बिग टेंपल बृहदीश्वर
तंजावर इथलं बृहदीश्वर मंदिर म्हणजे भारतीय मंदिर स्थापत्याचा मेरुमणी समजायला हवा. हे मंदिर भव्य दिव्य तर आहेच पण त्यासोबत अतिशय देखणं आहे. सुंदर आहे. सुघड आहे. डोळे दिपवणारं आहे. सामर्थ्यशाली चोल सम्राट राजराजा चोल याने १०१० साली हे शिवालय उभारले.
चोल, पांड्य, विजयनगर, नायक आणि मराठे अशा विविध राजांचे शिलालेख या मंदिरावर कोरलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी दान दिलंय त्यांचे त्यांचे शिलालेख इथे दिसतात. मंदिराच्या बाह्यांगावर सर्वत्र हे शिलालेख दिसून येतात. या मंदिराचे शिखर तरी किती उंच....तर जवळजवळ २२५ फूट आणि त्यावर बसवली आहे ८० टन वजनाची स्तुपी. ती तिथपर्यंत कशी नेली.. कशी घडवली हे एक आश्चर्य असले, अद्भुत असले तरीही त्यामागे शास्त्र आहेच. विनाकारण, नुसते चमत्कार करून कुठलीही भारतीय कलाकृती निर्माण झालेली नाही.
प्रचंड भव्य गोपुरे, त्यावर असणारी नेत्रदीपक शिल्पकला, या गोपुराचे नाव ‘राजराजन तिरुवासल’, मंदिराच्या बाह्यांगावर अप्रतिम मूर्तिकाम, मोठमोठ्या मूर्ती, उंच जोती, दणकट बांधकाम, प्रचंड मोठा प्राकार, बाजूने ओवऱ्या, त्यातसुद्धा चित्रकला आणि शिलालेख अशी सगळी अगदी उतू उतू जाणारी समृद्धी बघायला बृहदीश्वरला यायलाच हवं. वास्तुकलेचे, इतिहासाचे, साहित्याचे अभ्यासक यांच्यासाठी ही पंढरी आहे. आणि सर्वसामान्य मंडळींसाठी हा एक नेत्रदीपक खजिना आहे. जो प्रत्येकाने पाहायलाच हवा. इथे या मंदिराला बिग टेंपल असेच संबोधले जाते.
अजून एक बृहदीश्वर मंदिर गंगैकोंडचोलपुरमला आहे जे नंतरच्या चोल राजाने बांधलेले. तंजावरचे मंदिर हे थोरल्या चोल राजांनी बांधलेले मोठे मंदिर म्हणूनच ‘बिग टेंपल’. मराठी लोकांच्या दृष्टीने या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवरायांच्या वंशाची एक पाती तंजावर इथे स्थिरावलेली आहे. त्या भोसले मंडळींचा शिलालेखसुद्धा या मंदिरावर आहे. भोसले राजांनी या मंदिराची काही प्रमाणात डागडुजी केलेली, काही नवीन बांधकामे केलेली या शिलालेखांत नमूद केलेली आहेत.
तंजावर आणि भोसले यांचे एक अतूट नाते. सरफोजीराजे भोसले यांनी उभारलेली सरस्वती संग्रहालय आणि तिथे असणाऱ्या मूर्ती, चित्रे, आणि हजारो हस्तलिखिते थक्क करणारे आहे. कलासक्त राजा मग तो कुठल्याही शतकातला असला की कसा इतिहास निर्माण करतो याची प्रचिती बृहदीश्वर मंदिर आणि सरस्वती संग्रहालय पाहून येते. शांत निवांत तंजावर गाव आणि तिथे वसलेला हा सांस्कृतिक ठेवा केवळ अनमोल आहे.
- आशुतोष बापट