भाबवडी येथील ब्रिटिशकालीन पंतसचिव बाग

चिमणाजी रघुनाथराव उर्फ नानासाहेब पंतसचिव यांना बाग बगीचाची विशेष आवड होती आणि म्हणूनच बहुतेक त्यांच्याच कालखंडात निर्माण केलेली पेशवेकालीन बाभवडी येथील बागेचे अवशेष पाहण्याचा योग आला. - सुरेश नारायण शिंदे

भाबवडी येथील ब्रिटिशकालीन पंतसचिव बाग

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भोरची ऐतिहासिक ओळख म्हणजे भोर संस्थान. छत्रपति राजाराम महाराजांच्या काळात आपल्या शौर्य, पराक्रम आणि निष्ठेने श्रीमंत रा. शंकराजी नारायण सचीव यांनी स्वराज्याच्या अष्टप्रधानात सचीवपदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळून महाराष्ट्र धर्माचे रक्षण व संवर्धन केले. असा हा कर्तृत्ववान मुत्सदी पुरुष भोर संस्थानचा संस्थापक होय.

भोर संस्थानच्या पुढील पिढीतील अधिपतींनी आपापल्या परीने या भागातील रयतेचे संरक्षक व संगोपन केल्याचे इतिहासाने पाहिले आहे. भोर संस्थानचे आठवे अधिपति म्हणून इ.स.१८३६ मधे चिमणाजी रघुनाथराव ( नानासाहेब ) हे श्रीमंत रघुनाथराव यांच्या मृत्यूमुळे वयाच्या तिसऱ्या वर्षी भोर संस्थानचे अधिपति झाले आणि प्रत्यक्ष कारभार मातोश्री श्रीमंत गंगुबाई पाहू लागल्या. श्रीमंत नानासाहेब यांची सुरूवातीची काही वर्षे कर्जफेड करण्यात व संस्थानातील अव्यवस्था सुधारण्यात गेली. नंतरच्या काळात मात्र कर्जमुक्त झाल्यावर त्यांनी संस्थानात सुधारणा करण्यासाठी विशेष कार्य केल्याचे दिसून येते. नीरा नदीवर दगडी पुल, रामबाग येथून नळाद्वारे पाणी पुरवठा योजना, शिक्षण व्यवस्था, चलन, व्यापार, रस्ते, सरकारी व सार्वजनिक इमारती, पोलीस यंत्रणा, चौक्या, न्याय, कचेरी इत्यादी सुधारणा केल्या. त्यांना बाग बगीचाची विशेष आवड होती आणि म्हणूनच बहुतेक त्यांच्याच कालखंडात निर्माण केलेली पेशवेकालीन बाभवडी येथील बागेचे अवशेष पाहण्याचा योग आला.

काही दिवसांपूर्वी महारुद्र बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज श्री.निलेश व श्री.संदेश देशपांडे यांच्याशी बोलताना भाबवडी येथील ब्रिटिशकालीन / पंतसचिवकालीन बागेच्या अवशेषांबाबत बोलणे झाले मात्र तेथे अशाप्रकारचे अवशेष किंवा पाणी टाकी व इमारत आहे हे मला ज्ञात नव्हते. आज शनिवार असल्याने मला पूर्ण दिवस कोणतेही काम नव्हते. मी सकाळी १० वाजता देशपांडे यांच्या घरी गेलो. तेथे चहा घेऊन संदेश यांना दुचाकीवर सोबत घेऊन भाबवडीकडे निघालो. सुमारे दोनतीन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या डाव्या हाताच्या जोडरस्त्याने श्री. महादेवराव शंकर भिलारे (बापू ) यांच्या घरी पोहोचलो. भिलारे बापू हे शेतीनिष्ठ व्यक्तीमत्व असल्याने शेतीच्या कामात कायम व्यस्त. आजही त्यांना महत्त्वाचे कामानिमित्त बाहेर जायचे होते परंतु त्यातूनही आमचेसाठी काहीसा वेळ देऊन चहापान केले व लवकरच वैयक्तिक भेट देण्याचे मान्य केले. हे २९ एकर क्षेत्र पूर्वीच्याच काळी भिलारे कुटुंबाकडे हस्तांतरण झालेले आहे व भिलारे बापू यांच्या वडीलांनी त्यांच्या शेतातील बागेला पाणीपुरवठा करणारी वितरण टाकी, साठवण टाकी इत्यादी संवर्धन केले आहे. भोर शहरात मुख्य बाजारपेठे असलेल्या पाणी वितरण टाकी ( हौद / बंब्या )सारखाच पण आकारमानाने काहीसे लहान वितरण टाकी दिसून आली. चिरेबंदी दगडी बांधकामावर वरच्या भागात चुन्याच्या मिश्रणाचा गिलावा दिलेले बांधकाम आजहि सुस्थितित पाहून समाधान वाटले.

