इब्राहिमखान गारदी - पानिपतच्या युद्धात कामी आलेला मोहरा

पानिपतचा महासंग्राम सुरु झाला त्यावेळी मराठे व अब्दाली यांच्यात एकूण तीन मोठी युद्धे झाली त्यावेळी इब्राहिमखान गारदी याच्या तोफखान्याने खूप चांगली कामगिरी केली.

इब्राहिमखान गारदी - पानिपतच्या युद्धात कामी आलेला मोहरा
इब्राहिमखान गारदी

पानिपतच्या  युद्धात मराठ्यांचा तोफखाना प्रमुख म्हणून कार्य पाहणारा इब्राहिमखान गारदी म्हणजे उत्तरकालीन मराठा इतिहासातील एक महत्वाची व्यक्ती. मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख म्हणून त्याचे नाव प्रख्यात असले तरी त्याच्या चरित्राविषयी खूप कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे.

दक्षिण भारतात तामिळनाडू या राज्यात पुद्दुचेरी नावाचा एक प्रांत आहे ज्यास पूर्वी पॉंडिचेरी या नावाने ओळखत. या ठिकाणी फ्रेंच लोकांची वसाहत होती. याच ठिकाणी ड ब्यूरी नावाचा एक आसामी होता व त्याच्या पालखीपुढे छडी घेऊन धावण्याचे काम इब्राहिमखान गारदी याने कारकिर्दीच्या सुरुवातीस केले होते.

या ठिकाणी राहिल्यामुळे इब्राहिमखानास फ्रेंच भाषेचे ज्ञान अवगत झाले होते आणि युरोपियन लोकांमध्ये कवायती फौज नावाचा जो प्रकार होता त्याची माहितीही त्यास झाली होती. इब्राहीमखानाची हुशारी पाहून ड ब्युरोने त्यास शिपायांचे नाईकपद दिले. पुढे आपल्या कर्तबगारीच्या जोरावर त्याने अमलदार हे पद प्राप्त करून त्याच्या हाताखाली दोन हजार पायदळ आणि दोनशे स्वार आले.

फौजेत अंमलदार हे पद म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जाई व त्यांना आपल्या सैन्यात दाखल करून घेण्यास इतर राज्ये उत्सुक असत. लवकरच इब्राहिमखान याने फ्रेंचांची नोकरी सोडून हैदराबादच्या निजामाची नोकरी धरली. यावेळी मुसाबुसी नामक सरदाराने गारद्यांची एक पलटण तयार केली व या पलटणीत इब्राहिमखान गारदी होता असा उल्लेख सापडतो. इब्राहिमखान काही काळ वऱ्हाड प्रांतात निजामअल्लीकडे सुद्धा होता मात्र मुसाबुसीने त्याला तेथून पुन्हा आपल्याकडे घेतले होते.

मुसाबुसीच्या तोफखाना पाहून असा तोफखाना आपल्याकडे असावा अशी इच्छा सदाशिवराव पेशवे यांची झाल्याने त्यांनी मुसाबुसीची काही माणसे आपल्याकडे घेऊन त्याच पद्धतीचा तोफखाना तयार केला. बहुदा १७५८ नंतर इब्राहिमखान मराठ्यांस सामील झाला असावा.

मराठ्यांकडे असताना इब्राहीमखानाने चांगली कामगिरी केली. उदगिरीच्या लढाईत इब्राहीमखानाच्या तोफखानाच्या चांगला प्रभाव दिसला होता. मराठ्यांची लढाईची प्रसिद्ध पद्धत म्हणजे गनिमी कावा! मात्र तोफखानाच्या लोकांना गनिमीकावा शक्य नसे. ज्यावेळी उदगिरीहून मराठे पानिपतकडे निघाले त्यावेळी इब्राहिम खान आणि सदाशिवराव यांचा जो संवाद झाला त्यावेळी इब्राहिमखान म्हणाला की,

तुम्ही गनीम लोक, दहा वेळा पळालं आणि दहा वेळा उभे राहाल पण आम्ही गारदी फक्त पाय उतारे. आम्हाला पळावयास पाय नाहीत आणि गाठ तर रोहिल्यांची पडणार.

यावेळी सदाशिवराव म्हणाले की, असा प्रसंग जर आलाच तर आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही भांडून उभे राहाल तेथेच आम्ही पण राहू. यात अंतर पडणार नाही.

असे म्हणून भाऊंनी इब्राहीमखानास बेलभंडारा दिला आणि त्याच्याकडून साजुकरोटी घेतली. यानंतर मराठ्यांनी दिल्लीकडे कूच केले. यावेळी इब्राहिमखानाच्या हाताखाली दहा हजार गारदी आणि शंभर तोफांचा तोफखाना होता. भाऊसाहेब दिल्ली घेऊन कुंजपुरा येथे निघाले तेव्हा त्यांना कळले की कुतुबशाह आणि शाहमत खान कुंजपुराच्या किल्ल्यात अडकले असून अब्दाली त्यांना कुमक पाठवणार आहे. यावेळी सदाशिवराव भाऊंनी स्वार पाठवून इब्राहीमखानास तातडीने बोलावून घेतले. 

