मल्हारराव होळकर - इंदूरच्या होळकर राजघराण्याचे संस्थापक

१७३२ साली पेशव्यांनी माळव्यावर स्वारी केली त्यावेळी मल्हाररावांनी या युद्धात मोठा पराक्रम केला.

मल्हारराव होळकर - इंदूरच्या होळकर राजघराण्याचे संस्थापक
मल्हारराव होळकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठेशाहीत अनेक कर्तबगार लोक वेगवेगळ्या काळात उदयास आले व यापैकी ज्यांनी विशेष असे नाव कमावले त्यापैकी एक म्हणजे इंदूरच्या होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर.

मल्हारराव होळकर यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील होळ असल्याने या गावाच्या नावावरून त्यांना होळकर हे आडनाव प्राप्त झाले होते. १६९३ साली धनगर समाजातील एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला व त्यांचे मल्हारी असे नामकरण करण्यात आले. बालवयातच म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षीच मल्हाररावांचे पितृछत्र हरपल्याने त्यांचे मामा त्यांना त्यांच्या आईचे माहेर असलेल्या खानदेशात घेऊन गेले. 

मल्हारराव यांच्या मामांचा मेंढरांचा पिढीजात व्यवसाय होता व मल्हाररावांनी मामांच्या मेंढरांची देखभाल करण्याचे काम लहानपणापासूनच सुरु केले. मल्हारराव हे जन्मतःच खूप हुशार व कुशाग्र बुद्धीचे असल्याने सर्व काम ते अत्यंत चोखपणे करीत व त्यामुळे मामाच्या कुटुंबात आणि गावात त्यांचे खूप कौतुक होत असे.

एके दिवशी मल्हारराव मेंढरे चारावयास भर उन्हात रानात गेले असता एका मोठ्या पाषाणावर विश्रांतीसाठी बसले असता त्यांना सावली मिळावी यासाठी एका भल्या मोठ्या नागाने त्यांच्या डोक्यावर फणा धरल्याचे गावातील लोकांनी पाहिले आणि हा नक्कीच कुणीतरी असामान्य  मुलगा आहे अशी सर्वांची खात्री झाली.

असाच काही काळ लोटला आणि पारंपरिक व्यवसायावर समाधान मानण्यापेक्षा काहीतरी मोठे कार्य करून दाखवण्याची इच्छा मल्हाररावांच्या मनात आली आणि ते नंदुरबार येथे जाऊन मराठी साम्राज्याचे सेनापती दाभाडे यांचे सरदार कदम बांडे यांस जाऊन भेटले आणि त्यांच्या सैन्यात सैनिक म्हणून रुजू झाले. मल्हाररावांची कर्तबगारी पाहून त्यांच्या हाताखाली पंचवीस स्वारांचे पथक देण्यात आले.

गुजरात येथे जेव्हा मराठ्यांची स्वारी झाली त्यावेळी दाभाडे व कदम बांडे यांच्या सैन्यात मल्हारराव आपल्या पंचवीस स्वारांसह गेले होते त्याचवेळी पहिले बाजीराव पेशवे हे सुद्धा आपल्या सैन्यासह माळव्याच्या स्वारीवर निघाले होते आणि दोन्ही सैन्याची गाठ तापी नदीच्या किनारी पडून एका छोट्या कारणावरून पेशव्यांच्या व कदम बांडे यांच्या सैन्यात वाद निर्माण झाला त्यावेळी मल्हाररावांनी युक्तीने हा वाद मिटवला.

ही माहिती बाजीराव पेशवे यांच्या कानावर गेली त्यावेळी त्यांनी कदमांशी बोलणी करून मल्हाररावांना आपल्या सैन्यात घेऊन त्यांच्या हाताखाली पाचशे स्वरांचे पथक दिले आणि सरदार हे पद दिले आणि थोड्याच काळात सैन्याच्या खर्चाकरिता बारा पारगण्यांची जहागीर मल्हाररावांना देण्यात आली.

१७३२ साली पेशव्यांनी माळव्यावर स्वारी केली त्यावेळी मल्हाररावांनी या युद्धात मोठा पराक्रम केला. मोगल सुभेदार दायबहादूर हा या युद्धात मारला गेला. या युद्धात मराठ्यांना मोठा मुलुख मिळाला मात्र मल्हाररावांनी मोठा पराक्रम केल्याने पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांना सांगून मिळालेल्या मुलुखाचा बारावा भाग मल्हाराव यांना दिला.

मल्हाररावांनी पुढे पेशव्यांकडून इंदूर आणि महेश्वर ही दोन स्थळे मागून घेतली व या सर्व मुलुखाचा कारभार मल्हारराव होळकर हेच पाहू लागले. १७३८ साली निजाम उल्मुल्क दिल्लीच्या बादशहाच्या वतीने मराठ्यांवर चालून आला त्यावेळी मराठ्यांच्या सैन्याचे प्रमुखपद मल्हारराव यांच्याकडे होते व त्यांनी मोगलांचा दारुण पराभव करून नर्मदा आणि चंबळ या नद्यांच्या मधील प्रदेश ताब्यात घेऊन तो मराठ्यांना मिळवून दिला.

१७३९ साली चिमाजी अप्पा यांनी वसईच्या पोर्तुगीजांवर मोहीम काढली असता मल्हारराव यांनी सुद्धा या मोहिमेत मोठा पराक्रम केला होता.

मल्हारराव वसईच्या स्वारीत असताना नादीरशहावर मराठ्यांनी मोहीम काढली त्यावेळी मल्हारराव वसईतून आपले सैन्य घेऊन नादीरशहावर जाणाऱ्या सैन्यास मिळाले आणि या मोहिमेत संपूर्ण माळवा प्रांत मराठ्यांच्या स्वाधीन झाला यानंतर माळव्यातील मोहिमेत केलेल्या पराक्रमामुळे तेथील ७४ लाख उत्पन्नाचा प्रदेश मल्हारराव यांना प्राप्त झाला आणि याच दरम्यान होळकरांनी इंदूर शहरास आपल्या मुख्य स्थळाचा दर्जा दिला.

१७५७ साली मराठ्यांनी लाहोरवर रघुनाथराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली हल्ला केला त्यावेळी मल्हारराव त्यांच्या सोबत होते आणि या युद्धात त्यांनी अग्रगण्य राहून अहमदशाह अब्दालीच्या सरदाराला लाहोरमधून हुसकावून लावले होते. या स्वारीमुळेच अब्दालीने पुढे हिंदुस्थानवर चाल केली व यानंतर पानिपतचे मोठे युद्ध घडले.

पानिपतच्या युद्धात मल्हाररावांनी आपल्या अनुभवाने युद्ध कसे करावे असा सल्ला देण्याचा प्रयत्न केला मात्र सदाशिवराव भाऊंनी हा सल्ला अमलात आणला नाही असे काही इतिहासकार म्हणतात व त्यामुळे मराठ्यांना या युद्धात मोठे नुकसान सोसावे लागले.

इसवी सन १७६५ साली वयाच्या ७२ व्या वर्षी आणि अदमासे चाळीस वर्षे मोठा पराक्रम व कर्तृत्व गाजवून मल्हारराव यांचे निधन झाले. मल्हारराव होळकरांच्या मुलुखाचे उत्पन्न त्यांच्या निधनावेळी एक कोटी रुपये होते आणि त्यांच्या खजिन्यात सोळा कोटी शिल्लकेत होते. मल्हारराव यांना इंदूरच्या होळकर संस्थानाचे संस्थापक म्हणून आजही आदराचे स्थान आहे.