कुस्ती अर्थात मल्लविद्या - एक मर्दानी खेळ

कुस्तीचे फायदे म्हणजे यामुळे अंगी चपळता येते, शरीर रक्षण होते, स्नायू बळकट होतात, वीरश्री, तेज आदी अनेक गुण प्राप्त होतात. 

कुस्ती अर्थात मल्लविद्या - एक मर्दानी खेळ

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतातील एक मर्दानी खेळ म्हणजे मल्लविद्या अथवा कुस्ती. या खेळाची उत्पत्ती प्राचीन असून पुराणे, महाभारत, रामायण आदी इतिहासरूप साधनांत मल्लयुध्दाचा निर्देश अनेकदा करण्यात आला आहे. रामायणातील वाली सुग्रीव यांचे आणि रामपुत्र लव आणि रामबंधू शत्रुघ्न यांचे मल्लयुद्ध, महाभारतातील भीमाचे जरासंध, किचक, हिडिंब आदींसोबतचे मल्लयुद्ध, कृष्णाचे व बलरामाचे कंस व इतरांशी झालेले मल्लयुद्ध यांची वर्णने वाचून ही कला प्राचीन काळातही किती प्रसिद्ध होती हे समजते. 

स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सुद्धा उत्तम मल्लविद्यापटू असल्याचे उल्लेख ऐतिहासिक साधनांत आढळतात. किल्ले रायगडावर मल्लविद्येची कसरत करण्यासाठी वापरला जाणारा एक लोहस्तंभ सुद्धा आजही पाहावयास मिळतो. यावरून स्वराज्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लविद्या या साहसी खेळास उत्तेजन दिले होते हे लक्षात येते.

कुस्तीस हिंदी भाषेत कुश्ती तर इंग्रजीत wrestling या नावाने ओळखले जाते. कुस्तीचे फायदे म्हणजे यामुळे अंगी चपळता येते, शरीर रक्षण होते, स्नायू बळकट होतात, वीरश्री, तेज आदी अनेक गुण प्राप्त होतात. 

कुस्ती अथवा मल्लयुद्ध खेळणाऱ्या खेळाडूस कुस्तीपटू, कुस्तीगीर अथवा मल्लपटू म्हणून ओळखले जाते आणि संपूर्ण भारतात कुस्तीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी निर्माण झालेले आखाडे आहेत.

मल्लविद्येची ही परंपरा एकोणिसाव्या शतकात बाळंभट देवधर यांनी कायम ठेवल्याचे संदर्भ आढळतात. त्यांनी हैदराबादच्या निजामाच्या राज्यात असलेल्या अजिंक्य अशा अल्ली आणि गुलाम या दोन पहलवानांना चारी मुंड्या चीत करून मराठ्यांचे मल्लविद्येतील नाव मोठे केले होते. 

प्राचीन काळी मल्लविद्येचे जे चार प्रसिद्ध प्रकार होते त्यांना हनुमंती, भीमसेनी, जांबुवंती आणि जरासंधी अशी नावे होती व यातील हनुमंती मल्लविद्या काळाच्या ओघात लोप पावली होती मात्र बाळंभट यांनी सप्तशृंगीच्या पर्वतावर जाऊन कठोर तप केले आणि या विद्येचे रहस्य जाणून घेतले व ती पुन्हा एकदा प्रचलित केली.

आधुनिक काळात कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे खंडेराव गायकवाड यांनी कुस्ती या खेळाचा प्रचार व प्रसार केलाच याशिवाय ते स्वतः उत्तम कुस्तीपटू होते.

सध्याच्या काळात मल्लविद्येस कुस्ती या नावानेच अधिक ओळखले जाते आणि पूर्वी कुस्तीचा वापर युद्धात, द्वंद्वयुद्धात अथवा खेळातही होत असे मात्र सध्या कुस्ती बहुतांशी फक्त खेळातच वापरली जाते आणि भारतात कुस्तीची जी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा होते त्यास हिंदकेसरी या नावाने ओळखले जाते व ही स्पर्धा जिंकणाऱ्यास हिंदकेसरी हा मनाचा किताब प्रदान केला जातो व या स्पर्धेचे सन्मानचिन्ह गदा हे आहे.