छंदोगामात्य कवी कलश

छत्रपती संभाजी महाराजांच्या एकनिष्ठांपैकी एक म्हणजे छंदोगामात्य कवी कलश. कवी कलश हे असे व्यक्तिमत्व आहे ज्याच्या विषयी इतिहासाने दोन टोकांची भूमिका घेतली आहे.

छंदोगामात्य कवी कलश
कवी कलश

अनेक जुन्या बखरी व आधुनिक नाटकांनी तर औरंगजेबास बाजूला ठेवून कवी कलशास संभाजी महाराजांच्या चरित्रातील मुख्य खलनायकाचे बिरुद दिले आहे.

इतिहास हा तटस्थपणे अभ्यासाचा विषय आहे. माणसाच्या हातून काही चुका घडल्या म्हणजे तो माणूसच चुकीचा होता असे ठरवून टाकणे म्हणजे इतिहासाशी केलेली प्रतारणाचं. सध्या अशा पद्धतीचे मनात अढी ठेवून केलेलं लिखाण नेहमीच दृष्टीस पडत असत. मात्र ऐतिहासिक चरित्राचा तटस्थ अभ्यास केला तर कवी कलश त्यामध्ये कुठल्या बाजूस बसतात याचा अंदाज सहज येऊ शकतो.

सर्वप्रथम आपण संभाजी महाराज व कवी कलश यांची पहिली भेट केव्हा झाली हे समजून घेऊ.

खाफीखान या इतिहासकाराने लिहिले आहे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून संभाजी महाराजांसहित आले त्यावेळी त्यांनी संभाजी महाराजांना बनारस येथे सुरक्षित ठेवले यावेळी जी विश्वासू माणसे तेथे होती त्यापैकी एक म्हणजे कवी कलश. खाफीखानाची माहिती खरी मानली तर संभाजी महाराज व कवी कलशांची ओळख १६६६ पासून होती असे ग्राह्य धरता येईल. 

मंदिराचा कळस (कलश) जसा उच्चस्थानी असतो तसा कवींमध्ये उच्चस्थानी असा अर्थ देखील कवी कलश या नावामागे असू शकतो. कवी कलश हे कवी असल्याने त्यांचा कवीजी अथवा कबीजी असा उल्लेखही होत असे मात्र कालांतराने कबीजी च्या जागी कबजी असा उल्लेख उत्तरकालीन साधनांत केला गेला.

जर ही ओळख एवढी जुनी असेल तर कवी कलशाचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत फारसा सापडत नाही मात्र संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत उदयास येऊन एवढ्या मोठ्या पदास जाणे हे काही अचानक घडणे शक्य नव्हते यामुळेच संभाजी महाराज व कवी कलश हे एकमेकांस फार पूर्वीपासून ओळखत होते या शंकेस दुजोरा मिळतो.

कदाचित सुरुवातीस कवी कलश हे कारभारात तेवढे सक्रिय नसावेत मात्र संभाजी महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यावर त्यांना विश्वासू माणसे सोबत असणे गरजेचे वाटले असावे म्हणून त्यांनी कवी कलशांना मोठी जबाबदारी दिली असावी.

अजितोदय नावाच्या संस्कृत ग्रंथात कवी कलश १६८१ च्या दरम्यान स्वराज्यात आल्याचा उल्लेख आहे. कदाचित काशी बनारस येथे छत्रपतींचे कुलोपाध्याय म्हणून ते कार्य करीत असतील आणि १६८१ साली त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला असेल अशीही शक्यता आहे.

कवी कलश यांना छंदोगामात्य ही पदवी मिळाली होती तिचा अर्थ म्हणजे सामवेदध्यायी अर्थात सामवेदात परिपूर्ण असा प्रधान. सामवेद हा एकमेव वेद आहे जो संगीतमय असून त्याचे मंत्र छंदांच्या स्वरूपात गायले जाऊ शकतात.

संभाजी महाराजांवर विषप्रयोग झाला तेव्हा हा कट कवी कलश यांनी उघडकीस आणला तेव्हा संभाजी महाराजांनी कटात सामील असलेल्या अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी यांना परळी येथे कैद करून हत्तीच्या पायाखाली देऊन शासन केले असा उल्लेख जेधे शकावलीत आहे.

