दुर्गव्यवस्था - भाग १

आतापर्यंत आपण अगदी सिंधू संस्कृतीपासून दुर्ग व त्याचे कालपरत्वे बदलत गेलेले स्वरूप याचा थोडक्यात आढावा घेतला. दुर्गाचे प्रकार व दुर्गबांधणीशास्त्र थोडक्यात समजावून घेतले. दुर्गाच्या विविध अंगांची ओळख करून घेतली. आता दुर्गाचे व्यवस्थापन (लष्करी व मुलकी) कसे चालत असे याच्याबद्दल थोडेसे समजावून घेऊ.- संतोष विष्णू जाधव (पुणे)

दुर्गव्यवस्था - भाग १

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

दुर्गाच्या प्रशासनाचे ढोबळमानाने २ भाग असत लष्करी व मुलकी. लष्करी प्रशासनात प्रामुख्याने हवालदार, सरनोबत/तटसरनोबत, नायकवडी, नाईक व पाईक इत्यादी वर्गाचा समावेश होई. मुलकी प्रशासनात सबणविस (शबनवीस या फारसी शब्दावरून हा शब्द आला आहे) वाकीआणवीस/वाकेनवीस व कारखानीस यांचा समावेश होई.

लष्करी प्रशासन

कारखानाहवालदार/मुद्राधिकारी (किल्लेदार) - हा दुर्गावरील सर्वोच्च अधिकारी असे. याच्या ताब्यात दुर्गाचा दैनंदिन कारभार तसेच आपत्ती प्रसंगी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार असे. आज्ञापत्रकार याच्याबद्दल म्हणतात 'किल्ल्याचा जीव तो किल्ल्याचा हवालदार'. अतिशय कमी शब्दात या पदाचे महत्व त्यांनी विशद केले आहे. याची सत्ता केवळ गडावरच नव्हे तर गडाच्या घेऱ्यात चाले. युद्ध प्रसंगी घेऱ्यातील जनतेला गडावर आश्रय देणे तसेच कर गोळा करणे अशी कामे देखील यालाच करावी लागत. शिवकाळात याची नेमणूक खुद्द महाराज करीत. आज्ञापत्रात याला गडाचा सेनापती संबोधतात. हा कुलवन्त मराठा जातीचा असावा असा साधारण दण्डक होता. मात्र एखाद्या विशेष प्रसंगी 'नामजाद किल्लेदार' (तत्कालीन परिस्थितीमुळे काही काळासाठी नेमलेला किल्लेदार ) देखील किल्ल्यावर नेमला जाई. पुरंदर लढाईच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांना राजांनी नामजाद किल्लेदार नेमल्याचे दिसून येते. शिवकाळात हवालदाराच्या कार्यकाळ ३ वर्षे असावा असा सर्वसामान्य नियम होता. मात्र एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैशिष्ट सेवेमुळे अधिक काळासाठी त्याच किल्ल्यावर ठेवल्याचे सुद्धा कधी कधी दिसून येते. शिवपूर्वकाळात याच्या नेमणूकित राजसत्ते नुसार बदल होत असे.

सरनोबत/तटसरनोबत  - किल्लेदाराचा हा सर्वात जवळचा सहकारी असे. हा देखील चांगला  कुलीन घरंदाज पाहून निवडला जाई. मागे आपण पहिलेच कि प्रतापराव हे सरनोबत होण्याच्या पूर्वी काही काळ राजगडावर तटसरनोबत म्हणून नियुक्त होते. हवालदाराच्या अनुपस्थित हाच गडाचा कारभार पहात असे. इतर वेळी हा मुद्राधिकाऱ्याच्या आज्ञेत राहून गडाचे मेट, चौक्या, पहारे यांच्यावर तसेच सैनिकांवर नियंत्रण ठेवीत असे. गडाच्या विस्तारानुसार गडावर एकाहून अधिक तटसरनोबत देखील नियुक्त केले जाई. मात्र प्रत्येक गडावर स्वतंत्र तटसरनोबत असेलच असे नाही. गडाचा तट किती मोठा आहे त्यावर ते अवलंबून असे.

नाईक - ९ पाईक व त्यावर १० वा नाईक नियुक्त केला जाई. हा लष्करी श्रेणितील सर्वात खालचा अधिकारी होय.

पाईक - सैन्य श्रेणीतील हा सर्वात शेवटच्या स्तरावरील सेवक असे.

वरील सर्व लोकांची भरती करताना जामीन पाहूनच ती केली जाई. साधा पाईक देखील विनाजामीन भरती केला जात नसे.

मुलकी प्रशासन

सबणविस - हा हवालदाराचा मोलाचा मुलकी सहायक असे. गडावरील लोकांचा पगार, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी, गडासंबधीचा पत्रव्यवहार हि याची मुख्य कामे होत. हा गडाचा पेशवा समजला जाई. गडाचा  खजिना याच्या ताब्यात असे. गडासंबधी कोणताही हुकूम देताना याची परवानगी अनिवार्य असे. याचा कार्यकाळ ५ वर्षे असे. शिवकाळात सर्वच लष्करी मंडळींना रोख पगार देत असल्याने याच्यावर देखरेख करणाऱ्या सबणीसास बरीच कामे असत. त्यामुळे गरजेनुसार यास एखादा सहायक नेमण्याची मुभा असे.  

कारखानीस - गडाचा कारभार चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी हवालदार व सबणविस याच्या मदतीला अजून एक अधिकारी दिला जाई तो म्हणजे कारखानीस. हा गडाचा पुरवठा अधिकारी असे. गडावरील कारखाने, कामगार, धान्यकोठारे, सरपण, दारुगोळा व गडाच्या रोजच्या सर्व आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवणे, त्याची तपासणी करणे व आवश्यकतेनुसार सर्व वस्तू उपलब्ध करून देणे हि याची प्रमुख कार्ये असत. गडाची रोजकीर्द (दैनंदिनी) लिहिणे हे देखील याचेच काम असे. सबनविसाप्रमाणेच याचा कार्यकाळ देखील ५ वर्षे असे. हा देखील अतिशय महत्वाचा अधिकारी असे. कारण कधी गडाला वेध पडला तर गडाची शिबंदी उपाशी पडू नये यासाठी याला सर्व शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक वस्तूचा पुरवठा सुरळीत कसा राहील हे पाहावे लागे.

वरील व्यवस्था ही शिवकालीन राज्यातील त्यांच्या ताब्यातिल दुर्गांवर  राबविली जाई. मात्र मुघल व इतर शाहयांची व्यवस्था थोडी वेगळी होती.  तिच्यात किल्लेदार व सबनवीस आणि वाकेंनवीस अशी उतरन असे. वाकेंनवीस हा किल्य्याचा सर्व वृत्तांत केंद्रीय सत्तेस पाठवित असे.

पुढील भागात या अधिकाऱ्यांच्या सहाय्यक वर्गाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.  क्रमशः

- संतोष विष्णू जाधव (पुणे)