महाकवी कालिदास आणि छत्तीसगड
छत्तीसगड राज्याच्या मते त्यांचा रामगढ म्हणजेच रामगिरी डोंगर होय. छत्तीसगड राज्यात असलेल्या सरगुजा जिल्ह्यात रामगढ नावाचा डोंगर आहे. या डोंगरात ‘सीताबेंगरा आणि जोगीमारा’ या सुप्रसिद्ध लेणी आहेत.

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी हटकून महाकवी कालिदासाची आठवण सगळ्यांना होतेच होते. कालिदास, त्याचे सुप्रसिद्ध खंडकाव्य मेघदूत, आणि त्यात आलेला उल्लेख “आषाढस्य प्रथम दिवसे”. त्यामुळे आजचा दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा होतो. कालिदासाने मेघदूत हे काव्य नागपूरजवळील रामटेक इथे लिहिले असा सर्वत्र समज आहे. अनेक विद्वानांनीसुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे.
मात्र छत्तीसगड राज्याच्या मते त्यांचा रामगढ म्हणजेच रामगिरी डोंगर होय. छत्तीसगड राज्यात असलेल्या सरगुजा जिल्ह्यात रामगढ नावाचा डोंगर आहे. या डोंगरात ‘सीताबेंगरा आणि जोगीमारा’ या सुप्रसिद्ध लेणी आहेत.
या लेणींमध्ये ब्राह्मी लिपीत लिहिलेला शिलालेखसुद्धा आहे. तसेच जोगीमारा लेणीत गुहाचित्रे बघायला मिळतात. ह्या लेणी ज्या रामगढ नावाच्या डोंगरात खोदलेल्या आहेत तोच रामगढ हा कालिदासाने मेघदूत लिहिल्याचे ठिकाण आहे असे छत्तीसगडची प्रजा आणि सरकारसुद्धा समजते.
त्यासाठी ते कालिदासाने मेघदूतात वर्णन केलेल्या ओळी आणि ते वर्णन रामगढशी कसे मिळतेजुळते आहे याचा दाखला देतात.
रामगढ परिसर अतिशय रमणीय आहे. त्या डोंगरात असलेल्या गुहा आणि आजूबाजूचा परिसर हे मेघदूताचे निर्मितीस्थळ आहे असे छत्तीसगडच्या सरकारचेही म्हणणे असल्यामुळे त्यांनी तिथे एक सुंदर कालिदास स्मारक तयार केलेय.
कालिदासाचा एक पुतळा आणि मेघादूतातल्या काही ओळी इथे लिहून ठेवल्या आहेत. अत्यंत रमणीय अशा छत्तीसगड प्रदेशी हिंडताना कवी कुलगुरू कालिदास असा अकस्मात समोर येतो, आणि त्याचे ते रमणीय स्मारक, जवळच असलेल्या सीताबेंगरा-जोगीमारा लेणी आणि तो सुप्रसिद्ध रामगढ मनात घर करून राहतो.
- आशुतोष बापट