शिवपुण्यतिथी - राजे निजधामास गेले

इंग्रजी कालगणनेनुसार ३ एप्रिल १६८० हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील शोकदिवस. याच दिवशी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वयाच्या ५० व्या वर्षी देहावसान झाले.

शिवपुण्यतिथी - राजे निजधामास गेले

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पाहिलेले स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पूर्ण करून राजे निजधामास गेले. महाराजांचे अनेक सखे सोबती, शूर सेनानी पूर्वीच हे जग सोडून गेले होते. माँसाहेब आणि आबासाहेबही मोक्षमार्गास निघून गेले होते.

महाराजांच्या मृत्यूपूर्वी व राज्याभिषेकानंतर रायगडावर काही सुखसोहळे झाले त्यापैकी संभाजी महाराजांची मुंज हा पहिला सोहळा. सन १६७५ च्या फेब्रुवारी महिन्यात संभाजी महाराजांची मुंज शिवाजी महाराजांनी करवून घेतली.

यानंतर पाच वर्षांनी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर शिवाजी महाराजांच्या उपस्थितीतच झाली. आपल्या अखेरच्या दिवसांची चाहूल लागल्याने महाराजांनी राजाराम महाराजांचे पहिले लग्न त्वरीत उरकून घेतले. प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाई हिस आपली सून बनवून रायगडावर मोठा उत्सव केला. 

२४ मार्च १६८० साली महाराजांना ज्वर आला. काही दिवस तो राहील व निघून जाईल असे अनेकांना वाटले मात्र तो ज्वर निघून न जाता अधिकच वाढू लागला. आपला समय समीप आला समजून त्यांनी विश्वासू सहकाऱ्यांना जवळ बोलावले.

यानंतर सर्वाना तहपत्रे दिली व सर्वांना नंतर बाहेर जाण्यास सांगितले. शेवटच्या क्षणी महाराजांनी योगाभ्यास करून आत्मा ब्रह्मरंध्रास नेऊन दशमद्वार फोडून प्राणप्रयाण केले असा उल्लेख सभासद करतो.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूवेळी फक्त सोयराबाई, पुतळाबाई आणि सकवारबाई हयात होत्या. याशिवाय राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी जानकीबाई सुद्धा हजर होत्या. संभाजी महाराज येसूबाईंसहित पन्ह्याळ्यावर होते.

महाराजांच्या निधनाची बातमी संभाजी महाराजांपर्यंत उशिरा पोहोचली किंबहुना ती पोहोचूच नये असा कट किल्ल्यावरील काही लोकांनी केला होता. महाराजांची उत्तरक्रिया राजाराम महाराजांनी केली.

राजाराम महाराज लहान असल्याने महाराजांच्या चितेस कान्होजी भांडवलकर यांनी अग्नी दिला असा उल्लेख सभासद करतो मात्र ९१ कलमी बखरीत परसोजी भोसले यांनी चितेस अग्नी दिल्याचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महाराणी पुतळाबाईसाहेब सती गेल्या. 

शिवाजी महाराजांच्या निधनाविषयी परकीय सत्तानी जी माहिती दिली आहे त्यामध्ये ब्रिटिश एका तत्कालीन पत्रात म्हणतात की, आम्हास खात्रीलायक कळले आहे की तीन दिवसांपूर्वी शिवराज मरण पावले. तत्पूर्वी ते १२ दिवस आजारी होते. रक्तातिसाराने त्यांचे मरण ओढवले. 

याशिवाय मुघल लेखक खाफीखान महाराजांच्या मृत्यूविषयी आनंद व्यक्त करतो, फ्रेंच लोकांनी म्हटले की 'हिंदुस्थानातील नाव घेण्यासारख्या अशा थोर विभूतींमध्ये शिवाजीस अत्यंत महत्वाचे स्थान आहे.' महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळली तेव्हा त्याने प्रथम आनंद व्यक्त केला व म्हणाला 'शिवाजी हा फार मोठा सेनापती होता, नवीन स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्यातच होते. सतत १९ वर्षे माझे सैन्य त्याच्याशी लढा देत होते तरीही त्याचे राज्य वाढतच आहे.'

स्वराज्यनिर्मिती करताना झालेली प्रचंड मेहनत आणि परिश्रम वयाच्या सायंकाळी अखेर दुर्धर आजारात परिवर्तित झाले आणि भारताच्या पश्चिम भागात न्यायाचे व जनतेचे असे स्वराज्य स्थापित करून जाणता राजा कालवश झाला.