मयूर सिंहासन - मोगलांचे तख्त

मोगल दरबारात त्याकाळी एकूण सात सिंहासने असली तरी त्यापैकी मुख्य सिंहासन हे मयूर सिंहासन हेच होते व त्याचे स्थान दिवाण ए आम येथे होते

मयूर सिंहासन - मोगलांचे तख्त
मयूर सिंहासन

भारतीय इतिहासात शासकांना जसे महत्व होते तेवढेच शासकांनी वापरलेल्या वस्तुंना होते. कालौघात अनेक मौल्यवान वस्तू परचक्रात भारतातून नाहीशा झाला व यातील काही आजही परदेशांत पाहावयास मिळत असल्या तरी काहींचा तर आजही थांगपत्ता लागणे अशक्य झाले आहे.

भारतातील मोगल साम्राज्याच्या काळातील अशीच एक मौल्यवान वस्तू म्हणजे मोगलांचे प्रसिद्ध मयूर सिंहासन. मुळात मयूर सिंहासन हे या सिंहासनाचे भारतीय नाव असले तरी त्याचे मूळ नाव होते तख्त ई तौस. या सिंहासनास मयूर सिंहासन हे नाव पडण्याचे कारण म्हणजे सिंहासनाच्या मेघडंबरीच्या वर सुवर्ण धातूचा व रत्नजडित असा मयूर अर्थात मोर बसवण्यात आला होता. 

सुवर्ण धातूने बनवलेल्या या मोराच्या पिसाऱ्यात निळ्या रंगाचे नीलमणी होते आणि इतर अनेक वेगवेगळ्या रंगांचे मणी बसवून हुबेहूब मोरपंखांच्या रंगांचा पिसारा तयार केला गेला होता. मोराचे शरीर सोन्याचे असले तरी त्यावर अनेक रत्ने जडवण्यात आली होती. मोराच्या वक्षास एक मोठे माणिकरत्न जडवण्यात आले होते आणि पिवळ्या रंगाचे मोती अडकवण्यात आले होते. मोराच्या दोन्ही बाजूना तेवढ्याच उंचीचे दोन सुवर्ण पुष्पगुच्छ बसवण्यात आले होते आणि त्या पुष्पगुच्छामध्ये रत्नाची फुले तयार करण्यात आली होती. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते या सिंहासनावर एक नव्हे तर एकूण दोन मोर होते.

मोगल दरबारात त्याकाळी एकूण सात सिंहासने असली तरी त्यापैकी मुख्य सिंहासन हे मयूर सिंहासन हेच होते व त्याचे स्थान दिवाण ए आम येथे होते. या सिंहासनाची लांबी सहा फूट आणि रुंदी चार फूट होती.

मयूर सिंहासनाची निर्मिती तैमूरलंग याच्या काळात सुरु झाली व त्याचे काम शहाजहानच्या काळात पूर्ण झाले असे म्हणतात. मोगल राज्याच्या समृद्धीच्या काळात या सिंहासनास जो मान होता तो मोगल राज्याच्या अस्तकाळात नाहीसा झाला आणि १७३९ साली इराणचा बादशाह नादिरशहा याने मोगलांवर हल्ला करून त्यांचा पराजय केला आणि राज्यात खूप मोठी लूट केली आणि अनेक मौल्यवान चीजवस्तू आपल्यासहित इराण येथे घेऊन गेला व त्यामध्ये मयूर सिंहासनाचा सुद्धा समावेश होता.

इंग्रजांच्या काळात मयूर सिंहासन शोधण्याची मोहीम झाली होती व इराण देशातील तेहरान येथील राजवाड्यात ब्रिटिशांनी मयूर सिंहासनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील सिंहासन आणि मयूर सिंहासन यांमध्ये खूप फरक असल्याचे दिसून आले व त्यावरून नादीरशहाने मयूर सिंहासन नष्ट करून त्याचा काही भाग इराण येथील सिंहासनास जोडला असावा असा ब्रिटिशांनी निष्कर्ष काढला मात्र तरीसुद्धा हा निष्कर्ष ठाम नव्हता आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंप्रमाणेच मयूर सिंहासनाचे गूढ आजही गूढच राहिले आहे.