कोकणातील जलमंदिर - मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे
निसर्गरम्य कोकणात अनेक सुंदर ठिकाणे आडनिड्या जागी वसलेली आहेत. आधीच कोकणातले रस्ते वळणावळणाचे. त्यातही काहीसे आडवळण घेऊन गेले की खूप काही सुंदर, आश्चर्यकारक बघायला मिळते. बुरुंबाड जवळ असलेले शिरंबे हे असेच एक ठिकाण. बुरुंबाड हे तिथे असलेल्या आमनायेश्वराच्या मंदिरामुळे माहिती तरी असते. त्याबद्दल नंतर कधीतरी....
तर त्याच बुरुंबाडच्या जवळ अगदी आड रानात वसले आहे शिरंबे. आणि तिथे वसले मल्लिकार्जुनाचे आगळेवेगळे जलमंदिर. मंदिराच्या चारही बाजूंनी खंदक असून त्यात पाणी असते. मंदिरात जाण्यासाठी एका बाजूने छोटासा पूल बांधलेला आहे. मंदिराचा गाभारा हा अर्थातच जमिनीपासून काहीसा खोलात असून त्या गाभाऱ्यात कायम पाणी भरलेले असते. छोटासा गाभारा..त्यासमोर देखणा सभामंडप..शांत परिसर..पक्ष्यांचा आवाज..गर्द झाडी असलेले हे ठिकाण.
एखाद्या ठिकाणाला जर लोककथेची जोड मिळाली तर त्याचे सौंदर्य अजून खुलून येते. इथे तसेच आहे. कोणे एके काळी या गावातला एक शेतकरी शेतात नाचणीची मळणी करत होता. कितीही मळणी झाली तरी नाचणी संपेना. नाचणीचे पीक त्यामुळे कितीतरी जास्त पतीने मिळाले. ज्या दगडावर तो नाचणी आपटत होता त्यावर त्याने हातातले छोटे माप आपटले. त्या आघाताने तो दगड फुटला आणि त्याचे तीन तुकडे झाले. त्या दगडात त्याला देवत्वाची लक्षणे दिसली. या पाषाणाला 'नाचणदेव' असे नाव मिळाले. त्या तीन तुकड्यातील एक तुकडा शिरंबे गावात नेऊन गावकऱ्यांनी त्याची स्थापना मल्लिकार्जुन म्हणून केली.
शांत निवांत परिसर असलेले शिरंबे निसर्गाच्या कुशीत वसले आहे. माणसाचा खूप कमी वावर असलेले हे ठिकाण तसेच राहावे हीच त्या नाचणदेवापाशी प्रार्थना !!!
- आशुतोष बापट