भंगाराम देवी - देवतांचे अनोखे न्यायालय

निसर्गाची भरपूर उधळण असलेल्या बस्तर जिल्ह्यात केशकाल घाटाच्या माथ्यावर वसली आहे ही भंगाराम देवी. ह्या देवीचे कार्यक्षेत्र आजूबाजूच्या ५५ गावांपर्यंत विखुरलेले आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला इथे देवीची जत्रा भरते. ‘भादो जातरा’ असं याचं नाव. याच जत्रेत देवीचे न्यायालय भरते.

भंगाराम देवी - देवतांचे अनोखे न्यायालय
भंगाराम देवी

माणसाच्या भावभावना, श्रद्धा, समजुती, रूढी अपरंपार आहेत. त्यांना सीमा नाही. यथा देहे तथा देवे या नात्याने मानवी मनात येणाऱ्या सगळ्या गोष्टी देवाशीपण जोडल्या जातात. माणूस आणि देव कुणी निराळे नसून एकसारखेच आहेत असे समजून विविध सुंदर आणि काहीशा चमत्कारिक परंपरा दिसून येतात. छत्तीसगड राज्यात अशीच एक आगळीवेगळी प्रथा पाळली जाते. या राज्यात बस्तर जिल्ह्यात चक्क देवतांना कोर्टात खेचले जाते आणि न्यायनिवाडा केला जातो. मात्र हे न्यायालय माणसांचे नसून देवाचेच असते. इथे न्यायाधीशपदी विराजमान असते ‘भंगाराम’ नावाची देवी.

निसर्गाची भरपूर उधळण असलेल्या बस्तर जिल्ह्यात केशकाल घाटाच्या माथ्यावर वसली आहे ही भंगाराम देवी. ह्या देवीचे कार्यक्षेत्र आजूबाजूच्या ५५ गावांपर्यंत विखुरलेले आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला इथे देवीची जत्रा भरते. ‘भादो जातरा’ असं याचं नाव. याच जत्रेत देवीचे न्यायालय भरते. आजूबाजूच्या गावातील लोक आपल्या ग्रामदेवतांच्या तक्रारी घेऊन इथे येतात. ही दैवते जर पूर, रोगराई, तसेच गावकऱ्यांच्या अडीअडचणीच्या वेळी गावकऱ्यांना साथ देत नसतील तर त्यांची तक्रार इथे भंगाराम देवीकडे केली जाते. ग्रामदैवतांची प्रतीके ही मुखवटे, तरंग, काठ्या अशा स्वरुपात इथे आणली जातात. देवांचे प्रतिनिधी म्हणून पुजारी, मांझी, मुखिया, गायता अशी मंडळी येतात. त्यांच्या अंगात ग्रामदेवतेचा संचार होतो. गावकरी भंगाराम देवीपुढे तक्रारी सांगतात. भंगाराम देवी या सगळ्याची शहानिशा करते आणि देवतांच्या कामात कुचराई झाल्याचे सिद्ध झाले तर देवांना ६ महिन्यांचा कारावास ते अगदी मृत्युदंडापर्यंतची शिक्षा दिली जाते. मृत्यूदंड झाला तर देवतांची आणलेली प्रतीके भंगाराम देवीच्या समोरच्या मोठ्या कुंडात टाकून दिली जातात. कारावास असेल तर गावातल्या देवळातून तेवढ्या काळापुरती देवतेची मूर्ती काढून बाहेर ठेवली जाते. त्या सहा महिन्यात देवतेची पूजा-अर्चा-नैवेद्य सगळं बंद !

कारावासाचा काळ पूर्ण झाला की देवता पुजाऱ्याच्या स्वप्नात येतात आणि माफी मागून पुन्हा देवळात प्रस्थापित करण्याची विनंती करतात. त्यांची मग पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे सगळे अत्यंत अजब असे प्रकरण आहे. पण दरवर्षी नित्यनेमाने इथे हे न्यायालय भरवले जाते. भंगाराम देवीचा आदेश ५५ गावातील ग्रामदेवतांना शिरसावंद्य असतो. मानवी जीवनात भावभावना आणि श्रद्धा किती खोलवर रुजलेल्या आहेत त्याचे हे प्रतीकच म्हणावे लागेल. संकटकाळी जितक्या अगतिकतेने देवाकडे पाहिले जाते, तितक्याच कठोरपणे त्याने काम केले नाही तर त्याची तक्रारसुद्धा केली जाते. अतिशय आगळीवेगळी ही ‘भादो जातरा’ आणि तितकेच वेगळे इथले न्यायालय. समजा लोकांची तक्रार चुकीची आहे असे समजले तर भंगाराम देवी त्या देवतेला पुन्हा वाजत-गाजत गावात नेण्याचा आदेश देते. तो आदेशसुद्धा मनोमन पाळला जातो. माणसाच्या श्रद्धा, भावभावना, परंपरा यांचे उत्कट दर्शन बस्तर मधल्या केशकाल इथे बघायला मिळते. अजब छत्तीसगडची ही अजून एक अजब कहाणी !!

- आशुतोष बापट