इथून रस्ता उजवीकडे वळतो आणि आपण एका प्रचंड लांबच लांब दगडी मार्गावरून पुढे चढून जावे लागते. मंदिराला एकूण ५ गोपुरे आहेत. ती टप्प्याटप्प्याने सामोरी येटात. गोपुरांच्या दरवाज्याच्यावर, घोड्यावर बसलेली दंपती तसेच गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्णाची शिल्पे आहेत.

गोपुरे पार करत करत आपण उंचावर एका मोठ्या वास्तूत येऊन पोचतो. इथे मोठ्या दगडी दरवाज्यातून आत गेल्यावर समोर उंच चौथऱ्यावर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा प्राकार चारही बाजूंनी ओवऱ्या बांधून बंदिस्त केलेला आहे. या सगळ्या परिसरात कंबोडियाचे सैनिक सुरक्षेसाठी तैनात आहेत. या ओवऱ्या आतून एकसलग आहेत. म्हणजे जणू एक लांबच्या लांब मार्गिका असून तिला एका बाजूने अखंड भिंत तर दुसऱ्या बाजूने एकाला एक लागून खिडक्या केलेल्या आहेत.

मुख्य मंदिरात चढून जायला काही पायऱ्या आहेत आणि आतमध्ये आपल्याला गणपती बाप्पा विराजमान झालेले दिसतात. आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसतो. काळ्या पाषाणातली गणपतीची मूर्ती पाहून फार छान वाटते. इतके वर चढून आल्याचे समाधान लाभते. कंबोडियन टोपी सारखा मुकुट असलेली गणपतीची मूर्ती अंदाजे दीड फूट उंचीची आहे. एका हातात बहुधा सुळा आणि दुसऱ्या हातात भांडं असून त्यावर सोंड टेकवलेली आहे. गणपतीचे कान त्याच्या खांद्याच्याही खालीपर्यंत आलेले आहेत.

आल्या पावली बाहेर जाऊन त्या मंदिराला पूर्ण वळसा घालून मागच्या बाजूला डोंगराच्या कडेला जाता येते. हा भाग पण फार सुरेख आहे. इथून खाली आपण जिथून आलो ते पर्यटक केंद्र, त्याच्या दारात लावलेल्या बसेस आणि गाड्या, त्याच्या बाजूला असलेला पाण्याचा मोठा तलाव, आणि लांबवर सीएम रीपकडे जाणारा रस्ता दिसतो. बाजूला कुलेन डोंगर रांग आणि दुसऱ्या बाजूला थायलंड देशाच्या सैन्याच्या चौक्या असा अत्यंत देखणा नजारा इथून पाहायला मिळतो. या मंदिराबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे. ते नंतर केव्हातरी. इतक्या उंचावर देखणे मंदिर आणि त्यात असलेला बाप्पा, आणि आजूबाजूचा आसमंत बघून इथे आल्याचे सार्थक होते.

- आशुतोष बापट