हॉस्पिटल बांधणारा राजा

राजेंद्र चोळ राजाने तिरुमुक्कडल इथे असलेल्या या महाविद्यालयाशी संलग्न असे एक वैद्यकीय केंद्र (अथुरा सलई) उभारले होते. जिथे विविध आजारांवर उपचार केले जात असत. - आशुतोष बापट

हॉस्पिटल बांधणारा राजा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रुग्णसेवा, रुग्णालये यांना असलेले अनन्यसाधारण महत्त्व आपण सगळे जाणतोच. रुग्णालय ही एक अत्यावश्यक बाब आहे हे जसे या प्रगत काळात आपल्याला जाणवते, तशीच जाणीव १००० वर्षांपूर्वी आपल्या राजांनासुद्धा होती. खरंतर त्याआधीसुद्धा सम्राट अशोकाच्या शिलालेखातून ‘मनुसचिकीछा आणि पसुचिकीछा’ अशी माहिती येते. त्यावरून अगदी प्राचीन काळापासून आपल्या राजांना रुग्णसेवेचे महत्त्व किती होते हे दिसून येते. नंतरच्या काळात चोळ राजांनी खास रुग्णालय उभारून तिथे केलेली व्यवस्था याचे स्पष्ट पुरावे आपल्याला त्यांच्या शिलालेखांतून मिळतात.

तामिळनाडू म्हणजेच गोपुरांचा प्रदेश. भव्यदिव्य मंदिरे आणि त्यांची उंचच उंच गोपुरे असं इथलं स्थापत्य. पल्लव, चोळ, पांड्य अशा राजसत्ता इथे नांदल्या. त्यांच्या वैभवाच्या खुणा आज आपल्याला त्यांनी बांधलेल्या मंदिरांच्या रूपाने बघायला मिळतात. तामिळनाडूतल्या मंदिरांची खासियत म्हणजे प्रशस्त आवार, भरपूर खांब असलेले सभामंडप, गाभाऱ्यात अनेक समया लावलेल्या, आणि मंदिरांवर कोरलेले असंख्य शिलालेख. मंदिरे ही केवळ देवाचे निवासस्थान नसून सामाजिक संस्था आहेत. ते पूर्वीच्या काळाबद्दल खूप बोलतात. मंदिरांमध्ये काही शिलालेख असतील तर विलक्षण इतिहास अस्सल पुराव्यांसह पुढे येतो. हे शिलालेख आपल्याला इतिहासाची अनेक पाने उलगडून दाखवतात. तत्कालीन राजांची धार्मिक, सामाजिक, आर्थिक विचारसरणी कशी होती याचा एक जणू चित्रपटच आपल्यासमोर उलगडून दाखवतात.

तर या गोपुरांच्या प्रदेशात भटकंती करताना अगदी अनगड ठिकाणे अकस्मात सामोरी येतात आणि तत्कालीन राजवटींचा एक वेगळाच आयाम आपल्यासमोर मांडतात. कांचीपुरम या सुप्रसिद्ध ठिकाणापासून जेमतेम २० कि.मी. अंतरावर ‘तिरुमुक्कडल’ नावाचं गाव आहे. पालार, वेगवती आणि चेय्यार अशा तीन नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण. या ठिकाणी वसले आहे श्रीअप्पन प्रसन्न वेंकटेश पेरुमल मंदिर. संगमावर वसलेले ठिकाण म्हणून अर्थातच त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले. हे वेंकटेश पेरूमल मंदिर त्यावर असलेल्या शिलालेखांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. या मंदिरावर इ.स.च्या ११ व्या शतकातील वीर राजेंद्र चोळ या राजाचे विविध शिलालेख आहेत. या शिलालेखांचा विस्तृतपणे अभ्यास झालेला असून त्यातून काही विलक्षण गोष्टी समोर येतात. इथल्या शिलालेखानुसार या मंदिराच्या 'जननाथ मंडपम' मध्ये एक वैदिक महाविद्यालय चालवले जात होते. चार वेद, व्याकरण यासह एकूण आठ विषय विद्यार्थ्यांना शिकवले जात असत. विशेष म्हणजे शिलालेखांमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, प्रत्येक विषयासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांची संख्या आणि त्यांना दिले जाणारे मानधन याबद्दल तपशीलवार माहिती मिळते. अनेक शिक्षकांना धान्याच्या रुपात मोबदला दिला जात असे. तसेच या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साठी एक वसतिगृह बांधले होते. या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी नियुक्त केलेल्या नोकर व स्वयंपाकी यांचे तपशील शिलालेखांमध्ये दिलेले आहेत.

याच राजेंद्र चोळ राजाने तिरुमुक्कडल इथे असलेल्या या महाविद्यालयाशी संलग्न असे एक वैद्यकीय केंद्र (अथुरा सलई) उभारले होते. जिथे विविध आजारांवर उपचार केले जात असत. १५ खाटांच्या या रुग्णालयाचे नाव 'वीर चोळन' या राजाच्या नावावरून ठेवण्यात आले होते आणि त्यात ‘कोदंडरामन अश्वत्थमन भट्टन' नावाचा वैद्य, तसेच शस्त्रक्रिया करणारे शल्यचिकित्सक, रुग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिका आणि विविध ठिकाणाहून औषधी वनस्पती आणण्यासाठी सेवक असे पुरेसे मनुष्यबळ होते. इथल्या रुग्णांना रोजचे जेवणसुद्धा दिले जायचे. या सगळ्याचे तपशीलवार उल्लेख इथल्या शिलालेखातून मिळाले आहेत. रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन तसेच रूग्णालयात साठवलेल्या सुमारे २० प्रकारच्या औषधांची माहिती शिलालेखांमध्ये तपशीलवार आहे. त्याकाळी उपयोगात येत असलेल्या औषधांची यादी आता या मंदिराच्या बाहेर एका फलकावर लावलेली आहे.

चोळ राजांनी केवळ लढाया करून साम्राज्य विस्तार करण्यातच आपले आयुष्य घालवले असे नसून त्यांनी एक चांगला समाज घडवण्यासाठी धर्मासोबतच शिक्षण आणि आरोग्य सेवेलाही महत्त्व दिल्याचे यातून दिसते. प्रजाहितदक्ष राजा आपल्या प्रजेची कोणकोणत्या प्रकारे काळजी घेतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुमुक्कडल इथले हा वेंकटेश पेरूमल मंदिर आणि त्यावर असलेले हे विविध शिलालेख. इतिहासाच्या एका निराळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे हे मंदिर गोपुरांच्या प्रदेशात नक्कीच आपले वेगळेपण दाखवते.

- आशुतोष बापट