चांदबीबी - एक शूर वीरांगना

चांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास सर्व बाबतींत उत्तम साथ दिली, राज्यासंबंधी कुठलाही प्रश्न असेल तर अली आदिलशाह प्रथम चांदबिबीचा सल्ला घेत असे.

चांदबीबी - एक शूर वीरांगना
चांदबीबी

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने प्रसिद्ध झालेली एक शूर महिला म्हणजे चांदबीबी. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात चांदबिबीने स्त्री असूनही पुरुषार्थ गाजवून आपले नाव इतिहासात अजरामर केले. अशा या महाराष्ट्रात जन्मलेल्या शूर विरांगनेविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.

चांदबीबी ही अहमदनगरच्या निजामशाहीतील बादशाह हुसेन निजामशाह याची कन्या. इसवी सन १५४७ साली चांदबिबीचा जन्म अहमदनगर येथे झाला. त्याकाळात दक्षिण भारतातील सर्व हिंदू राज्ये पूर्वीच लोप पावली असताना फक्त विजयानगरचे साम्राज्य हेच एकमेव हिंदू राज्य दक्षिणेत उरले होते. याशिवाय बहामनी या दक्षिणेतील मुस्लिम साम्राज्याची पाच शकले होऊन निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बेरीदशाही ही पाच राज्ये दक्षिण भारतात विविध ठिकाणी राज्य करीत होती.

हा काळ विजयनगर साम्राज्याच्या दक्षिणेतील पाच शाह्यांशी अस्तित्वाच्या लढाईचा काळ होता. विजयानगरच्या विरोधात त्याकाळी काही काळापुरता पाच शाह्यांनी एकमेकांसोबत युती केली होती व याच युतीच्या अंतर्गत चांदबिबीचा विवाह अली आदिलशाह याच्यासोबत झाला.

या विवाहनिमित्त हुंडा म्हणून चांदबिबीचे वडील हुसेन निजामशहाने जावई अली आदिलशाह यास सोलापूरचा अत्यंत महत्वाचा किल्ला दिला व या किल्ल्याचा पुढे अली आदिलशहास खूप उपयोग झाला. चांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली अदिलशाहास सर्व बाबतींत उत्तम साथ दिली, राज्यासंबंधी कुठलाही प्रश्न असेल तर अली आदिलशाह प्रथम चांदबिबीचा सल्ला घेत असे. ज्यावेळी अली आदिलशाह राज्याची व सैन्याची पाहणी करण्यास बाहेर निघे त्यावेळी तो चांदबिबीला सोबत घेऊन जाई व इतकेच नव्हे तर मोहिमेवर जातानाही चांदबीबी अली आदिलशाह सहित राहून त्यास मदत करत असे.

अशा प्रकारे सर्व काही सुरळीत सुरु असताना १५८० साली एका सेवकाने घातपात करून अली आदिलशहाचा खून केला. अली आदिलशाह व चांदबिबीस पुत्र नसल्याने राज्याची जबाबदारी चांदबिबीने अली आदिलशहाचा पुतण्या इब्राहिम आदिलशाह याच्याकडे दिली. इब्राहिम आदिलशाह लहान असल्याने त्यास गादीवर बसवून चांदबिबीच राज्यकारभार पाहू लागली. राज्यकारभार करीत असताना तिने माणसांची पारख करून त्यांना योग्य जबाबदाऱ्या दिल्या, इब्राहिम आदिलशाहाचे शिक्षण आणि राज्यातील सुधारणा आणि संरक्षण याकडे तिने कटाक्षाने लक्ष दिले.

राज्यकारभार करीत असताना तिने विविध लोकांना जी पदे बहाल केली होती त्यापैकी एक हुशार उमराव कामिल्खान हा आदिलशाही राज्यात मुख्य मंत्री म्हणून कार्य पाहत होता मात्र दिवसेंदिवस चांदबिबीची वाढती लोकप्रियता पाहून त्यास मत्सर निर्माण झाला व ही गोष्ट चांदबीबीस समजल्यावर तिने कामिल्खानाची पदावरून हकालपट्टी केली आणि किश्वरखान नामक इसमाकडे हे पद सोपवले. 

