थॉमस पार - १५२ वर्षे जगलेला माणूस
१०० वर्षांहून अधिक जगलेल्या एका व्यक्तीची नोंद मध्ययुगात घेतली गेली होती आणि ही व्यक्ती तब्बल १५२ वर्षे जगली होती. ही घटना मध्ययुगातील असून त्या व्यक्तीचे नाव थॉमस पार असे होते.

आपल्या पृथ्वीस मृत्युलोक म्हटले जाते कारण या ठिकाणी असलेली कुठलीही सजीव वस्तू नश्वर आहे मग तो मनुष्य असो, प्राणी असो, पक्षी असो, जलचर असो वा वनस्पती असो प्रत्येकास जगण्यास एक ठराविक कालावधी मिळतो.
पृथ्वीतलावरील मनुष्य हा बुद्धीने सर्वात हुशार प्राणी व या बुद्धीच्या बळावर त्याने अनेक शोध लावले मात्र मृत्यवर मात करण्याचा शोध त्याला लावता आला नाही कारण निसर्ग नियमाच्या विरोधात जाणे अतिशय कठीण कार्य असते.
प्रत्येक प्राणी आणि वनस्पती यांची एक विशिष्ट जीवनमर्यादा आहे व या मर्यादेतच त्यांना आपल्या जीवनाचा आस्वाद घेता येतो आणि मनुष्याची कमाल जीवनमर्यादा ही फार पूर्वीपासून १०० वर्षे एवढी मानली गेली आहे व त्यामुळेच आपण आजही कुणास जन्मदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना जीवेत शरद शतम् असे म्हणतो म्हणजे त्या माणसाने आयुष्याची शंभरी गाठावी अशी सदिच्छा आपण व्यक्त करतो मात्र सध्याच्या युगात मनुष्य खरोखर १०० वर्षे जगणे शक्य आहे का? अर्थात हे अशक्य नाही कारण वयाची ९० वर्षे ते १०० वर्षे गाठलेली अनेक माणसे आपण या युगातही पाहिली आहेत अथवा पाहत आहोत मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे.
आपल्या भारतात सध्या मनुष्याचे सरासरी वयोमान ७० वर्षे मानले जाते म्हणजे मनुष्य ७० वर्षे जगला म्हणजे त्याने सरासरी आयुष्य जगले असा याचा अर्थ होतो आणि वयाच्या ७० हुन अधिक जो माणूस जगतो तो म्हणजे त्याला मिळालेला बोनस आणि ७० वर्षांच्या आत ज्याचा मृत्यू होतो तो अकाली गेला असे समजले जाते.
मात्र कधीकधी मनुष्यप्राण्याने आयुष्य जगण्याचे अनेक ठोकताळे धुळीस मिळवलेले दिसून येतात. वयाची शंभरी पार करूनही जगलेल्या अनेक नागरिकांची नोंद जागतिक स्तरावर घेतली जाते. आधुनिक युगात जीवनमान तपासणे जन्माच्या नोंदीवरून शक्य असल्याने अनेक शंभरी पार केलेल्यांची नोंद केली गेली आणि आधुनिक काळातील सर्वात जगलेल्या ज्ञात व्यक्तींची जी यादी करण्यात आली त्यामध्ये तब्बल १२२ वर्षे जगलेल्या जेनी काल्मेण्ट (Jeanne Calment) यांचे नाव सर्वप्रथम आहे.
मात्र याहूनही अधिक जगलेल्या एका व्यक्तीची नोंद मध्ययुगात घेतली गेली होती आणि ही व्यक्ती तब्बल १५२ वर्षे जगली होती. ही घटना मध्ययुगातील असून त्या व्यक्तीचे नाव थॉमस पार असे होते.
थॉमस पार याचा जन्म इसवी सन १४८३ साली इंग्लंड येथे झाला होता. त्याचा स्वतःचा एक व्यवसाय होता व या व्यवसायात त्याने शेवटपर्यंत आपले मन रमवले होते. १५२ वर्षांचा काळ हा साधासुधा नाही जर आपण २५ वर्षांनी एक पिढी बदलते असे समजले तर त्याने एकूण सहा पिढ्या त्याच्या आयुष्यकाळात पहिल्या होत्या.
थॉमस पार हा त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्या काळात इंग्लंडमध्ये खूप प्रसिद्ध झाला होता व त्यामुळे त्यास ओल्ड टॉम पार या नावाने ओळखत. मनुष्याची शेवटची अवस्था म्हणजे वृद्धावस्था तशी जिकिरीची असते आणि या काळात मनुष्य सर्वच बाजूनी थकतो मात्र थॉमस पार हा त्याच्या वृद्धावस्थेत सुद्धा ठणठणीत होता आणि त्याच्या गावातील मोकळी हवा, काम आणि थोडा व्यायाम यावर त्याचा भर असल्याने तो अगदीच निरोगी होता आणि त्याचे खाणे सुद्धा प्रचंड असे.
पाहता पाहता थॉमस पारची कीर्ती लंडन पर्यंत गेली आणि त्यास लंडन येथे बोलावण्यात आले आणि त्याची तपासणी करण्यात आली यावेळी त्याचे वय १५० वर्षांहून अधिक निघाले. वयाच्या १५२ व्या वर्षी थॉमस पारचा लंडन येथेच मृत्यू झाला मात्र तो वृद्धपकाळाने नव्हे तर अति खाण्यामुळे त्याच्या शरीरातील रक्ताची मात्रा दुप्पट झाली आणि त्यामुळे त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला अन्यथा तो अजून काही वर्षे जगण्याची शक्यता होती.