दुर्गादेवीचा दुष्काळ - सलग १३ वर्षे पडलेला महाभयंकर दुष्काळ

दुर्गादेवीचा दुष्काळ हा महाराष्ट्रात व कर्नाटक, आंध्र आदी राज्यात इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या अखेरीपासून पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे १३९६ ते १४०७ असा तब्बल १३ वर्षे पडलेला महाभयंकर दुष्काळ.

दुर्गादेवीचा दुष्काळ - सलग १३ वर्षे पडलेला महाभयंकर दुष्काळ
दुर्गादेवीचा दुष्काळ

पृथ्वीवरील जीवसृष्टीस जिवंत राहण्यासाठी जे तीन महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे हवा, अन्न आणि पाणी. हे तीनही घटक विधात्याने सृष्टीच्या निर्मितीपासूनच येथील प्राणिमात्रांस विपुल प्रमाणात उपलब्ध करून ठेवले आहेत. हवा, पाणी आणि अन्न यापैकी एक जरी घटक प्राण्यांना मिळाला नाही तर त्याचा मृत्यू निश्चित असतो. या तीन घटकांपैकी हवा हा असा घटक आहे तो नसल्यास मनुष्य आणि इतर प्राणी काही सेकंदात मरून जातील, यानंतर महत्वाचा घटक येतो तो म्हणजे पाणी व हा घटक न मिळाल्यास मनुष्य वा इतर प्राणी जास्तीत जास्त तीन दिवस जगू शकेल आणि तिसरा घटक म्हणजे अन्न आणि हा घटक जर मिळाला नाही तर मनुष्य आणि इतर प्राणी जास्तीत जास्त ४० ते ७० दिवस जगू शकतील मात्र यावेळी त्यांना पाणी व हवा सतत मिळणे आवश्यक असते.

या तीन घटकांपैकी हवा हा असा घटक आहे जो कायमच स्थिर असतो आणि गेल्या काही वर्षांत लोकसंख्या पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली तरी हवेची उणीव आपल्याला जाणवली नाही मात्र अन्न आणि पिण्याचे पाणी हे दोन असे घटक आहेत जे मिळवण्यासाठी प्राण्यांना थोडे प्रयत्न करावे लागतात आणि वाढती लोकसंख्या आणि निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा इतर अनेक घटकांमुळे अन्न व पाण्याच्या उपलबध्दतेत कमी अधिक प्रमाणात फरक पडत असतो आणि ही गोष्ट आत्ताची नव्हे तर फार पूर्वीपासून होत आली आहे.

ज्यावेळी काही निर्सगनिर्मित अथवा मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे अन्न व पाण्याची कमतरता निर्माण होते त्यास दुष्काळ म्हणून ओळखले जाते व असे दुष्काळ विध्वंसक असतात. प्राचीन काळापासून लोकांना दुष्काळाचा विदारक अनुभव असल्याने लोकांनी अन्न व पाण्याची भविष्यातील तजवीज आधीच करून ठेवण्यास सुरुवात केली व सध्या दिसून येणारी धरणे आणि कोठारे ही त्याचीच द्योतक आहेत.

हे झाले आधुनिक युगातील उदाहरण मात्र मध्ययुगात जेव्हा निसर्गाच्या कोपापेक्षा मानवनिर्मित युद्ध, कुशासन, अनागोंदी आदी अनेक गोष्टींमुळे त्या काळातील लोकांना सुद्धा दुष्काळाचा अनेकदा सामना करावा लागला व यापैकी सर्वात प्रसिद्ध असा दुष्काळ म्हणजे दुर्गादेवीचा दुष्काळ.

दुर्गादेवीचा दुष्काळ हा महाराष्ट्रात व कर्नाटक, आंध्र आदी राज्यात इसवी सनाच्या चौदाव्या शतकाच्या अखेरीपासून पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे १३९६ ते १४०७ असा तब्बल १३ वर्षे पडलेला महाभयंकर दुष्काळ होता आणि त्याने महाराष्ट्राच्या इतिहासात व भूगोलात मोठी उलथापालथ केली होती.

त्याकाळी दक्षिणेत बहामनी हे मुस्लिम धर्मीय राज्य प्रबळ होते आणि याच काळात म्हणजे १३९६ पूर्वी येथे बंड, लढाया, लुटालूट यांचे प्रस्थ माजले होते. परकीय आक्रमणे कायम सुरु होती व त्यामुळे राज्यव्यवस्था कोलमडून पडली आणि आणि कृषी आणि इतर व्यापार ठप्प पडले. याचा अर्थ ही त्या काळातील एक आर्थिक मंदी होती आणि लोकांकडे कृषिकार्य करण्याकरिता पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने जनतेस अन्न मिळणे कठीण होऊन बसले आणि मग सुरु झाले ते न भूतो ना भविष्यती असे स्थलांतर. दुर्गादेवीच्या दुष्काळात लाखो माणसे मरण पावल्याचे संदर्भही आढळतात.

याच दुष्काळात बहामनी राज्यातील एक कारकून दामाजीपंत यांनी राजाविरोधात बंड करून सरकारी धान्याची कोठारे फोडून त्यातील अन्न जनतेस मोफत वाटल्याचे संदर्भ आढळतात. दुर्गादेवीचा दुष्काळ हा महाराष्ट्राच्या संस्कृती स्थित्यंतराचा एक मोठा काळ होता. या दुष्काळापासून बोध घेऊन पुढील राज्यकर्त्यांनी आपत्कालीन स्थितीत अन्न व पाण्याची आगाऊ साठवणून करून ठेवण्यास सुरुवात केली व हळूहळू या पद्धतीत सुधारणा घडून दुष्काळाची भीती कमी होत गेली.

जुनी माणसे निसर्गास जपूनच आपत्कालीन साठवणूक करत मात्र आधुनिक युगात बेसुमार जंगलतोड, खाणकाम, कारखानदारी, शहरीकरण आदींच्या माध्यमातून आपण निसर्गाचा व संसाधनांचा ऱ्हास करीत आहोत त्यामुळे निसर्गाचा प्रकोप वेगवेगळ्या रूपातून जगावर होताना दिसून येत आहे. अतिवृष्टी, वादळ, भूकंप, त्सुनामी, अवर्षण, कडाक्याची थंडी, उष्णतेची लाट आदी सर्व एक प्रकारचे दुष्काळाचं आहेत व यातून वाचण्यासाठी फक्त अन्न आणि पाण्याची साठवणूक करणे उपयोगाचे नाही तर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबवणे सुद्धा आवश्यक आहे नाहीतर ज्या मानवजातीच्या विकासासाठी निसर्गाची अपरिमित हानी सुरु आहे ती मानवजात सुद्धा येत्या काही वर्षांत डायनोसॉर सारखीच नामशेष होण्याची भीती अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.