किश्वरखान हा तरी आपल्याशी व राज्याशी एकनिष्ठ असेल असा चांदबिबीचा समज होता मात्र दुर्दैवाने तो खोटा ठरून किश्वरखानाने आदिलशाही राज्यातील काही सरदार फोडून राज्य स्वतःकडे घेण्याचा डाव रचला आणि सरदारांचा एक मोठा गट स्थापन करून चांदबिबीस पदत्याग करून विजापूर सोडून जाण्यास सांगितले.

चांदबिबीने या राजद्रोहास विरोध केल्यावर बंडखोर सरदारांनी तिला अटक करून गुलाम सेविकांच्या आधारे राजवाड्याबाहेर काढले व पालखीत बसवून विजापूरहून साताऱ्यास नेले व तेथील किल्ल्यात कैदेत ठेवले. कालांतराने किश्वरखानाचा स्वार्थ सर्वांना लक्षात येऊन त्याच्यासोबत फुटलेल्या सरदारांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊन त्यांनी चांदबिबीस कैदेतून मुक्त केले व किश्वरखानविरोधात सर्व एकत्र झाले. 

आपला कट फासलेला पाहून किश्वरखान विजरपूरमधून फरार होऊन गोवळकोंड्यास आश्रयास गेला मात्र चांदबिबीच्या सैन्याने त्याचा पाठलाग करून त्यास गाठले व मारून टाकले. 

कैदेतून सुटका होऊन पुन्हा विजापूरचा कारभार हाती घेतल्यावर तिने इखलासखान नावाच्या हबशी सरदाराकडे मुख्य प्रधान पदाची जबाबदारी दिली मात्र इथेही चांदबिबीविरोधात पुन्हा एकदा फितुरीचे कारस्थान झाले. इतर प्रांतातील जनतेला चांदबीबी जास्त सवलती देते याचा राग येऊन त्याने एक कट उभारला आणि चांदबिबीचे दोन समर्थक अफजलखान शिराझी आणि एक ब्राह्मण प्रधान रासू पंडित यांचे खून पाडले. ही घटना समजल्यावर चांदबिबीने ऐनुल मुल्क या सरदारास सांगून इखलासखानास अटक करवले. काही वर्षांनी इखलास खानाची सुटका झाल्यावर त्याने आपली चूक सुधारून गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीविरोधात खूप मोठे पराक्रम गाजवले.

चांदबिबीचे माहेर निजामशाही व सासर आदिलशाही असल्याने या दोन्ही राज्याबद्दल तिला आपुलकी होती व ही दोन्ही राज्ये एक राहून सुवव्यस्था राहावी यासाठी चांदबीबी अथक प्रयत्न करत होती मात्र दोन्ही राज्यांत दक्षिणी व हबशी (सिद्दी) असे दोन गट पडले होते व या गटांमधील वाद उत्तरोत्तर एवढे वाढले की याची परिणीती अहमदनगरचा बादशाह इब्राहिम निजामशाह याचा खून होण्यात झाली. 

इब्राहिम निजामशाहचा खून झाल्यावर निजामशाही राज्यातील मिआन मंझू नावाच्या सरदाराने चांदबिबीची परवानगी न घेताच अहमदशाह नावाच्या राजपुत्रास निजामशाही राज्यावर बसवले. या सर्व घटनांमुळे दुःखी झालेली चांदबीबी विजापुरास निघाली. विजापुरास जाऊन चांदबीबी कदाचित आपल्यावर हल्ला करून आपला बिमोड करेल या भीतीने मिआन मंझूने गुजरातच्या मुरादची मदत मागितली मात्र मुराद वेगळाच बेत तयार करून थेट निजामशाही राज्यावर आपले सैन्य घेऊन चालून आला. फसल्याची पुरती जाणीव झालयावर मिआन मंझूने चांदबिबीसमोर शरणागती पत्करली आणि अहमदनगरच्या निजामशाहीचा बचाव करण्याची विनंती केली.