काही अंतरावर गोलाकार दगडी बांधकामातील तत्कालीन विहीर असून ह्याच विहिरीतील पाणी लोखंडी पाईपद्वारे गुरुत्वार्कषन पद्धतीने पाणी साठवण टाकी पोहोचत असावे कारण त्यांचे भौगोलिक स्थानच तसे आहे. विहिरीच्या पूर्वेस चिरेबंदी दगडी बांधकामाचे जमिनीवरील १५ थर व त्यावर चुन्याचा गिलावा, बांधकाम केलेली भव्य पाणी साठवण टाकी आहे. संपूर्ण क्षेत्रातील बागेला पाणी वितरण करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची साठवण करण्याची क्षमता तिच्या भव्यतेने सहजपणे लक्षात येते. सुमारे ३० फूट उंचीच्या या पाणी साठवण टाकीची लांबी रुंदी १५ × १५ फूट असून तळातील चोहो बाजूंनी १५ फूट उंचीचे बांधकाम चिरेबंदी दगडात केलेले आहे.

पाणी साठवण टाकीच्या समांतर दक्षिणेस पूर्वाभिमुख छोटेखानी शंभू महादेव मंदिर असून समोरील वृक्ष छायेत नंदी विराजमान आहे. पंतसचिवांच्या तत्कालीन बागेत येणाऱ्या पाहुण्यांना किंवा कुटुंबियांना निसर्ग सौंदर्याबरोबरच देवदर्शन मिळावे हा हेतू असावा. मंदिराच्या डाव्या बाजूला एका चौकोनी दगडी पारावर भव्य वृक्ष असून त्याच्या बुंध्यालगत एक दगडी तेल घाण्यासम घडीव दगड मातीत रुतून बसलेला आहे. त्याच्या शेजारी एखाद्या खलबत्यात कुटन्यासाठी असा विशाल दगडी बत्ता असून त्याला वरच्या बाजूने लाकडी खुंटा लावण्याची गोलाकार खाच आहे. निर्णायक माहिती होत नाही तोपर्यंत या शिल्पावशेषांबाबत ठामपणे व्यक्त होता येणार नाही.

या ठिकाणाच्या पश्चिमेस एक घडीव दगडी बांधकामातील जमिनीतील पाणी टाके असून अप्रतिम शैलीतील हे चौकोनी टाके तत्कालीन स्थापत्यशैलीचे प्रतिक आहे. या भूमीगत टाक्याशेजारी संस्थानकालीन इतिहास व वैभवाचा वारसा कथन करणारी निवासी पूर्वाभिमुख वास्तू निसर्गाचा सामाना करताना दिसून येते. वापरात नसल्यामुळे काही प्रमाणात ही इमारत क्षतिग्रस्थ झाली असली तरी आपले तत्कालीन वैभव कथन करण्यास सक्षम आहे.

भिलारे कुटुंबियांनी या वारसाचे संरक्षण केले असल्याने तो इतिहास ठेवा आजही अबाधित राहिला आहे. कोणत्याही मोहाला बळी न पडता हे वैभव जतन करणे हे फार जिकरीचे काम हे कुटुंब करीत आहे याचा विशेष आनंद वाटतो. ही सर्व भिलारे यांची वैयक्तिक मालकी असलेले वारसास्थळ मला देशपांडे व भिलारे यांच्यामुळे पाहता आले व प्रकाशचित्रे घेता आली या बद्दल दोघांचेही मनापासून धन्यवाद.

© सुरेश नारायण शिंदे, भोर ([email protected])