देवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच

कशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या वेगळ्या आकाराने तो पाहताक्षणीच पर्यटकांना आकर्षित करून घेतो. सहसा आपण जे बीच पाहतो ते जमिनीस समांतर असतात मात्र देवघळी बीच हा मूळ जमिनीपासून अदमासे ४० मीटर खोल असून एक येथे पोहोचण्यासाठी कडा उतरून खाली जावे लागते. कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे.

देवघळी कशेळी - महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

कोकण म्हणजे निसर्गाला पडलेलं सुंदर स्वप्न असे म्हणतात ते अयोग्य नाही. पश्चिमेस अथांग समुद्र व पूर्वेस अभेद्य सह्याद्री व मध्ये डोंगर, दऱ्या, जंगले व नद्यांच्या सहवासात वसलेले कोकण हे पर्यटकांचे कायमच आकर्षणस्थान राहिले आहे.

कोकणास ७०० किलोमीटर इतका विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे व या समुद्र किनाऱ्यावर अनेक बीचेस पर्यटकांना मोहित करीत असतात. कोकणातील काही बीच अत्यंत प्रसिद्ध आहेत व काही अत्यंत अपरिचित. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथील देवघळी बीच सुद्धा काही वर्षांपूर्वी फारसा परिचित नव्हता मात्र येथील निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडून पर्यटकांची पावले येथेही वळायला लागली आहेत.

कशेळी हे गाव मुंबईपासून ३६२ किलोमीटर तर पुण्यापासून ३२७ किलोमीटर अंतरावर आहे. कशेळी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रत्नागिरीच्या दिशेने शेवटचे गाव. रत्नागिरी पासून कशेळी ३३ किमी आणि राजापूर पासून ३४ किमी अंतरावर वर आहे. लोकसंख्येने फार मोठे नसलेले कशेळी हे कोकणातील एक टुमदार गाव असून कनकादित्य सूर्य मंदिर व देवघळी बीच ही येथील प्रमुख आकर्षण स्थळे आहेत.

नारळी, पोफळी, आंबा, फणस, केळी, अननस, रातांबे, चिंच, करवंद हा रानमेवा कशेळी परिसरात विपुल प्रमाणात सापडतो. कशेळीतील दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत. एक कनकादित्य सूर्य मंदिर आणि दुसरे लक्ष्मीनारायणाचे मंदिर जे तेथील कुलकर्णी घराण्याचे कुलदैवत आहे. पौष महिन्याच्या रथसप्तमीस विविध ठिकाणाहून भाविक कनकादित्याचे दर्शन घेण्यास येत असतात.

कशेळी हे गाव इतिहास संशोधक त्र्यंबक शंकर शेजवलकर, नाटककार-कथालेखक आणि कवी विठ्ठल सीताराम गुर्जर, राजाराम शास्त्री भागवत, भा. रा. भागवत इत्यादी प्रसिद्ध लोकांची जन्मभूमी म्हणूनही ओळखली जाते.

कशेळी गावाच्या पश्चिमेकडे अदमासे ७०० मीटर अंतरावर देवघळी बीच असून आपल्या आगळ्या वेगळ्या आकाराने तो पाहताक्षणीच पर्यटकांना आकर्षित करून घेतो. सहसा आपण जे बीच पाहतो ते जमिनीस समांतर असतात मात्र देवघळी बीच हा मूळ जमिनीपासून अदमासे ४० मीटर खोल असून एक येथे पोहोचण्यासाठी कडा उतरून खाली जावे लागते. कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे.

ही वाट उतरून आपण कड्याच्या खालोखाल असलेल्या अर्धवर्तुळाकृती देवघळी बीचवर पोहोचतो. देवघळी बीचचा आकार हा गोव्यातील बटरफ्लाय बीचशी तंतोतंत साम्य दर्शवितो याशिवाय परिसरात विविध स्थानिक व स्थलांतरित पक्षांचे वास्तव्य असल्याने देवघळी हा महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

या बीचला देवघळी पाडण्याचे कारण म्हणजे बीचच्या मागील बाजूस जे तुटलेले कडे आहेत त्यांच्या मध्यभागी एक प्रशस्त घळ आहे व या घळीत फार पूर्वी कनकादित्य सूर्यदेवाची मूर्ती सापडली होती त्यामुळे देवाची घळ म्हणून या बीचला देवघळी असे नाव मिळाले.

देवघळी येथील सनसेट पॉईंट सुद्धा प्रेक्षणीय आहे. येथे जाण्यासाठी सुंदर रस्ता बनवण्यात आला असून पथदिवे व पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था असल्याने येथून सूर्यास्ताचे नयनरम्य दर्शन घेणे एक वेगळा अनुभव असतो. तेव्हा निसर्गाच्या कुशीतील नयनरम्य असा व महाराष्ट्राचा बटरफ्लाय बीच असलेला देवघळी कशेळी बीच एकदातरी पाहायलाच हवा.