नेपोलियन बोनापार्ट - फ्रान्सचा प्रसिद्ध सम्राट
फ्रेंच राज्यक्रांती सुरु होऊन फ्रान्सचा राजा सोळावा लुई आणि फ्रेंच जनता यांमधील वैर वाढून फ्रान्समध्ये मोठे अराजक निर्माण झाले त्याचा फायदा उचलून नेपोलियनने १७९९ साली स्वतःस फर्स्ट कान्सल हे बिरुद देऊन स्वतःस फ्रान्सचा प्रति राजा म्हणून घोषित केले.
जगाच्या इतिहासात ज्या घटना अत्यंत गाजल्या आहेत त्यापैकी एक घटना म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती व या राज्यक्रांतीच्या दरम्यान फ्रान्सचा सम्राट म्हणून उदयास आलेल्या नेपोलियन बोनापार्टचे नाव प्रसिद्ध आहे.
नेपोलियन बोनापार्टचा जन्म १७६९ साली फ्रान्सच्या कार्सिका बेटात झाला. फार लहान वयातच तो फ्रान्सच्या लष्करात सामील झाला आणि लवकरच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यास लष्करात अंमलदार हे पद मिळाले. १७९४ साली फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे मोठे बंड झाले ते मोडण्यात नेपोलियनने महत्वाची कामगिरी बजावल्याने त्याला लष्करात मोठा अधिकार प्राप्त झाला.
पुढील काळात फ्रेंच राज्यक्रांती सुरु होऊन फ्रान्सचा राजा सोळावा लुई आणि फ्रेंच जनता यांमधील वैर वाढून फ्रान्समध्ये मोठे अराजक निर्माण झाले त्याचा फायदा उचलून नेपोलियनने १७९९ साली स्वतःस फर्स्ट कान्सल हे बिरुद देऊन स्वतःस फ्रान्सचा प्रति राजा म्हणून घोषित केले.
१८०४ साली नेपोलियनने स्वतःस फ्रान्सचा राजा म्हणून घोषित करून मोठा राज्याभिषेक करवून घेतला. त्यानतंर नेपोलियनने संपूर्ण युरोप खंडावर आपला दबदबा बसवण्यास सुरुवात केली आणि युरोपनाधील अनेक राजांना त्याने आपले मंडलिक बनवले. आपला भाऊ जोसेफ बोनापार्ट यास त्याने सुरुवातीस नेपल्सचे राजपद दिले होते आणि कालांतराने त्यास नेपोलियनने स्पेनचे राजपद दिले आणि आपला दुसरा भाऊ लुई यास त्याने हॉलंडचा राजा बनवले.
नेपोलियनची मोठी बहीण इलैझा हिला त्याने लक्का नामक मोठा प्रांत जहागीर म्हणून दिला आणि आपला मानलेला पुत्र युजीन याचे लग्न त्याने मोठ्या थाटामाटात बव्हेरियाच्या राजाच्या कन्येशी करून दिले होते एवढेच नव्हे तर आपल्या मोठ्या सरदाराचा पुत्र बर्नाडोटे यास त्याने स्वीडनच्या राजपदावर बसवले होते आणि स्वतः ऑस्ट्रियाच्या राजाच्या कन्येसोबत विवाह संपन्न केला.
असे म्हटले जाते की आपल्या लग्नाच्या मुहूर्तावर त्याने आपल्या लष्करातील तब्बल सहा हजार सैनिकांची लग्ने एकाच मुहूर्तावर करवली आणि सर्वांना हजार रुपयाचा आहेर दिला होता.
अशा प्रकारे नेपोलियनने आपल्या पराक्रमाने संपूर्ण युरोप काबीज केला तरी इंग्लंड हे राज्य त्याच्या ताब्यात आले नव्हते तथापी इंग्लंडवर त्याची नजर पूर्वीपासून होती. युरोपमधील इतर राज्ये नेपोलियनसमोर झुकली असली तरी इंग्लंड मात्र नेपोलियनला फारसे महत्व देत नसल्याने नेपोलियनच्या मनात इंग्लंडबद्दल मोठा राग होता.
कालांतराने नेपोलियन आणि इंग्लंड यांच्यामध्ये ट्राफालगार येथे मोठे युद्ध झाले मात्र या युद्धात इंग्लंडने नेपोलियनला मोठी धूळ चारली. कालांतराने इंग्लंड सोबत स्पेन येऊन नेपोलियन विरोधात तब्बल पाच वर्षे युद्ध केले व या युद्धात नेपोलियनचे चाळीस हजार सैन्य ठार झाले.
या युद्धाने नेपोलियनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरीही त्याने हार न मानता आपले वीस हजार सैनिक घेऊन १८१३ साली रशियावर हल्ला केला मात्र या युद्धातही रशियातील थंडी आणि तेथील सैन्याच्या प्रतिकारामुळे नेपोलियनला मोठे नुकसान झाले आणि त्याने ही मोहीम अर्धवट सोडून फ्रान्समध्ये प्रवेश केला आणि तेथून त्याने दुसरी मोहीम उघडली. या मोहिमेत रशिया, पर्शिया आणि ऑस्ट्रिया या तीन राष्ट्रांशी सलग तीन दिवस युद्ध होऊन नेपोलियनचा दारुण पराभव झाला आणि त्याचे पन्नास हजाराहून अधिक सैन्य मारले गेले.
या युद्धानंतर मात्र नेपोलियन पुरता खजील झाला आणि त्याने स्वतःहून राजपदाचा त्याग केला आणि १८१४ साली त्याने संन्यास स्वीकारून एल्बा नामक बेटात निवास सुरु केला.
खरं तर हा संन्यास म्हणजे नेपोलियनने शत्रूच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा केलेला प्रयत्न होता कारण एकाच वर्षाने तो पुन्हा फ्रान्समध्ये आला आणि राजपदी आरूढ होऊन युरोपातील राष्ट्रांसोबत दोन हात करण्यास तयार झाला मात्र यावेळी युरोपातील सर्व राष्ट्रे एक होऊन त्यांनी नेपोलियन आणि फ्रांस विरोधात आघाडी उभारली आणि वाटर्लू च्या विस्तीर्ण मैदानावर मोठे युद्ध होऊन नेपोलियन पूर्णपणे पराभूत झाला आणि त्याने कायमस्वरूपी शरणागती पत्करली.
नेपोलियन आता पराभूत होऊन बंदी झाला असला तरी युरोपमध्ये त्याच्याविषयी फार वाईट मत नसल्याने त्यास युरोपमध्ये 'उदार शत्रू' म्हणून ओळखले जात असे. यामुळे त्यास देहदंडाची शिक्षा न सुनावता सेंट हेलिना या बेटावर सक्त पहाऱ्यात बंदिवासात ठेवण्यात आले. याच बंदिवासात दुर्दशेचे भोग झेलत १८२१ साली त्याचा मृत्यू झाला. अशाप्रकारे उत्कर्ष आणि पतन अशा दोन्ही अवस्था उच्च प्रमाणात पाहिलेल्या नेपोलियनचा अंत करुण असला तरी युरोप खंडाच्या इतिहासातील एक शूर सेनानी म्हणून त्याचे नाव आजही युरोपच्या जनमानसात कायम आहे.