उद्धव - कृष्णाचा बंधू व सखा

उध्दवाचे वैशिट्य म्हणजे तो अतिशय बुद्धिवान आणि नीतिमान असल्याने कृष्ण कुठल्याही कार्यात सर्वप्रथम उद्धवाचाच सल्ला घेत असे.

उद्धव - कृष्णाचा बंधू व सखा
उद्धव

श्रीकृष्णचरित्राचे वाचन करताना अनेकदा उद्धव हे नाव आपल्या वाचनात येते. प्रामुख्याने कृष्ण व उद्धव यांचे संवाद अतिशय बोधपर आहेत मात्र कृष्णचरित्रातील उद्धव कोण हे जाणून घेतल्यावरच त्याचे कृष्णचरित्रातील महत्व खऱ्या अर्थी समजू शकेल.

सोमवंशाच्या यादव कुळातील राजा वासुदेव याचा पुत्र म्हणजेच श्रीकृष्ण हे आपणास माहित आहेच. वासुदेवास एक भाऊ होता व त्याचे नाव देवभाग असे होते आणि या देवभागाच्याच पुत्राचे नाव उद्धव होते. देवभागाच्या पत्नीचे आणि उद्धवच्या आईचे नाव कंसा होते.

यावरून हे लक्षात येईल की उद्धव हा कृष्णाचा चुलत बंधू होता मात्र तो कृष्णाहून वयाने थोडा मोठा होता अशी माहिती साधनांत मिळते.

उध्दवाचे वैशिट्य म्हणजे तो अतिशय बुद्धिवान आणि नीतिमान असल्याने कृष्ण कुठल्याही कार्यात सर्वप्रथम उद्धवाचाच सल्ला घेत असे. कृष्ण व उद्धव यांचे नाते हे फक्त बंधू म्हणूनच नसून ते एकमेकांचे उत्तम मित्र सुद्धा होते आणि उद्धव हा कायम कृष्णासोबत असे आणि या दोघांनी एकमेकांसोबत मोठा काळ व्यतीत केल्याने दोघांमध्ये जे संवाद झाले त्याची नोंद धर्मग्रंथानी घेतली आहे.

कृष्ण हा वासुदेव व देवकी यांचा पुत्र असला तरी त्याचे संगोपन गोकुळचा राजा नंद आणि त्याची पत्नी यशोदा यांनी केला होता मात्र कालांतराने कृष्णाने गोकुळ सोडून मथुरेस जाण्याचा निश्चय केला त्यावेळी नंद व यशोदा अत्यंत दुःखी झाले मात्र कर्तव्यपूर्ती साठी विष्णू अवतार असलेल्या कृष्णास गोकुळाचा त्याग करणे क्रमप्राप्त होते.

कृष्णाच्या जाण्याने नंद व यशोदा विरह दुःखात बुडाले होते व कृष्णास त्यांची काळजी लागली होती यावेळी कृष्णाने नंद आणि यशोदा यांची समजूत काढण्यासाठी उध्दवालाच गोकुळास पाठवले होते आणि उद्धवने गोकुळास जाऊन नंद व यशोदा यांचा बोध केला आणि त्यांच्या विरह दुःखाचे समाधान केले यावरून हे लक्षात येईल की कृष्णास जे विचार मांडायचे होते ते उध्दवास बरोबर समजत असत.

उत्तरकाळात कृष्णाने जेव्हा अवतारसमाप्तीचा निश्चय केला त्यावेळी उद्धवाने त्याच्यासहित निजधामास जाण्याचा हट्ट धरला मात्र कृष्णाने त्यास सांगितले की तुझ्या ज्ञानाची गरज माझ्यानंतर येथील सामान्य जनांना निश्चित भासणार आहे त्यामुळे तू माझ्यासहित निजधामास न येता या भूतलावर राहून लोकांना ज्ञान आणि नीतीचे शिक्षण दे. कृष्णाने समाजावल्यावर उद्धवने बदरी वनात प्रस्थान केले व आपल्या अंतकाळापर्यंत त्याने तेथे राहून लोकांस मार्गदर्शन केले.