कबड्डी खेळाची माहिती संपूर्ण मराठीत

कबड्डी हा खेळ सामूहिक रीत्याच खेळता येतो व यासाठी खेळाडूंचे दोन भाग करावे लागतात जे एकमेकांविरोधात खेळतात.

कबड्डी खेळाची माहिती संपूर्ण मराठीत
कबड्डी

भारतातील एक प्रसिद्ध असा सामूहिक खेळ म्हणजे कबड्डी. कबड्डी खेळाचे वैशिट्य म्हणजे यामध्ये खेळाडू सोडले तर दुसऱ्या कुठल्या साधनांची आवश्यकता नसते व त्यामुळे हा खेळ सर्व आर्थिक स्तरातील खेळाडूंमध्ये अत्यंत प्रचलित आणि प्रसिद्ध आहे.

कबड्डी खेळाचा उगम हा दक्षिण भारतात झाला असे तज्ज्ञांचे मत आहे व तेथून या खेळाचा प्रचार उत्तरेस हळू हळू होत गेला. खेळ तोच असला तरी प्रादेशिक स्तरावर त्याची नावे बदलली. भारताच्या पश्चिम भागात हा खेळ हुतूतू म्हणून प्रसिद्ध आहे तर दक्षिण भागात कबड्डी म्हणून प्रसिद्ध आहे. या खेळास हुडसाब, गुडगुडी, डुडु, सुरकोन, किलासर, दमदम, कपटी, कबडी, चंडाजी, सुरबड्डी अशी विपुल नावे भारताच्या विविध भागांत प्रचलित आहेत.  

कबड्डी हा खेळ दक्षिण भारतात प्रथम सुरु झाला असे तज्ज्ञांचे मत असल्याने कबड्डी खेळाची उत्पत्ती ही प्राचीन असावी आणि मध्ययुगात त्याचा प्रसार संपूर्ण भारतात झाला असावा कारण इसवी सनाच्या सतराव्या व अठराव्या शतकातील गाजलेले कवी भूषण यांनी बुंदेलखंडचा राजा छत्रसाल यांच्यावर एक काव्य लिहिले होते त्यामध्ये त्यांनी या खेळाचा उल्लेख केला आहे यावरून हे समजते की सतराव्या शतकात कबड्डी खेळाचा प्रचार मध्य आणि उत्तर भारतातही झाला होता.

कबड्डी हा खेळ खेळण्यासाठी युक्ती, शक्ती, सांघिक वृत्ती आणि चपळता या गुणांचा समावेश खेळाडूच्या अंगी असणे आवश्यक असते. हा खेळ सामूहिक रीत्याच खेळता येतो व यासाठी खेळाडूंचे दोन भाग करावे लागतात जे एकमेकांविरोधात खेळतात. खेळाडूंची संख्या ही कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त वीस मैदानाच्या क्षमतेनुसार ठरवली जाते व ही संख्या सम असायला हवी कारण खेळाडू अर्धे अर्धे विभागले जात असल्याने विषम संख्या असल्यास एका गटात एक खेळाडू कमी पडू शकतो.

कबड्डी खेळासाठी लागणारे मैदान हे मोकळे, लांब व रुंद असावे लागते आणि मैदानाच्या मध्यभागी दोन्ही गटातील खेळाडूंना उभे राहण्यासाठी हद्द आखून दिली जाते आणि ही तयारी झाल्यावर दोन्ही टीममधील खेळाडू हद्दीच्या दोन्ही दिशांस उभे राहतात आणि जेव्हा प्रथम एका टीमकडे डाव येतो त्यावेळी एका गटातील एक खेळाडू समोरील गटाच्या हद्दीत कबड्डी कबड्डी असे म्हणत प्रवेश करतो व हा शब्द त्याला त्या हद्दीत असेपर्यंत सतत पुकारावा लागतो कारण या खेळाचा तसा नियमच आहे. खेळाडूने दुसऱ्या हद्दीत प्रवेश केल्यावर त्याला एका दमात दुसऱ्या गटातील खेळाडूंपैकी शक्य तेवढ्या लोकांना हात लावून बाद करावे लागते आणि जे खेळाडू बाद होतात ते त्या टीममधून बाहेर पडतात. मात्र खेळाडूंना बाद करताना या खेळाडूंनी समोरील खेळाडूस धरून आपल्याच हद्दीत पकडून ठेवले तर तो खेळाडूच बाद केला जातो. 

अशा प्रकारे दोन्ही गटांना एकामागून एक अशी खेळाडूंना बाद करण्याची संधी मिळते व अशाप्रकारे सर्वप्रथम ज्या टीममधील सर्व गडी बाद होतात त्या टीमची हार घोषित केली जाते.

कबड्डीमध्ये जर एका गटातील खेळाडूने दुसऱ्या गटातील एका खेळाडूस बाद केले तर दुसऱ्या गटातील खेळाडूस बाहेर जावे लागते अशावेळी दुसऱ्या गटातील खेळाडूने पहिल्या गटातील एका खेळाडूस बाद केले तर त्याला बाहेर न पाठवण्याच्या बोलीवर दुसऱ्या गटातील बाद झालेल्या खेळाडूस पुन्हा एकदा खेळात प्रवेश करता येतो.