सदाशिवराव भाऊंनी हल्ल्यासाठी मुहूर्त काढला होता मात्र इब्राहिमखान गारदी हा निरोप मिळाल्यावर रातोरात प्रवास करून कुंजपुऱ्यास दाखल झाला होता. हल्ल्याच्या मुहूर्तास तीन घटका वेळ असल्याने भाऊंनी इब्राहीमखानास सांगितले की अजून अवकाश आहे तेव्हा लगेच उठू नका मात्र इब्राहीमखानाने भाऊंना कळवले की मुहूर्त कशाला हवा? आम्ही किल्ला फत्ते करतो आणि भेटायलाच येतो. आणि इब्राहीमखानाने हल्ला करून किल्ला सर केला. या हल्लया आणखी वेळ गेला असता तर अब्दालीची कुमक तेथे पोहोचून किल्ला जिंकणे मराठ्यांना अवघड गेले असते.

पानिपतचा महासंग्राम सुरु झाला त्यावेळी मराठे व अब्दाली यांच्यात एकूण तीन मोठी युद्धे झाली त्यावेळी इब्राहीमखानाच्या तोफखान्याने खूप चांगली कामगिरी केली. मात्र हे युद्ध जसे रेंगाळायला लागले तसा मराठ्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. शेवटी सैन्यासह निघून जावे असा विचार सर्वानी केला मात्र अब्दालीची फौज वाटेवर असताना तिच्या अंगावरून दिल्लीस निघून जाणे शक्य नाही असे मल्हारराव होळकर यांचे मत होते मात्र पर्याय नसल्याने दिल्लीस माघारी जाण्याचा बेत सर्वानुमते ठरला.

याचकाळात इब्राहीमखानास फोडण्याचा प्रयत्न अब्दाली, नजीबखान आणि सूजाउद्दौला सुरु ठेवलाच होता. आम्हाला सामील हो, आम्ही तुला पंचवीस लाखाचा मुलुख देऊन तुला उमराव पद पण देऊ अशी वचने देणारी पंचवीस पत्रे शत्रूकडून इब्राहीमखानास गेली. ही पत्रे इब्राहीमखानाने सदाशिवराव यांना दाखवून म्हणाला. की भाऊसाहेब, तुम्ही ज्या वेळी एक यावयासी मसलत केलीत ते समयी तुमचे आमचे इनाम प्रमाण झाले तोच करार आहे. आमचे गैर इनाम असते तरी प्रचित दाखवतो. असे म्हणून इब्राहीमखानाने ती पत्रे सदाशिवराव यांना दाखवली. 

भाऊसाहेब इब्राहीमखानाचा प्रामाणिकपणा पाहून म्हणाले, तुमचे आमचे इमान हाच करार! परंतु आता दिल्लीस जाऊन पोहोचण्यासाठी काय करायचे? निभावणी कशी होईल?

यावर इब्राहिम खान म्हणाला, तुम्ही आम्हाला भर मैदानात सोडून निघून जाल असे वाटत आहे. आम्हास मात्र मृत्यू गाठेल हे निश्चित.

यावर भाऊ म्हणाले, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. तुम्ही जेथे उडी टाकून उभे राहाल तिथेच आम्हीही कत्तल होऊन जाऊ. पण रण सोडून जाऊ हे घडणार नाही.

यानंतर इब्राहीमखानाने दिल्लीस जाण्याची योजना तयार केली. देशी मोगल निजामल्ली नवाब तुम्हांसी लढाई हमेशा करतो. त्याचप्रमाणे गोल बांधून मध्ये बुणगे घालावे व भोवती मातब्बर सरदार ठेवून बाजवा वाटून द्याव्या आणि कोस दोन कोस लढत, भांडत दिल्लीस जाऊन पोहोचावे अशी योजना होती.

मात्र सदाशिवराव यांनी ही योजना अचानक बदलल्यामुळे इब्राहिमखान त्याच्या तोफखान्यासहित अडचणीत सापडला आणि हरप्रकारे प्रयत्न करूनही काहीच उपयोग झाला नाही. याच तोफखान्याच्या जोरावर इब्राहीमखानाने अब्दालीचे आठ हजार सैन्य मारले मात्र त्याची योजना रीतसर अमलात न आणल्याने सैन्य एकजुटीने राहिले नाहीत व कोणाचीच मदत कोणालाच होईनाशी झाली. बघता बघता अब्दालीवर आग ओकणारा तोफखाना सुद्धा बंद झाला आणि अब्दालीच्या सैन्याने पाच हजार गारदी कत्तल केले. इब्राहिमखान याचा पुत्र आणि भाचाही मारला गेला.

इब्राहिमखान स्वतः जबर जखमी होऊन लढत होता. मात्र शेवटी शत्रूच्या कैदेत सापडला. कैदेत असतानाही अब्दालीने त्यास पक्षात येण्यास सांगितले मात्र सदाशिवराव यांना वचन दिल्याचे सांगून त्याने अब्दालीकडे जाण्यास नकार दिल्याने अब्दालीने इब्राहीमखानास ठार मारले.

इब्राहीमखानाचे जे वर्णन इतिहासकारांकडून केले गेले आहे त्यानुसार तो अंगाने सडपातळ व वर्णाने सावळा असून त्याच्या मुखावर देवीचे अनेक व्रण होते. फार कमी काळात त्याने मराठ्यांच्या सैन्यात आपली स्वतंत्र ओळख तयार केली होती. दुर्दैवाने पानिपतच्या युद्धात लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले आणि ज्या २७ मोहोरा हरवल्या त्या मोहोऱ्यांत इब्राहिमखान गारदी यांचे नाव आजही सन्मानाने घेतले जाते.