वाघनखं - शिवरायांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले शस्त्र

वाघनखांचे प्रमुख महत्व यासाठीच की, या शस्त्राचा पहिला ज्ञात प्रयोग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असल्याने त्यांनाच वाघनखं या शस्त्राचे जनक म्हणणे योग्य राहील.

वाघनखं - शिवरायांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले शस्त्र

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार व दांडपट्टयाव्यतिरिक्त वापरलेले एक प्रसिद्ध व गुप्त प्रकारातील ऐतिहासिक हत्यार म्हणजे वाघनखे. वाघनखांना मराठीत वाघनख्या असा पर्यायी शब्द असून हिंदीमध्ये यांना बाघनखं व इंग्रजीत Tiger Claws म्हणून ओळखले जाते. 

वाघनखे या नावातच सर्व काही आहे. अतिशय प्रबळ असा वाघ जसा आपल्या शिकारीचा फडशा पाडण्यासाठी शक्ती, चपळता, तीक्ष्ण दांत आणि नखांचा वापर करतो. वाघाच्या याच मूलभूत अंतःप्रेरणेचा अभ्यास करून वाघनखं तयार करण्यात आली. वाघनखांचा वापर करून शत्रूचा कोथळा काढण्याची क्षमता मनुष्यामध्ये वाघनखांमुळे येते.

वाघनखांचे सर्वात मुख्य वैशिट्य म्हणजे या शस्त्राचा पहिला ज्ञात प्रयोग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असल्याने त्यांनाच वाघनखं या शस्त्राचे जनक म्हटले जाते. भारतीय इतिहासकारांनीच नव्हे तर परदेशी इतिहासकारांनी सुद्धा वाघनखांच्या निर्मितीचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानले आहे व १६५९ साली अफजलखान वधाच्या प्रसंगी या शस्त्राचा प्रथम वापर महाराजांनी केला असल्याचे मान्य केले आहे.

कृष्णाजी अनंत सभासदकृत सभासद बखर ही शिवकालीन इतिहासाची माहिती देणारी सर्वात पहिली बखर मानली जाते. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीस जाण्यापूर्वी हातात वाघनखे परिधान केल्याचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.

"राजियांनी जरीची कुडती घातली. डोईस मंदिल बांधिला त्यांत तोडा बांधिला. पायांत चोळणा घालून कास कसली व हातात एक बिचवा व वाघनखं चढविले"

तसेच ज्यावेळी खानाने भेटीप्रसंगी शिवरायांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शिवरायांनी वाघनखांचा प्रयोग खानावर कशा रीतिने केला याचाही उल्लेख सभासद बखरीत पुढीलप्रमाणे येतो.

"हे देखोन राजियांनी डावे हातचे वाघनख होते, तो हात पोटात (खानाच्या) चालवला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानाची चरबी बाहेर आली."

याशिवाय अफजलखान वधाचा पोवाडा लिहिणारे प्रसिद्ध शिवकालीन शाहीर अज्ञानदासांनी शिवरायांच्या वाघनखांचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे. 

"डावे हाती बिचवा ल्याला। वाघनखं सर्जाच्या पंजाला।।"

शाहीर अज्ञानदास आपल्या पोवाड्यात पुढे लिहितात की,

"सराईत शिवाजी। त्याने बिचव्याचा मारा केला। उजवे हाती बिचवा त्याला। वाघनखे सर्जाच्या पंजाला। उदरच फाडूनी। खानाची चरबी आणिली द्वारा।।"

अफजलखान वधाच्या या वर्णनांवरून वाघनखांची योग्यता समजून येते मात्र फक्त हत्यार उत्तम असून उपयोगाचे नाही तर या हत्याराचा वापर करणाराही तेवढ्याच प्रतीचा उत्तम योद्धा असावा लागतो व छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच एक उत्तम योद्धे होते कारण कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या श्री शिवभारत या ग्रंथात शिवाजी महाराज हे एक उत्तम मल्ल असल्याचा उल्लेख आहे. मल्लविद्या शिकलेले असल्याने आपल्या बाहुबलाच्या साहाय्याने त्यांनी वाघनखांचा वापर करून खानाच्या पोटात खोलवर वार केला.

वाघनखांचा इतिहासातील पहिला ज्ञात वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वध प्रसंगी केला ते आपण पहिलेच मात्र वाघनखं कशी असतात हे सुद्धा जाणून घेण्याच्या प्रयत्न करू. 

शस्त्रास्त्रांचे प्रख्यात अभ्यासक कै. राजरत्न प्रोफेसर माणिकराव यांच्या नुसार वाघनखे ही एका पोलादी पट्टीत पाव इंच अंतराने बसवलेली चार तीक्ष्ण नखे असून प्रत्येक नख हे सव्वा इंच लांबीचे असते व त्यास तिन्ही बाजूना शिरा व खालच्या बाजूस धार असते. नखे ज्या पट्टीत बसवली असतात त्या पट्टीच्या दोन्ही बाजूंस अंगठ्या असतात व त्यामुळे अंगठ्यांमध्ये दोन बोटे घालून हे हत्यार मुठीत सहज लपवता येते. पट्टीवरील अंगठ्यांवर हिरे मणिके इत्यादी रत्ने लावल्यास समोरच्या मनुष्यास बोटातील अंगठ्यांचाच भास होतो. वाघनखांना क्वचित सोनेरी मुलामाही देण्यात येत असे जेणेकरून बाहेरील बोटांमध्ये दिसणाऱ्या अंगठ्या या खरोखरच्या सोन्याच्या अंगठ्या वाटाव्यात.

वाघनखांचा प्रयोग प्रामुख्याने आपल्या बाहुबलाचा वापर करून शत्रूच्या पोटावर हाताचा जोरदार दाब देऊन खुपसण्यासाठी केला जात असे. एकदा का वाघनखे पोटात घुसली की मूठ आवळून ती बाहेर काढताना शत्रूचा कोथळा या वाघनखांसाहित बाहेर येत असे व शत्रू गारद होत असे.

अशाप्रकारे तलवार या मुख्य शस्त्रप्रकारातील एक वेगळी रचना असलेले वाघनखं हे शस्त्र असून या शस्त्राची निर्मिती करण्यामागे शिवरायांचा शस्त्रास्त्रांचा उत्तम अभ्यास व दूरदृष्टी दिसून येते.