या वेळी चांदबीबी पन्नाशीच्या वर होती होती व वयोमानामुळे तिची प्रकृती खालावलेली असूनही तिने मंझूच्या विनंतीनुसार आपले सैन्य तयार केले आणि निजामशाहीच्या रक्षणासाठी अहमदनगरकडे धावली. अहमदनगर येथे पोहोचून तिने मुराद आणि त्याचा मुख्य सेनापती खान ई खान या दोघांनाही अनेक महिने रोकुन धरले त्यामुळे नाईलाजास्तव दोघांनाही अहमदनगरचा वेढा उठवणे भाग पडले. वेढा उठवता उठवता मुरादच्या सैन्याने अचानक हल्ला करून अहमदनगरच्या किल्ल्याच्या तटास एक मोठे भगदाड पाडले व ही गोष्ट कळताच चांदबिबीने आपले सैन्य सोबत घेतले आणि तलवार घेऊन ती सैन्यासहित त्या स्थळी गेली आणि रातोरात तटाची उध्वस्त भिंत पुन्हा बांधून घेतली.

मुराद चांदबिबीचे शौर्य पाहून खुश झाला आणि त्याने चांदबीबीस 'चांद सुलतान' हा किताब देऊन तिचा गौरव केला आणि अहमदनगर सोडण्यासाठी चांदबिबीने त्यास वऱ्हाड प्रांत इनाम म्हणून दिला.

एवढे होऊनही अंतर्गत यादवी चा जो शाप दक्षिणेतील शाह्यांना लागला होता तो कमी होण्याचे नाव घेत नव्हता. या यादवीचा फायदा उचलून दक्षिणेवर मोगल साम्राज्याचा अमल कायम करण्यासाठी मोगल बादशाह अकबर याने आपला पुत्र डॅनियल यास खान ई खान यांच्यासहित प्रचंड सैन्य देऊन अहमदनगर जिंकण्यास पाठवले. 

त्याकाळी मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य मानले जात होते व त्यांच्यापुढे निश्चितच आपला निभाव लागणे कठीण आहे याची पुरेपूर कल्पना चांदबिबीस होती मात्र सुरुवातीस तिने मोगलांविरोधात लढण्याचा प्रयत्न करून पहिला मात्र बलाढ्य मोगल सेनेसमोर निजामशाहीचे सैन्य अपुरे पडू लागल्याने मोगल साम्राज्यासोबत तह करणे हाच एक उपाय समजून तिने डॅनियल सोबत तहाची बोलणी सुरु करण्याची तयारी सुरु केली. तह करण्यापूर्वी हा विचार तिने जितखान नामक सरदाराजवळ बोलून दाखवला मात्र जितखानास हा सल्ला आवडला नाही आणि त्याने काही सरदारांना चांदबीबी राज्याशी द्रोह करू पाहत आहे असे सांगून एका बेसावध क्षणी चांदबिबीस अटक केले आणि तिला देहांत शासन करण्यात आले. ही घटना १५९९ साली घडली व यावेळी चांदबीबी बावन्न वर्षांची होती.

अशाप्रकारे आपल्या माहेरच्या राज्याचे स्वातंत्र्य कायम राहावे यासाठी जिने आपले सर्वस्व दिले त्या चांदबिबीची तिच्याच राज्यातील लोकांनी निर्घृण हत्या केली. चांदबिबीची हत्या झाल्यावर डॅनियलने मोगल सैन्यासहित अहमदनगरवर हल्ला केला आणि अहमदनगर बेचिराख करून टाकले. या घटनेनंतर निजामशाही राज्यातील लोकांना आपली चूक समजून आली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि निजामशाही राज्य उध्वस्त झाले होते.

अहमदनगर येथे आजही चांदबिबीस जेथे दफन करण्यात आले ती जागा चांदबीबी महाल या नावाने ओळखले जाते व अहमदनगर जिल्ह्यातील हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते. चांदबीबी ही राजकारणात कुशल होतीच मात्र तिचे अरबी, फारसी या परकीय आणि दक्षिण भारतातील स्थानिक भाषांवरही प्रभुत्व होते व परदेशातील हुशार व्यक्तींना आश्रय देऊन त्यांच्याकडून राज्याचा फायदा करून घेण्यातही ती कुशल होती त्यामुळे आजही मध्ययुगीन भारताच्या इतिहासात चांदबिबीचे नाव आवर्जून घेतले जाते.