कवी कलश यांनी इतर जबाबदाऱ्यांसोबत युद्धात आघाडीवर जाण्याच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या होत्या. १६८५ साली मुघल सरदार शहाबादी खान पुण्याहून बोरघाट उतरून आपल्या सैन्यासह थेट रायगडच्या आसमंतातील गांगोलीस आला  यावेळी रायगडाहून कवी कलश खासे गांगोलीस गेले यावेळी घनघोर युद्ध झाले आणि या युद्धात कवी कलशांनी मावळ्यांच्या साथीने शर्थ करून शाबादी खानास परत पुण्यास पिटाळून लावले या प्रसंगाचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.

शाबदीखान पुण्याहून दौड करून बोरघाटाने उतरून गांगोलीस आला. तेथे कवी कलशाने जाऊन भांडण दिले. फिरोन घाटावरी घातला.

कवी कलश यांच्या विषयी बादशाह औरंगजेब याचा पुत्र अकबर याने छत्रपती संभाजी महाराजांना जे पत्र लिहिले होते त्यात तो म्हणतो,

"छत्रपती संभाजी राजे यांस विदित व्हावे. मोगल घाटाखाली उतरून आले. त्यावेळी कविकलश यांनी ठाण मांडून झुंज दिली हे महमूदखान व खिदमत परस्तखान यांच्या लिहिण्यावरून कळले. कविकलश हा आपला उत्कृष्ट एकनिष्ठ सेवक आहे. कुणाच्या मत्सराने त्याचा नाश होईल असे परमेश्वर न करो. कवी कलशावर आपली कृपा राहावी आणि आपण त्याचे कल्याण करावे हे योग्य होय."

शिर्क्यांचे प्रकरण झाल्यावर संभाजी महाराज व कवी कलश रायगडावर येण्यास निघाले मात्र सुरुवातीस ते पन्हाळ्यास गेले येथून रायगडावर जाणे थोडे जिकिरीचे होते कारण मोगलांचे सैन्य कोल्हापूर येथे येऊन पोहोचले होते. गोवळकोंडा येथील कुतुबशाही नष्ट केल्यावर औरंगाजेबाने मुकर्रब खान याची निवड कोल्हापूर प्रांतावर केली होती. त्यामुळे महाराजांनी पन्हाळ्याहून थेट रायगड येथे जुन्या मार्गाने न जाता संगमेश्वर, चिपळूण, खेड करत रायगडला जाण्याचा निश्चय केला.

येथून ते प्रथम संगमेश्वर येथे आले. येथील देसायांना ते संगमेश्वरास आहेत हे माहित झाल्याने ते महाराजांना भेटायला गेले व आपले गाऱ्हाणे सांगितले यावर महाराजांनी शिर्के यांच्या ताब्यातील मोकासा काढून तो सरकारात जमा केला. 

संगमेश्वर येथे महाराजांसोबत चार ते पाच हजार भालाईत होते असा उल्लेख आहे. मुकर्रब खान हा तेथे आल्यावर मोठी लढाई झाली. यावेळी एक बाण कवी कलशांना लागला. कवी कलशाने महाराजांना तेथून निसटून जाण्याची विनंती केली आपल्या लोकांना मुघलांच्या तावडीत निघून जाणे पटले नाही. दुर्दैवाने संभाजी महाराजांसहित कवी कलश आणि इतर सेनानी मुघलांच्या हाती लागले.

अटकेत असताना संभाजी महाराजांना कवी कलशासहित औरंजेबासमोर हजर करण्यात आल्यावर औरंगजेब आसनावरून खाली उतरला आणि प्रार्थना केली त्यावेळी कवी कलाशानी शीघ्रतापूर्वक एक काव्य म्हटले ज्याचा अर्थ होतो 

हे राजन, तुला पाहून ताजीम देण्यासाठी आलमगीर बादशहा सुद्धा आपल्या आसनावरून खाली आला आहे.

यावरून पुढील कठीण प्रसंगाची जाणीव असूनही संभाजी महाराजांसोबत कवी कलशाने जो धीरोदात्तपणा दाखवला तो खरंच कौतुकास्पद आहे. पुढे इतिहासातील दुर्दैवी घटना घडली संभाजी महाराज व कवी कलश यांची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. संभाजी महाराजांसोबत आग्रा येथील प्रसंगी साथसोबत करणारे कवी कलश याही प्रसंगी संभाजी महाराजांसोबतच मरणास साहसाने सामोरे गेले.